भाद्रपदाच्या अखेरीस पावसाला उतार पडला, की ढगांचे मळभ नाहीसे होत पुन्हा एकदा ती स्वच्छ निळाई अवतरते. वर्षां ऋतूत न्हाहून निघालेले, पाऊस पिऊन तृप्त झालेले सह्य़ाद्रीचे रणमंडळ या निळाईत तर अधिकच उठून दिसते. पुणे जिल्ह्य़ातील जुन्नरच्या पश्चिमेला चावंडची वाट असेच निसर्गाचे प्रसन्न दर्शन घडवते.

धुळीचे लोट मागे टाकत दुधाचा ट्रक घाटघरकडे धावत होता. अनेक परिचित-अपरिचित डोंगरांमधली ही वाट. तशी ती थेट दोन हजार वर्षांपासून धावते आहे. त्या काळी नालासोपारा, चौल, भडोच आदी बंदरांतून देशोदेशींच्या मालाची या मार्गेच नाणेघाटातून जुन्नरच्या बाजारपेठेत ने-आण व्हायची. मग अशा या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी त्या वेळी शिवनेरी, चावंड, हडसर, जीवधन, भैरवगड अशी दुर्गशृंखला तयार केली होती. यातीलच एक किल्ले चावंड!
जुन्नरच्या वायव्येला १५ किलोमीटरवर हा गड. जुन्नरहून आपटाळेमार्गे जाणाऱ्या पूर, कुकडेश्वर, घाटघर, अंजनावळेच्या एस.टी. बस या चावंड गडाखालून जातात. इथेच गडाखाली उतरावे. रस्त्याच्या उजव्या बाजूस एका तासलेल्या कडय़ावर तटबंदीचे शेला-पागोटे चढवलेला गड दिसतो, हाच किल्ले चावंड! या गडाला ‘जोंद’, ‘जुड’ किंवा ‘प्रसन्नगड’ असेही म्हणतात.
ट्रकने कचक् न ब्रेक लावला. त्याबरोबरच शेवटचे लोटांगण घालत चावंड फाटय़ावर उतरलो. धुळीची रेघ आकाशात उठवत ट्रक तसाच पुढे गेला. समोर उरला फक्त खडय़ा पहाडातील चकाकणारा चावंड!  ‘चावंड अर्धा कि.मी.’! पाटी कशीबशी स्वागताला उभी होती. वीसएक मिनिटांत माती- फुफाटय़ाची वाट गडाच्या पायथ्याशी असलेल्या चावंड गावाच्या शिवारात दाखल झाली. ‘राम- राम’, ‘नाव-गाव’ अशा जुजबी गप्पा झाल्या आणि गडाची वाट पकडली. उभ्या कडय़ातील ही वाट! चारी बाजूंनी ताशीव कडे असल्याने एका नाळेतून ती काढलेली आहे. पूर्वी ती चांगली खोदीव पायऱ्यांची होती, परंतु इंग्रजांनी सुरुंग लावून उडवून दिली. मराठय़ांशी लढताना इंग्रजांनी या किल्ल्यांमधील स्वराज्याचे मर्म चांगलेच ओळखले होते. तेव्हा त्यांनी हे बलदंड किल्लेच अगोदर संपविण्याचा प्रयत्न सुरू केला, परंतु तेही अवघड वाटू लागल्याने त्यांनी मग या गडांकडे जाणाऱ्या वाटांचीच ‘वाट’ लावली. यामुळे अगोदरच दुर्गम असलेले हे दुर्ग अधिकच दुर्गम बनले. पण या गडांवरील देव-देवता आमच्या लोकांना स्वस्थ बसू देतील काय? चावंड गडावरील चावंडादेवीच्या भक्तीने इथल्या लोकांनीही गडावर जाण्याची खटपट सुरू केली. सुरुवातीस खोबण्यांचा मार्ग तयार केला. पुढे मग कुणीतरी गावक ऱ्याने यातील एका खोबणीत एक निकामी तोफ बसवली आणि या तोफेला दोर बांधून ही मंडळी वरखाली होऊ लागली. पुढे हेही गैरसोयीचे होऊ लागल्यावर एका दुर्गवेडय़ा सरकारी अधिकाऱ्याने पायऱ्यांची जुजबी दुरुस्ती करून त्याला लोखंडी कठडे बसवत आजचा रस्ता तयार केला. आज आपण या खोबण्या, पायऱ्या आणि कठडय़ांचा आधार घेतच वर सरकतो.  ऐन कडय़ावरून वर आकाशाकडे पाहात वाट जात असते, पण गडाचा दरवाजा काही केल्या दिसत नाही. पहिल्यांदा येणारे तर बुचकळय़ातच पडतात. आमच्या दुर्गस्थापत्यातीलच ही एक गंमत! शत्रूला गडाचा दरवाजाच कळणार नाही अशा रीतीने तो तटाला समांतर, दडलेल्या पद्धतीने बांधायचा! यालाच पुढे ‘गोमुखी बांधणी’ असे म्हटले जाऊ लागले.  चावंडची एकापाठोपाठ अशी ही दोन प्रवेशद्वारेही त्या तटालगत दडलेली. अगदी गडावर पोहोचलो की ती समोर प्रगटतात. ऐन कातळात कोरलेल्या-बांधलेल्या या प्रवेशद्वारांना गणेशपट्टीने सजवले आहे. दरवाजाला वंदन करत गडामध्ये प्रवेश केला, की समोर सर्वत्र गवताळ प्रदेशच दिसतो. यातूनच एक वाट समोरच्या छोटय़ा टेकडीवर चढते. वाटेत सदर, घरांचे अवशेष दिसतात. टेकडीच्या ऐन माथ्यावर गडदेवता चावंडादेवीचे नवे छोटेखानी मंदिर आहे. मूळ मंदिराचे अवशेषही इथे दिसतात.
