उपक्रम
खरेतर त्यांची दैनंदिन जगण्याची लढाई हीच साहसाने भरलेली. तिथे ‘गिर्यारोहण’ वगैरे शब्दांना कुठे वावच नाही. पण त्यांनी या नित्याच्या लढाईवरही मात करत, उराशी जिद्द बाळगली आणि गिर्यारोहणाचे दोर बांधत सिंहगड सर केला.
ही गोष्ट आहे, ‘मेक माय ड्रीम फाउंडेशन’ संस्थेच्या त्या बारा साहसवीरांची. इरफान पठाण, संदीप िशदे, युवराज अहिरे, सुनीता िशदे, रीना गुप्ता, आकाश पवार, उमा घुसाईवाल, शीतल िशदे, आकाश दसगुडे, सनी दिघे, सागर भारत, संगीता म्हस्के हे ते साहसवीर. त्यांच्यातील अपंगत्व हे त्यांच्यात दडलेल्या जिद्दी मनाला अस्वस्थ करत होते. यामुळे या अपंगत्वावर मात करत दैनंदिन जगण्याची लढाई त्यांनी फार पूर्वीच सुरू केली होती. यातूनच पुढे मग त्यांनी पदभ्रमण-गिर्यारोहणाचे दोरही बांधले आणि मग पर्वती टेकडी, राजमाची किल्ला आणि नुकताच सिंहगड किल्ल्याची अवघड वाट सर केली.
पदभ्रमण, गिर्यारोहण हा तसा धडधाकट शरीरावर चालणारा खेळ. पण यासाठी सशक्त शरीरापेक्षाही भक्कम मन असावे लागते. उरात प्रचंड जिद्द आणि सकारात्मक वृत्ती असावी लागते. ही ज्यांच्याकडे नसते अशी संपूर्ण माणसेही गिर्यारोहणात अपयशी ठरतात तर ती ज्यांच्या अंगी असते अशी अपंगही या वाटेवर साहसवीर ठरतात. ‘मेक माय ड्रीम फाउंडेशन’च्या या वीरांनी या वाटेवर चालणाऱ्यांना नुकताच हा विचार दिला आहे.