महाबळेश्वरच्या मढीमहाल ऊर्फ आर्थर सिट पॉइंटवर किंवा मुंबई टोकावर उभे राहिले, की जावळीचे खोरे आणि त्यातील सह्य़ाद्रीचे तांडव पुढय़ात उभे राहते. सारा सह्य़ाद्री जणू इथे खवळलेला भासतो. त्याची उंच शिखरे जणू आकाशाशी स्पर्धा करतात तर खोल कातीव दऱ्या पाताळाचा शोध घेतात. या साऱ्यांवर पुन्हा किर्र्र ऽऽ जंगल; ऐन, खैर, हिरडा, साग, आंबा, जांभूळ, करंज, कारवी, धायटी अशा कितीतरी वनस्पती आणि त्यातील नाना पशू-पक्ष्यांचे! गोविंदाग्रजांची ‘अंजन, कांचन, करवंदी’ची ही जाळी! कृष्णा, कोयना, वेण्णा नदीची पात्रे या डोंगरझाडीतूनच वाहतात. अशा या सह्य़ाद्रीच्या खेळात मधोमध एक पर्वत ढाण्या वाघाप्रमाणे त्याची मान उंचावून बसलेला आहे. जावळीच्या या भूगोलावर लक्ष ठेवत आणि त्याच्या इतिहासाचा महानायक बनून, नाव – प्रतापगड!
प्रतापगड, शिवरायांच्या दुर्गसख्यांमधील त्यांचा एक निष्ठावान सहकारी! या जावळीच्या जंगलात, कोयनेच्या काठावर आणि पार घाटाच्या माथ्यावर त्याचे स्थान. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर हा दुर्ग! महाबळेश्वरहून हे अंतर २४ किलोमीटरचे! हा सारा रडतोंडीचा घाट! सह्य़ाद्रीच्या मुख्य धारेवरून खाली उतरताना रडकुंडीला आणणारा. उभे कडे, दाट झाडी आणि त्यातून धावणारा हा भेदक वळणाचा हा मार्ग. कवी गोविंदांनी या वाटेचे वर्णन नेमकेपणाने केले आहे.
‘‘जावळिचा हा प्रांत अशनिच्या वेलांची जाळी
भयाण खिंडी बसल्या पसरूनी ‘आ’ रानमोळी’’
हा घाट उतरत असतानाच वाटेत अनेक ठिकाणी या झाडांच्या कमानीतून प्रतापगड डोकावत असतो. जावळी मुळात दुर्गम! तिच्या या दुर्गम अभेद्यपणाच्या जोरावरच इतिहासात अनेक वर्षे मोरे यांची इथे अनभिषिक्त सत्ता होती. शिवरायांनी स्वराज्यनिर्मितीच्या कामी या मोऱ्यांना मदतीची हाक दिली. त्या वेळी सहकार्य तर दूरच पण स्वराज्य कार्यास विरोध करण्यास मोऱ्यांनी सुरुवात केली. तेव्हा मग शिवरायांनी जावळीत शिरून त्यांचा बंदोबस्त केला. पुढे या जावळीला आणखी अभेद्य करण्यासाठी, या खोऱ्यात उतरणाऱ्या रडतोंडी, अंबेनळी, पार घाटांवर नजर ठेवण्यासाठी ऐन मोक्यावर गडही उभारला तोच – प्रतापगड!
रडतोंडीचा घाट प्रतापगडाच्या पायथ्याशी कुंभरोशी गावी संपतो. पार आणि किन्हेश्वर गावांच्या बेचक्यात आणि कुंभरोशीच्या डोक्यावर हा प्रतापगड! उंची १०८० मीटर! मूळचा हा भोरप्याचा डोंगर, त्याला ‘रानआडवा गौड’ असेही म्हटले जाई. आक्रमण, संरक्षण आणि नियंत्रण या गडाच्या तिन्ही हेतूंसाठी ही अतिशय योग्य जागा. यातूनच इसवीसन १६५६ मध्ये शिवरायांनी इथे गड बांधण्याचा निर्णय घेतला आणि मोरोपंत पिंगळय़ांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दोन वर्षांत एक अभेद्य दुर्ग तयार झाला. शिवरायांनीच त्याचे नामकरण केले – प्रतापगड!
