तुंग-तिकोना हे संपूर्ण पवनपट्टय़ाचे रक्षण करणारे  शिलेदार! ऊन, पाऊस, वारा आणि गनीम या सर्वाशीच झुंजत आणि काळाशी झगडत शतकानुशतकं ते उभे आहेत. ऐन पावसाळय़ात या गडांची भ्रमंती वेगळय़ाच जगात घेऊन जाते.
‘एल निनो’ आणि ‘ला निना’च्या वादळी खेळांमुळे मान्सूनचा काही थांगपत्ता नव्हता. त्यामुळे चारी दिशा रखरखीत, रूक्ष झाल्या होत्या. पावसाच्या या नसण्याने आता मनात नवनवे ‘एल निनो’ उठू लागले होते. अशा या अस्वस्थ, आंदोलित मनाला शांत करण्यासाठी एकच जालीम उपाय ठाऊक होता. जो कदाचित दस्तुरखुद्द शिवरायही वापरत असावेत. तो म्हणजे कृत्रिम, बंदिस्त शहरांतून बाहेर पडत सह्यगिरीकडे झेपावायचे!
नुकतंच गोनिदांचं ‘पवनेकाठचा धोंडी’ वाचनात आलं होतं. त्यामुळे पवनेचा निळाईनं नटलेला रम्य हिरवागार परिसर, तो तुंगी गड, त्याचे आभाळाला भिडणारे ते कातळकडे आणि एकूणच पवन मावळचा सारा इलाखा या सगळ्याची एक वेगळीच ओढ मनाला लागली होती. ठरलं तर! चार सवंगडी गोळा केले आणि निघालो तुंग तिकोनाच्या मोहिमेवर. कामशेतपर्यंत लोकल, मग बस असा प्रवास न करता आम्ही स्वतची वाहने घेऊन थोडा कठीण, वळणावळणाच्या अशा पुणे-पिरंगुट-पौड या माग्रे जायचे ठरवले. पौडच्या बस थांब्याच्या पुढे उजवीकडे वळलो की खरी गंमत सुरू होते. पुण्याकडे पाऊस नसला तरी मावळात तो डेरेदाखल झाला होता. पुढे जाऊ तसं दूरवर तिकोन्याचा माथा ढगांनी वेढलेला तसेच तुंगच्या उत्तुंग सुळक्यावर मेघांचे आक्रमण झालेले दिसले. ठिकठिकाणी असलेले खड्डे आणि चिखलाचे रस्ते पार करत कोळवणला पोहोचलो. इथून पुढे जवण गाव लागते. इथे समोर तिकोना उभा ठाकलेला दिसतो. पण तिथे जाण्याआधी आपण डावीकडे मोर्चा वळवायचा. चावसर, शििळब, मोरवे असं करत करत अत्यंत सुरेख अशा रस्त्याने आपण तुंगवाडीस येऊन धडकतो.
तुंग ऊर्फ कठीणगडाचे दुरून दिसणारे अकराळविकराळ, रौद्र रूप जवळ जाऊ तसे आपल्या आटोक्यातले वाटू लागते. पायथ्याच्या दाट झाडीत लपलेल्या मारुतीपासून थेट वर जाण्यासाठी वाट. या रानातली कैरी, जांभळं खात खात आम्ही चढाईला सुरुवात केली. इथे एक मजेदार गोष्ट म्हणजे चारी बाजूला लागवड केल्याप्रमाणे रानकेळीची झाडं आणि जागोजागी खेकडे नजरेस पडतात. काही वेळातच पहिला दरवाजा पार करत आपण गडावर पोहोचतो. इथून एक लहानसे गणपतीचे मंदिर, बाजूचं पाण्याचं टाकं आणि मागे तुंग असा नजारा दिसतो. मराठय़ांचा एके काळचा टेहळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या या गडाचं रूप मनाला भिडतं. अत्यंत खडकाळ अशी वाट चढत आपण दुसरा मग तिसरा असे एकेक टप्पे पार करत गडाच्या शिखरावर येतो. अत्यंत लहान असा हा गडमाथा अक्षरश वेड लावतो. तीनएक हजार फूट उंचीवरून आपण पाहू तिथे ढग दिसत असतात. उडून जाऊ की काय असं वाटण्याइतका जोरात वारा वाहत असतो. एका टोकावर तुंगाई मातेचे पिटुकले मंदिर आपले अस्तित्व टिकवून उभं असतं. इथेच कातळकडय़ात एक खोदीव खोली दडलेली आहे. या छोटय़ाशा गुहेला एक छिद्रही आहे. त्यातून डोकावून बाहेरचे दृश्य पाहणे म्हणजे केवळ थरार! डोकं बाहेर काढून ती दरी पाहिल्यावर आपल्या काळजाचा ठोका न चुकला तरच नवल!
