स.न.वि.वि.
मॅलरी या जगप्रसिध्द एव्हरेस्टवीराला कोणीतरी विचारलं,  ‘‘तुम्हाला एव्हरेस्ट सर करावसं का वाटलं?’’ तेव्हा त्याने उत्तर दिलं, ‘‘कारण ते तिथं आहे म्हणून!’’ तुझ्या बाबतीत माझंही अगदी असंच झालंय. ज्या दिवशी तुला भेटलो त्याच दिवशी तुझा निस्सीम भक्त झालो! तेव्हापासून आजपर्यंत तुझ्या अंगाखांद्यावर असलेल्या  सुमारे २२५ किल्ल्यांवर गेलो आणि त्या प्रत्येक भेटीमध्ये तुझं नवीन रूप बघायला मिळालं. मग तो साल्हेरचा शैलकडा असो किंवा रतनगडाचं नेढं. हरिश्चंद्राचा कोकणकडा असो वा तैलबैल्याच्या जुळ्या कातळभिंती !! प्रत्येक ट्रेकमध्ये तुझं नवं विश्व आम्ही अनुभवत आलो आहोत. तूच मला सिमेंटच्या भिंतींपलीकडची सदाबहार दुनिया दाखवलीस. सामान्य माणसापासून ‘ट्रेकर’ बनवलंस आणि समाजात वेगळी ओळख निर्माण करून दिलीस. जंक फूड विसरायला लावलंस आणि अस्सल गावरान झुणका-भाकरीची चव चाखायला लावलीस. तुझ्यामुळंच मी माणसं जोडायला शिकलो. पाण्याचं महत्त्व कळालं ते तुझ्यामुळेच! रस्त्यावर कुठेही कचरा टाकणारे आम्ही ट्रेकर्स तुझ्या अंगावरचा कचरा स्वत:हून स्वच्छ करू लागलो. आमच्यातली ‘लीडरशीप क्वालिटी’ तुझ्यामुळेच डेव्हलप झाली. कुठेही मोठय़ानी गाणी लागली की आमचे पाय आपोआप थिरकतात, पण तीच गाणी कोणत्याही किल्ल्यावर लागली की आमचं पित्त खवळतं. क ट्टय़ावर कडाकडा भांडणारे आम्ही तुझ्या संगतीत आलो की मात्र हातात हात घालून कामं करतो. कोणत्याही किल्ल्यावर भेटलेल्या एखाद्या अनोळखी ट्रेकरशीही आमची काही क्षणात घट्ट मैत्री होते. पुस्तकातला इतिहास आमच्यासमोर तू प्रत्येक वेळी अक्षरश: जिवंत करत आला आहेस. आज नाशिक-मनमाड हायवेनं जाताना म्हटलं तरी झोप येत नाही, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूने सातमाळा रांगेतल्या त्या अभेद्य गिरिदुर्गांची साद ऐकू येत असते. भंडारदऱ्याला नुसतं सहलीला म्हणून जरी गेलो तरी तो समोरचा रतनगड ते आभाळाला भिडलेलं कळसूबाई शिखर, बेलाग कातळकडय़ांचे ते अलंग-मदन-कुलंग सगळ्यात आधी नजरेत भरतात. कधी पाठीला नुसती सॅक अडकवून जरी कुठे आम्ही निघालो तरी ‘आज कोणत्या मोहिमेवर’ अशी कौतुकानं चौकशी होते! महाबळेश्वरच्या सनसेट पॉईंटवरून दिसणारा तो सूर्यास्त सगळ्यांना वेड लावतो खरा, पण त्यांनी नानाच्या अंगठय़ावरून दिसणारी ती सप्तरंगांची उधळण तरी कुठे पाहिलेली असते. घरी सकाळी सहाचा गजर बंद करून परत निर्वीकारपणे झोपी जाणारे आम्ही गोरखगडावरच्या मुक्कामात मात्र आहुप्याच्या त्या रौद्रभीषण कडय़ांमागून क्षितिजावर अनेक छटा रंगवणाया भास्कराची वाट पहाटे पाच वाजल्यापासून बघत असतो. तो खेळ असतोच तेवढा अविस्मरणीय! तुझ्या संगतीत आल्यापासून आमच्यात झालेल्या या आमूलाग्र बदलाचं गमक फक्त तूच आहेस. पुस्तकी भाषेतल्या ‘प्लॅनिंग’ ‘मॅनेजमेंट’ ‘टीम बिल्डिंग’ ‘को-ऑर्डिनेशन’ या शब्दांचा अर्थ आम्हाला ट्रेक करायला लागल्यापासूनच ‘प्रॅक्टिकली’ समजला आणि आता आम्ही त्या गोष्टी अगदी विनासायास पार पाडतो.
आज तुझी वर्णनं लिहिताना त्या पानांसारखाच आमचाही ऊर अभिमानानं भरून येतो, पण सामान्य माणसासारखी तुझीही काही दु:खं आहेत याची जाणीव आम्हाला आहे मित्रा! नैसर्गिक आपत्तींमुळे ढासळलेले बुरूज, गंजलेल्या तोफा हे तर आहेच, पण तुझ्या सुपुत्रांना आमच्यातीलच काही बेशिस्तांनी विद्रुप केले आहे. जिथं मराठी रक्ताचे सडे पडले तिथं आता दारूच्या बाटल्यांचा खच पडू लागला आहे. अविचाराने केलेली जंगलांची बेसुमार कत्तल ही भविष्यात अंध:कारच घेऊन येणार आहे. खरं तर ती लोकं क्षमेला पात्र नाहीत, पण तरी आज त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो, पण म्हणून आम्ही नुसतंच हे सगळं बघत नाही बसलो आहोत. आज आमच्यातीलच काही सजग मावळ्यांची फौज या गडकिल्ल्यांना त्यांचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यायला जोमानं झटत आहे आणि मला खात्री आहे, भविष्यात तुझ्या अंगाखांद्यावरची ही दुर्गसंपत्ती पुन्हा नव्यानं कात टाकेल!
खरं तर तुझ्याविषयी मला काय वाटतं हे काही ओळींमध्ये बसवणं खरोखरंच अवघड आहे. कारण लोक जरी तुला निर्जीव आणि दगडधोंडय़ांचा पर्वत म्हणत असले तरीही तू आमच्यासाठी सजीव आणि अगदी जवळचा दोस्त आहेस. आज तू माझ्यासारख्या प्रत्येकाची खऱ्या अर्थाने ‘पर्सनॅलिटी डेव्हलप’ केली आहेस. आज आम्ही जे आहोत ते तुझ्यामुळे आहोत आणि म्हणूनच आमच्यासारख्या तुझ्या सर्व मित्रांच्या वतीने आज मी ही ‘ऑफबिट’ कृतज्ञता व्यक्त करत आहे. असाच कायम आमच्या पाठिशी उभा राहा आणि आमच्या अनुभवाच्या शिदोरीत भरभरून दान दे अशी हक्काची मागणी करत आहे.  बहुत काय लिहिणे, तुझा जीवलग मित्र

Story img Loader