ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

चादर ट्रेक
‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या ८ ते १८ फेब्रुवारी २०१५ दरम्यान लेह-लडाख परिसरातील चादर ट्रेकचे आयोजन केले आहे. समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर असलेल्या या बर्फाळ प्रदेशातून होणाऱ्या पदभ्रमंतीत बर्फवृष्टी अनुभवता येते. हिमालयातील जैवविविधता, निसर्ग या साऱ्यांचे या ट्रेकमध्ये विहंगम दर्शन होते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम संधी ठरू शकते. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

लिटील रण ऑफ कच्छ
निसर्ग सोबती तर्फे ४ ते ७ डिसेंबर दरम्यान गुजराथमधील ‘लिटील रण ऑफ कच्छ’ येथे अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. या स्थळाला रामसर नावानेही ओळखले जाते. जंगली गाढवे, काळवीट, चिंकारा आदी प्राणी इथे दिसतात. याशिवाय रोहीत, क्रेन, गिधाड, गरूड आदी पक्षी दिसतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.

जामनगर पक्षिनिरीक्षण
गुजराथमधील जामनगर हे ऐतिहासिक स्थळ त्याच्या गौरवशाली इतिहासाबरोबरच देशोदेशीच्या येणाऱ्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील निसर्ग निर्मित बेटे, समुद्र किनारे, पाणथळ जागांच्या परिसरात अनेक स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडते. यामध्ये फ्लेमिंगो, पेलिकन्स, केन्स, ब्लॅकनेक स्टार्क, विविध प्रकारची बदके दिसतात. अशा या जामनगर अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’तर्फे २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. निसर्ग, पक्षिनिरीक्षण, छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही भ्रमंती मेजवानी ठरू शकते. या सहलीत जामनगरच्या गौरवशाली इतिहासाचेही दर्शन होणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com