मग पुन्हा वर येऊन ढग बाजूला होतील तसा लोणावळा, मळवली, त्यामागे लोहगड-विसापूरची जोडगोळी, दुसऱ्या बाजूला पवना आणि त्या पलीकडे तिकोना असा सारा मुलूख दिसू लागतो. हे सर्व पाहत तुंगाईला वंदन करून गड उतरू लागायचा. आपण खाली जात असता वरून धोंडी हवालदार गडाच्या कुठल्याशा टोकावरून आपल्याकडे बघतोय की काय असे वाटून जाते!
थोडय़ा वेळातच आपण पुन्हा पायथ्याशी येतो. आता आलो त्याच रस्त्याने परत जवण गावी येऊन डावीकडे वळत थेट तिकोना पेठ गाठायची. इथे कमानीतून आत शिरणारा रस्ता आपल्याला सरळ किल्ल्याच्या पायथ्याशी नेऊन सोडतो. अत्यंत सोपी चढाई असल्याने अध्र्या एक तासात आपण वर पोहोचतो. जवळच एका गुहेत पद्मावती देवीचे मंदिर. त्या पुढय़ात असलेल्या टाक्यात थंडगार पाणी मिळतं.
दूर कुठे तरी झाडीत पक्षी सुंदर शीळ घालत असतात. यांच्यात तो वेड लावणारा ‘मलबार व्हििस्लग थ्रश’ हा अनोखा पक्षीही असतो. त्याच्या शिट्टी वाजवण्याच्या एका विशिष्ट प्रकारामुळे त्याला ‘शाळकरी मुलगा’ म्हणूनही ओळखले जाते. समोरच्या िपपळाला नुकतीच फुटलेली नवी पालवी आपल्याला उल्हसित करते. इथे पाण्याच्या टाक्यावर निळसर पांढरे चतुर उडत असतात. निसर्गातील ही सारी जादुई दृश्यं एक वेगळा अनुभव देत असतात.
थोडासा विसावा घेऊन किल्ल्याच्या वरच्या भागाकडे वळायचे. इथे दगडात कोरलेल्या उभ्या पायऱ्या आपला चांगलाच दम काढतात. धापा टाकत त्या चढलो की आपण सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो आणि वितंडेश्वराचे मंदिर त्याच्या समोरचे नंदी आपलं स्वागत करतात. मगाशी पाहिलेला सर्व मुलूख या गडावरून पुन्हा नव्याने न्याहाळता येतो.
 तुंग-तिकोना हे संपूर्ण पवनपट्टय़ाचे रक्षण करणारे दोन शिलेदार! ऊन, पाऊस, वारा आणि गनीम या सर्वाशीच झुंजत आणि काळाशीही झगडत शतकानुशतकं उभे. पण याच स्वराज्य रक्षकांचे आता कोणी वाली उरले नाहीत ही जाणीव काळीज चिरून जाते. आपल्या या शिवसंपत्तीचे आता आपणच जतन करायचे हा निर्धार आपल्या मनात पक्का होतो. अचानक मागून कुठूनतरी वाऱ्याची झुळूक येते आणि समोरचा भगवा पुन्हा त्वेषाने फडकू लागतो!

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
Pimpri , Disaster Management, Japanese Technology ,
पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede: तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? कारण आलं समोर!
Story img Loader