कुंभरोशी गावातून एक पक्की सडकच गडावर जाते. १९५७ साली गडावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या उद्घाटनासाठी पंडित नेहरू आले होते. त्या वेळी गडाच्या महादरवाजापर्यंत हा रस्ता करण्यात आला. गडावर जाणारी पूर्वीची वाट या कुंभरोशीतूनच वर जात होती. आजही ती काही ठिकाणी दिसते. पक्क्य़ा सडकेने निघालो असता, वाटेत डाव्या हाताला अफझलखानाचे थडगे दिसते. अफझलखानाच्या वधानंतर स्वत: महाराजांनीच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत हे थडगे उभारल्याचे सांगितले जाते. या मूळ वास्तूची छायाचित्रेही काही जुन्या पुस्तकांमध्ये प्रसिद्ध आहेत. कधीकाळी अत्यंत साध्या असलेल्या या स्मारकाचे आता मात्र एका संगमरवरी उंची इमारतीत रूपांतर झालेले आहे. पण असा संगमरवर कितीही मढवला तरी त्याने काळा इतिहास थोडाच स्वच्छ होणार?
प्रतापगडाचा महादरवाजा गोमुखी पद्धतीचा! ऐन तटात तोंड वळवून दरवाजा बांधण्याची ही पद्धत. यामुळे शत्रूला गडाजवळ जाईपर्यंत नेमका दरवाजा कुठे आहे, हेच कळत नाही. शिवरायांच्या दुर्गतंत्रातील ही एक खास पद्धत. दरवाजाच्या दोन्ही अंगास बुरूज, कमानीच्या दोन्ही बाजूस शरभ या काल्पनिक पशूचे शिल्प कोरलेले.
आत शिरताच पूर्व दिशेस गेलेल्या माचीचे दर्शन घडते. या माचीच्या टोकाला चिलखती बांधणीचा एक टेहळणीचा बुरूज आहे. त्याच्यावर फडफडणारा तो जरीपटका गडाच्या तळापासून लक्ष वेधून घेत असतो.
महादरवाजानंतर आणखी दोन दरवाजांची मालिका येते. पण आता या दरवाजांच्या बाजूनेच गडावर जाण्यासाठी थेट रस्ता केल्याने सध्या हे दरवाजे बाजूला पडले आहेत. यातील दुसरा दरवाजा तर दगड-मातीने भरून गेलेला होता. परंतु सात-आठ वर्षांपूर्वी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी इथे श्रमदानातून हा सारा राडारोडा हलवला आणि दरवाजा मोकळा केला. आमच्या जागोजागीच्या धारातीर्थासाठी ही अशी युवा शक्ती वापरली तर मोठे कार्य उभे राहील आणि योग्य वयात चांगला संस्कारही रुजेल!
गडप्रवेशाच्या या मार्गालगतच ‘रहाट तळे’ आहे. इथून चार पावले चाललो की आपण भवानीमातेच्या अंगणी दाखल होतो. वाटेत देवीच्या परंपरागत सेवेकरी, गडकरी, चौकीदाराची घरे आहेत.
प्रतापगडचा सारा आत्मा तो या भवानीमातेच्या मंदिरात! तुळजापूरची भवानीमाता ही छत्रपती शिवरायांची कुलस्वामिनी! अफझलखानाने या देवीलाच त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी प्रतापगडावर भवानी मातेचे मंदिर उभारण्याचा निर्णय महाराजांनी घेतला आणि तो पूर्णत्वासही नेला.
गर्भगृह, सभामंडप आणि नगारखाना अशी मंदिराची रचना. मंदिर परिसरातच गडावर मिळालेल्या तोफा, जुनी भांडी, नगारे मांडून ठेवलेले आहेत. पण या साऱ्यांपेक्षाही लक्ष स्थिरावते ते भवानी मातेच्या शिल्पावर!
भवानी मातेच्या या मूर्तीसाठी शिवरायांनी हिमालयातून खास शिळा मागवून घेतली. त्रिशूळ गंडकी, श्वेत गंडकी आणि सरस्वतीच्या संगमावरची ही शिळा. तिच्यावर महिषासुरमर्दिनी रूपातील भवानीमातेचे उत्तम शिल्प कोरण्यात आले आणि इसवीसन १६६१ सालातील ललिता पंचमीस तिची प्रतिष्ठापना करण्यात आली.
भल्या पहाटे पूजेच्या वेळी इथे यावे आणि या शिल्पाचे तेजस्वी भाव डोळय़ांत साठवून घ्यावेत. ही अष्टभूजा महिषासुरमर्दिनी! तिच्या मस्तकावर शिवलिंग कोरलेले. डावीकडील पहिल्या तीन हातात शंख, ढाल, धनुष्य ही आयुधे तर चौथ्या हातात महिषासुराचे केस पकडलेले. उजवीकडे पहिल्या तीन हातात खड्ग, बाण, चक्र तर चौथ्या हातातील त्रिशूळ तिने महिषासुराच्या शरीरात खुपसलेला. तेज, त्वेष आणि क्रोधाचे सारेभाव या दुर्गेच्या अंगी! जणू तिच्या या क्रोधात पायाखाली तो अफझलखानच भरडतो आहे. व्यक्तीपेक्षाही वृत्ती! भवानी मातेच्या या मूर्तीच्या पायाशी छत्रपती शिवरायांच्या पूजेतील एक स्फटिकाचे शिवलिंग आहे. अतिशय अनमोल अशी ही पूजनीय वस्तू! असे म्हणतात, कापराच्या उजेडात ते पाहिले तर त्यामध्ये बिल्वपत्र, तुलसीपत्र आणि गंगा दिसते.
शिवरायांनी या भवानीमातेची प्रतिष्ठापना केली, तिची व्यवस्थाही लावून दिली. ती आजही परंपरेने सुरू आहे. रोज तिच्या जागरणी – शयनी चौघडा झडतो. शिंगाडे – कर्णेकरी दीर्घनाद घुमवतात. हडप पूजा-अर्चा करतात. प्रत्येक पौर्णिमेला पालखी निघते आणि त्रिपुरारीला दीपमाळा पाजळतात.
वर्षांतील एखाद्या पौर्णिमेला तरी इथे येऊन हा सोहळा पाहिलाच पाहिजे. पौर्णिमेच्या या चांदण्यात देवीची पालखी निघते. शिंगाचा ललकार आणि संबळ – झांजांच्या आवाजात देवीचा जागर सुरू होतो. चांदण्या रात्रीच्या त्या गूढ छाया-प्रकाशात, मशालींच्या उजेडात ही पालखी गडभर फिरते. या वेळी जणू सह्य़ाद्रीच्या या गहण-गाभाऱ्यात, प्रतापगडी ‘शिवकाल’च अवतरतो.
छत्रपती शिवराय भवानी मातेच्या दर्शनासाठी नेहमी येत. राज्याभिषेकापूर्वीही ते आले होते. या वेळी त्यांनी देवीला सव्वा मण वजनाचे सुवर्णछत्र अर्पण केले. पण पुढे १९२९ मध्ये मंदिरावर पडलेल्या दरोडय़ात हे सारे धन – अलंकार चोरीला गेले. या मंदिरावर दरोडा पडला, एकदा आग लागली, वीजही पडली. जणू समाजावर आलेली सारी अस्मानी-सुलतानी संकटे भवानी मातेने स्वत:वर घेतली.
भवानी मंदिराच्याच मागे दक्षिणेस गडाची आणखी एक सोंड गेली आहे. ज्यावर शेवटी एक छोटेसे तळे आहे. इथेच एक चोरदिंडीही बाहेर उतरते. गडाला अशा पाच चोरवाटा आहे. आजही त्या तेवढय़ाच दुर्गम. फक्त सध्या गडावर एवढी नवनवी बांधकामे होत आहेत, त्यामध्ये या ऐतिहासिक वास्तूच शोधाव्या लागतात.
भवानीमातेचे दर्शन झाल्यावर गडाच्या बालेकिल्ल्यावर निघावे. छोटय़ाशा दरवाजातून आत प्रवेश करताच आपण केदारेश्वराच्या दारात येतो. भोरप्याचा डोंगरावरील ही मूळ देवता. याच्या पुढय़ातच सदरेच्या बांधकामाचा ओटा दिसतो. मंदिरामागे जिजाबाईंच्या वाडय़ाचे अवशेष अद्याप आपल्या आठवणी टिकवून आहेत. प्रत्यक्ष गडावरही मधोमध महाराजांचा एक वाडा असल्याचे उल्लेख आहेत. पण इंग्रजांनी तो पाडून-जाळून टाकला. आता याच जागी एका उद्यानाची निर्मिती करत महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. आपल्याकडील एक सुंदर-भव्य असे हे शिवशिल्प!
वायुवेगाने उधळलेला तो अश्व, त्यावर स्वार शिवराय! त्यांचा एक हात लगामावर तर दुसऱ्या हातात उचललेली तलवार आकाशात उंचावलेली! शिवरायांचा तो आवेश पाहावा आणि तळाशी लिहिलेले वाक्य वाचावे- ‘‘.. माझ्या मायभूमीचे रक्षण हेच माझे परम कर्तव्य!’’
बालेकिल्ल्यावर याशिवाय नेहरू टोक, रेडका बुरूज, यशवंत बुरूज, सूर्य बुरूज, गोड तळे, नासके तळे, काही चोरवाटा दिसतात. एके ठिकाणी तटावर घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. ते आवर्जून पाहावे.
प्रतापगड महाराजांनी बांधला आणि औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीवेळी इसवीसन १६८९ चा काही काळ सोडला तर तो कायम स्वराज्याचा आधार राहिला. इंग्रजांनी १८१८ युद्धात तो जिंकला तरी त्यांनीच तो पुन्हा सातारच्या गादीच्या स्वाधीनही केला होता. आजही तो त्यांच्याकडेच आहे.
प्रतापगडाचा हा बालेकिल्ला पाहत असतानाच आपले लक्ष मात्र सतत भोवतीच्या सह्य़ाद्रीमंडळावर जात असते. पश्चिम अंगास रायगड, मंगळगड, चंद्रगड दिसतात. उत्तरेस तोरणा, राजगड, रायरेश्वरचे पठार दर्शन देते. पूर्वेस महाबळेश्वरच्या कातीव रांगा अंगावर येतात. कोयनेकाठचा वासोटाही धाक दाखवतो. दक्षिण अंगाकडे मकरंदगड, रसाळगड त्यांची ओळख सांगतात. डोंगररांगांचा हा खेळ पाहत असतानाच कोयनेच्या खोऱ्यात गुंतून पडायला होते. कोयनेच्या या काठावरच आग्नेय दिशेस एक मोठा माळ दिसतो. या माळावरच अफझलखानाचे सैन्य उतरले होते. आज मोकळय़ा दिसणाऱ्या या जागेची इतिहासाशी जुळणी करत असतानाच जगातील त्या एका महत्त्वाच्या लढाईचा थरार अंगावर रोमांच उमटवू लागतो.
.. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी, शके १५८१, गुरुवार १० नोव्हेंबर १६५९! भर मध्यान्हीची ती वेळ! ज्या वेळेने शिवरायांच्या स्वराज्याची दिशा ठरवली आणि विजापूरच्या आदिलशाहीची दशा केली. शिवभारतकार सांगतो.
‘‘शिवस्याफजलो वेद हृदयं स च तस्य तत्
नं विधिं तु विधिर्वेद वेद संघिविधिं जन : ’’
शिवरायांचे मन अफझूल ओळखत होता आणि अफझुलाच्या अंतरंगाचा ठाव शिवबाने घेतला होता. शामियान्यात खान प्रथम आणि शिवराय मागावून दाखल झाले. हेजिबांनी परस्परांचा परिचय घडवला. खानाने विश्वास उत्पन्न करण्यासाठी आपली समशेर दूर फेकून देत आलिंगन दिले. दोघे उराउरी भेटले. त्याचवेळी कपटी खानाने कटय़ार उपसत शिवरायांच्या कुशीत खुपसली. पण अंगात जिऱ्याचे बख्तर होते. त्यामुळे ‘हत्यार काटेगार न आले.’  दुसऱ्या क्षणी सावध शिवरायांनी मग खानाच्या पोटात जमदाड खुपसले. कोथळा बाहेर आला. सय्यद बंडा मदतीसाठी धावला, पण जीवा महालाने त्याचा हात तलवारीसह वरच्या वर उडवला. हजारो यवनांसह स्वराज्य गिळावया आलेल्या अफझलखानाचा वध झाला. ..कर्णे वाजले, तोफांचे बार उडाले आणि मग वारूळातून हजारो मुंग्या बाहेर पडाव्यात तसे जावळीत दडलेले मराठे खानाच्या फौजेवर तुटून पडले. आदिलशाहीचा सेनासमुद्र मराठय़ांनी एका आचमनात आटविला.
प्रतापगडाच्या या युद्धाने स्वराज्याचा सारा नकाशाच बदलला. शत्रूला धाक बसला, स्वकियांचाही बंदोबस्त झाला. ही लढाई केवळ पराक्रमाची, शौर्याचीच नव्हती तर त्यामागे त्या ‘जाणत्या राजा’चे लष्करी चातुर्य, बुद्धिमत्ता, हुशारी असे अनेक गुण होते. म्हणूनच साडेतीनशे वर्षे होऊन गेली, तरी या युद्धाचा अभ्यास आजही आमचे भारतीय लष्कर करते. जगातील प्रमुख लढायांमध्ये प्रतापगडाच्या युद्धाचा समावेश केला जातो. ..दरवर्षी मार्गशीर्ष षष्ठी-सप्तमीच्या दरम्यान शिवरायांच्या याच पराक्रमाची आठवण काढत हजारो तरुण प्रतापगडाकडे धावतात, जावळीचे हे खोरे पुन्हा जागे होते. शिवप्रतापदिन साजरा होतो. भाग्य हे स्वराज्याचे आणि प्रतापगडाचेही!

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Two youths from Motala taluk along with international Attal gang robbed National Bank in Telangana state
तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील
Rabi sowing in the country is on 428 lakh hectares
देशातील रब्बी पेरण्या ४२८ लाख हेक्टरवर; जाणून घ्या, देशभरातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र
Controversy over bursting of crackers during procession riots in dhad
बुलढाणा : मिरवणुकीत फटाके फोडल्यावरून वाद, धाडमध्ये दंगल
Story img Loader