निसर्ग पर्यावरणाचे आणि वाघाचे नाते हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्या जंगलात वाघासारखा प्राणी अस्तित्वात आहे ते जंगल जैववैविध्याच्या दृष्टीने चांगले. परंतु गेल्या काही वर्षांत आमच्या जंगलचा हा राजा आणि त्याबरोबर आमची जंगलेही धोक्यात आली आहेत. मोठय़ा प्रमाणात जंगलतोड, वाघांची शिकार, प्राण्यांच्या अवयवांची तस्करी या साऱ्यांमुळे आमचा निसर्ग आणि त्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर या वाघांना म्हणजेच आमच्या निसर्गपर्यावरणास वाचवण्याच्या हेतूने एका पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. ‘टायगर सायक्लो-वॉक’ नावाच्या या आगळय़ावेगळय़ा मोहिमेस १४ डिसेंबर रोजी सुरुवात होत आहे.
पठारावरून समुद्रापर्यंत अर्थात ताडोबा ते मुंबई अशा या भल्यामोठय़ा मोहिमेचे अंतर आहे, तब्बल १२०० कि.मी. हे अंतर सायकल आणि पायी अशा रीतीने १४ डिसेंबर ते १० फेब्रुवारी २०१४ दरम्यान ६० दिवसांत कापले जाणार आहे. साठ दिवसांच्या या मोहिमेत वाटेतील गावा-शहरांत वाघ आणि पर्यायाने निसर्ग वाचवण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या मोहिमेत १२ ते १५ जणांचा चमू हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहणार असून अन्य इच्छुकांना दहा ते पंधरा दिवसांपर्यंत सहभागी होता येईल. या मोहिमेस रोटरी क्लब, ठाणे पश्चिम आणि लायन्स क्लब, ठाणे यांनी मदत केली आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी सुनील
जोशी (९२२३३१९२१६ किंवा ९८६९७२४९२९) यांच्याशी संपर्क साधावा किंवा http://tigercyclowalk.weebly.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा