महाराष्ट्रातील डोंगरभटक्यांची मांदियाळी असणारे गिरिमित्र संमेलन ११ व १२ जुलै रोजी होणार आहे. संमेलनाचे हे १४ वे वर्ष असून संमेलनाच्या निमित्ताने अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. दृकश्राव्य सादरीकरण, छायाचित्रण, प्रश्नमंजूषा, ट्रेकर ब्लॉगर आणि पोस्टर अशा स्पर्धाचा समावेश आहे.
संमेलनाचे खास आकर्षण असलेली दृकश्राव्य सादरीकरण स्पर्धा यंदादेखील घेण्यात येणार आहे. पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयीन मोहिमा या विषयांवरील सादरीकरणे (ऑडीओ व्हिज्युअल अथवा फिल्म्स) यासाठी ग्राह्य़ असतील. विजेत्यांना सन्मानचिन्हाबरोबरच विशेष आर्थिक प्रोत्साहन पारितोषक देण्यात येणार आहे. छायाचित्र स्पर्धेसाठी प्रस्तरारोहण, हिमालयीन मोहिमा आणि डोंगरातील मानवी जनजीवन असे तीन गट करण्यात आले आहेत. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, तर भटकंती विषयक प्रश्नमंजूषा ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष संमेलन स्थळी अशा दोन प्रकारे घेण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रश्नमंजूषा ही १ जून पासून सुरू होणार असून त्यातून निवडक पाचजणांचा समावेश प्रत्यक्ष संमेलनात होणाऱ्या प्रश्नमंजूषेसाठी केला जाणार आहे.
डोंगरभटकंतीचे अनुभव ब्लॉगच्या माध्यमातून मांडणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली ‘ट्रेकर ब्लॉगर्स’ स्पर्धा यंदादेखील घेण्यात येणार आहे. पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयीन मोहिमा या विषयांवरील ब्लॉग्ज या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. यंदाच्या वर्षी पोस्टर स्पर्धा ही नव्याने सुरू करण्यात आली आहे. सह्य़ाद्रीतल्या भटकंती आढळणाऱ्या शिल्पकलेवर आधारित पोस्टर्स यासाठी पाठविता येतील. सह्य़ाद्रीतली मंदिरे, लेणी, वैविध्यपूर्ण शिल्पं, तसेच गडकिल्यांच्या वैशिष्टय़पूर्ण रचना या विषयांवर छायाचित्र आणि ऐतिहासिक माहितीच्या आधारे तयार केलेली पोस्टर्स स्पर्धेसाठी ग्राह्य़ असतील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून स्पर्धेची माहीती, नियम यासाठी http://www.girimitra.org ही वेबसाईट पाहावी अथवा ९८३३३९४०४७ / ९९८७९९०३०० या क्रमांकावर संपर्क साधावा.