धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email -abhijit.belhekar@expressindia.com
जामनगर पक्षिनिरीक्षण सहल
पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जामनगर परिसरात ‘निसर्ग टूर्स’तर्फे २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. जामनगर या ऐतिहासिक नगरीजवळ अनेक नैसर्गिक बेटे, समुद्रकिनारा, प्राचीन मंदिरे, राजवाडे आणि समुद्री राष्ट्रीय उद्यान आदी पाहण्यासारखी स्थळे आहेत. निसर्गाच्या या अधिवासात विविध प्रजातींचे हजारो स्थलांतरित पक्षी येतात. यामध्ये प्रामुख्याने रोहित, पेलिकन्स, स्टार्क, विविध जातींची बदके इथे पाहण्यास मिळतात. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
कास पठार अभ्यास सहल
कास पठार हे विविध प्रकारच्या रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इथे या रानफुलांचे गालिचे तयार होतात. ‘वसुंधरा आऊटडोअर्स’तर्फे हे पठार आणि ठोसेघर धबधब्याच्या सहलीचे २८ सप्टेंबर रोजी आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९७०१८०३१३) यांच्याशी संपर्क साधावा.
कास पठार वर्षां सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या ४ ऑक्टोबर रोजी पावसाळी रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. यामध्ये कासशिवाय सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्याच्या सहलीचाही समावेश आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
दुर्गप्रेमींच्या भेटीला ‘किल्ला’चा नवा अंक !
महाराष्ट्रातील भटकंतीचे किल्ल्यांशी अगदी जवळचे नाते आहे. अशा या दुर्गसंस्कृतीवर गेली दोन वर्षे सातत्याने विशेषांक काढणाऱ्या ‘किल्ला’ परिवाराकडून त्यांचा चौथा अंक नुकताच बाजारात आणला आहे. या अंकातही दुर्गसंस्कृती-प्रकृतीचे अनेक पदर उलगडलेले आहेत. महाराष्ट्रातील दुर्गाच्या दुर्दशेवरील ‘दुर्गग्रहणगाथा’ या विशेष लेखापासून सुरू होणाऱ्या या प्रवासात देवगिरीचा इतिहास-स्थापत्य, दुर्गावरील पक्षिजीवन, किल्ले नरनाळा, राजस्थानचा आमेर, दुर्गदिन चळवळ, गोनीदामय दुर्गभ्रमण, रामटेक किल्ल्याचे चित्रदर्शन असे अनेक दुर्गविषय त्यांची ओळख करून देतात. नाशिक जिल्ह्य़ातील दुर्गइतिहास आणि सातारा जिल्ह्य़ातील किल्ल्यांचा निसर्ग हे विषय तर दुर्गप्रेमींना अभ्यासाची नवी दिशा देतात. भवानी तलवारीचा इतिहास, मायनाक भंडारींचे व्यक्तिदर्शन, नंदूरबार जिल्ह्य़ातील प्रकाशे संस्कृतीची ओळख हे अन्य संबंधित विषयही आपल्या माहितीत भर घालतात. सतत नवनव्या विषयांचा ध्यास, अभ्यासकांकरवी केलेले लेखन, संशोधनदृष्टी ही ‘किल्ला’ अंकाची ओळख असतेच; पण या जोडीने वेधक छायाचित्रे, चांगल्या कागदावरची देखणी छपाई या अंकास संग्राह्य़ मूल्य बहाल करते. या अशा अंकातून दुर्गदर्शनाची दृष्टी विकसित पावते. दुर्गजागरण आणि दुर्गसंवर्धनाचा संस्कार होतो. (किल्ला अंकासाठी संपर्क – रामनाथ आंबेरकर – ९०२९९२९५००)