या टेकडीवरून गडाचा संपूर्ण परिसर नजरेत येतो. यातही उत्तरेकडील सप्ततळे लक्ष वेधून घेते. त्याच्याच दिशेने निघावे तो वाटेत एका प्राचीन मंदिराचे अवशेष आणि त्याच्या पुढय़ातील ती रेखीव पुष्करणी अचानकपणे अवतरते. काही काही शब्दच मुळी गोड, कानाला सुखावणारे असतात, त्यातीलच हा एक ‘पुष्करणी’! टाके, आड, बारव, विहीर, तलाव असे काहीही म्हटले तरी ती फक्त पाणी साठवण्याची जागा एवढेच डोळय़ांपुढे येते. पण तेच ‘पुष्करणी’ म्हटले तर! हे काहीतरी निराळे नक्कीच भासते. सुखद, अलंकारिक, दैवी, पवित्र, उदात्त हेतूने निर्मिलेली असे अनेक भाव त्या जलवास्तूत उमटू पाहतात. एखाद्या देवालयासमोर, त्याच्या सान्निध्यात, त्याच्यासाठी म्हणून निर्माण केलेला जलप्राकार म्हणजे ‘पुष्करणी’! आता तिच्या नावाप्रमाणेच ती सौंदर्य ल्यायलेली असणार हे उघड! चार दिशांना कोनाडे, त्यात विविध देवतांनी वास केलेला. आतमध्ये चारही बाजूने उतरणाऱ्या पायऱ्या, फिरण्यासाठी धक्का ..पुष्करणीचे हे असे थोडेसे रेखीव रूप. चावंडवरची पुष्करणीही अशीच. फक्त गेल्या अनेक वर्षांच्या उपेक्षेने जणू ती शापित बनलेली. पडझड झालेली, देवकोष्टातील मूर्ती भंगलेल्या-गायब झालेल्या, सर्वत्र झाडावेलींचे रान माजलेले. ज्या मंदिरासमोर ही पुष्करणी होती त्या मंदिराने तर कधीचीच मान टाकलेली. त्याचे ते कोरीव दगड, अवशेष आजूबाजूला अस्ताव्यस्त पडलेले. नाही म्हणायला एक कोरीव कमान कशीबशी तग धरून!
जुन्नर परिसरात चावंड, हरिश्चंद्रगड, त्यापलीकडे रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडी, निमगिरी, बेल्हे आदी गावांत अशा पुष्करणी दिसतात. या सर्वाच्या रचनेत मोठय़ा प्रमाणात साम्य आहे. यावरून त्या एकाच काळात बांधलेल्या असाव्यात. साधारण आठव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान! पुष्करणीचे हे सौंदर्य साठवत पुढे निघावे तो सप्ततळे नावाचा आणखी एक जलप्राकार त्याचा तो कोरीव ऐवज घेऊन पुढय़ात उभा राहतो. एका विस्तीर्ण खडकात गोलाकार रचनेत एकाला लागून एक अशी सात तळी इथे खोदलेली आहेत. या सप्ततळय़ामध्ये उतरण्यासाठी पूर्व दिशेने एक पायरीवजा मार्ग ठेवलेला आहे. या मार्गावर त्या कातळातच एक अतिशय सुंदर दरवाजा कोरलेला आहे. या कमानीच्या भाळी गणेश शिल्पाचा टिळा लावलेला आहे. कोरीव कमानीच्या दोन्ही अंगांना लाकडी दरवाजा बसवण्यासाठीची आवश्यक दगडी कुसे आजही दिसतात. पाण्याने काठोकाठ भरलेले हे जलसाठे आणि त्याचे महत्त्व-मूल्य जाणून दरवाजाचे त्याला बसवलेले हे कोंदण! ..किती सुंदर ही कल्पना, सारेच अफलातून! महाराष्ट्रात शेकडो गडकोट आहेत. या प्रत्येकावरील सिंचनाची व्यवस्था ही स्वतंत्र आहे. खरेतर हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. या सप्ततळय़ानंतर गडाच्या अगदी उत्तरेकडील कडय़ाच्या पोटात एका सरळ रेषेत खोदलेल्या तीन लेण्या आढळतात. यांच्या तोंडाशी, आतमध्ये बांधकाम करत त्याचा वापर पुढे निवास-कोठारासाठी केलेला दिसतो. या गडाला प्राचीन इतिहास आहे. नाणेघाटातून येणाऱ्या व्यापारीमार्गाच्या संरक्षणासाठी या गडाची सातवाहन काळात निर्मिती झाली असावी. गडाच्या पोटातील लेण्या या त्या काळच्या खाणाखुणा आहेत. याशिवाय खोदीव पुष्करणी, मंदिराचे अवशेष हे सर्व प्राचीन काळाचेच दाखले देतात. इथून पुढे थेट १४८७मध्ये निजामशहा मलिक अहमदने हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख मिळतो. दुसरा बुऱ्हान निजामशहा याचा अज्ञान पुत्र बहादूरशहा हा १५१४मध्ये वर्षभर या किल्ल्यावर कैदेत होता. हा किल्ला अनेकदा तुरुंग म्हणूनच वापरात असल्याचे दिसते. मुसलमानी रियासतीतील अनेक राजकीय कैद्यांना इथे डांबले होते.  माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत पेशव्यांचा कैदखाना या गडावरच असल्याचा उल्लेख येतो. इसवी सन १६३७मध्ये शहाजीराजांनी हा किल्ला मोगलांस दिला. पण पुढे शिवशाहीतील इतिहासाबाबत मात्र हा किल्ला फारसा बोलत नाही. गडाचे ‘प्रसन्नगड’ हे नाव याच काळात पडलेले असावे, किंबहुना छत्रपती शिवाजीमहाराजांनीच ते दिलेले असावे असे वाटते. पेशवाईनंतर हा किल्ला थेट इसवी सन १८१८पर्यंत मराठय़ांकडेच होता. १८१८च्या त्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात १ मे रोजी ब्रिटिशांची एक तुकडी चावंड गावी आली आणि त्यांच्या तोफगोळय़ांच्या मारगिरीनंतर काही तासांतच चावंडचा लढाऊ इतिहास संपुष्टात आला.
फार मोठा इतिहास नसला तरी इथून घडणारे भूगोलाचे दर्शन मात्र अतिशय सुंदर आहे. चावंडला अनेक डोंगररांगांचा विळखा पडला आहे. या डोंगरशिखरांमधूनच शिवनेरी, हडसर, निमगिरी, जीवधन इत्यादी दुर्ग आपल्या ओळखी सांगतात. गडाच्या उत्तरेकडून कुकडीचे विशाल पात्र वाहते. ज्या कुकडी नदीचा उगम चावंडच्याच पश्चिमेकडील महादेव डोंगरात होतो. या डोंगराच्या पायथ्याशी कुकडीच्या या उगमस्थळी प्राचीन कुकडेश्वराचे मंदिर आहे. त्यावरील शिल्पकाम पाहण्यासारखे असे आहे. या कुकडी नदीवर आता माणिकडोह धरण साकारल्याने या नदीचे पाणी चावंडच्या पायथ्याला धडका मारू लागले आहे. डोंगरदऱ्यांच्या या ‘कॅनव्हास’वर पाण्याचा हा साठा, त्यातून धावणाऱ्या होडय़ा, नदीकाठची बेटांची हिरवीगार शेती, लाल-कौलारू घरांच्या वाडय़ा-वस्त्या, त्या घरांमधून आकाशात झेपावणाऱ्या धुरांच्या रेषा, असे सारे  निसर्गचित्र मन प्रसन्न करते. गडाचे ‘प्रसन्नगड’ हे नाव बहुधा या निसर्गचित्राला पाहूनच सुचलेले असावे. कुठल्याही गड-शिखराला निसर्गदृश्याचा हा असा कोन असला, की त्या टोकावरून पाय निघत नाही. डोंगरावरचा गड-इतिहास पाय खेचून घेतो आणि भोवतीचा निसर्ग त्याला खिळवून ठेवतो. मग हे सारे पाहण्यासाठी आणि त्या आठवणी पुन्हा जागवण्यासाठी चावंडची कडय़ातली वाट पुन:पुन्हा चढावीशी वाटते.

la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
blossoms of Cosmos flowers in Autumn season
निसर्गलिपी – शरद ऋतूतील बहर…
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Loksatta kutuhal Historic buildings Hard to find without stones
कुतूहल: पाषाणांशी जडले नाते…
Story img Loader