पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या वतीने नुकतीच ‘माऊंट एव्हरेस्ट’वरील एका माहितीपटाचे अनावरण झाले. या कार्यक्रमासाठी भारत आणि नेपाळमधील अनेक ज्येष्ठ गिर्यारोहक आले होते. यातील काहींशी या खेळ, छंदाविषयी साधलेला हा संवाद!
‘‘महाराष्ट्र हा डोंगरदऱ्यांनी व्यापलेला प्रदेश आहे. या सहय़ाद्रीच्या रांगांवर अनेक ऐतिहासिक गडकोटांनी ठाण मांडलेले आहे. त्यामधून छत्रपती शिवाजीमहाराजांचा ज्वलंत इतिहास इथे साकारला आहे. तेव्हा अशा या इतिहास-भूगोलाने भारलेल्या महाराष्ट्रात गिर्यारोहणासाठी तशी नैसर्गिकच प्रेरणा आहे. या वाटेवर नव्या पिढीने केवळ स्वार होण्याची गरज आहे. तसे झाल्यास हा छंद तुमच्यावर कधी स्वार होईल हे तुम्हालाही कळणार नाही..!’’
माऊंट एव्हरेस्टवर १९६५मध्ये गेलेल्या पहिल्या भारतीय यशस्वी मोहिमेचे नेते कॅप्टन एम. एस. कोहली यांच्या जुन्या आठवणींबरोबरच महाराष्ट्र आणि गिर्यारोहणाच्या नातेसंबंधावरही भाष्य करत होते. हे सांगताना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्यास महाराष्ट्रातून अनेक चांगले गिर्यारोहक तयार होतील असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील भूगोल आणि इतिहासाची ताकद स्पष्ट करताना कोहलींनी स्वत: आपल्या गिर्यारोहणाची सुरुवातही महाराष्ट्रातील गडकोटांच्या साक्षीनेच झाल्याची कबुली दिली. भारतीय नौदल, हवाईदल, आयटीबी पोलीस अशी संरक्षण दलाच्या विविध विभागांत सेवा बजावलेल्या कोहलींची अगदी सुरुवातीला लोणावळय़ाजवळच्या ‘आयएनएस शिवाजी’ येथे काही काळ नेमणूक झालेली होती. या वेळी नित्य सरावाच्या
महाराष्ट्रातील या पर्वतरांगांची ताकद स्पष्ट करताना कोहली म्हणाले, ‘‘त्या तुम्हाला खुणावत असतात, बोलवत असतात आणि आव्हानही देत असतात. त्यांचे हे आकर्षण आणि आव्हान आमच्या पावलांना खुणावतात. यातूनच मग डोंगरावर, त्या निसर्गात वर-खाली होण्याचा सिलसिला सुरू होतो. गिर्यारोहणासाठी आवश्यक असणारी ही नैसर्गिक प्रेरणाच या महाराष्ट्रात आहे. यामुळेच गिर्यारोहणाच्या जगात महाराष्ट्राचे नाव खूप आदराने घ्यावे लागते. महाराष्ट्रात गडकिल्ल्यांच्या साहाय्याने चालणाऱ्या गिरिभ्रमणाला शास्त्रोक्त तंत्रशिक्षणाची जोड देण्याची आवश्यकता व्यक्त करताना कोहली म्हणाले, ‘‘हिमालयात गिर्यारोहण प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, त्याप्रमाणे एखादी संस्था महाराष्ट्रात सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेला पुढाकार घेता येईल.’’
वयाची ८० उलटलेले कोहली आजही या खेळात सक्रिय आहेत. साहसी खेळाचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य करत आहेत. यासाठी ते अनेक देशांचे सल्लागार म्हणूनही काम पाहात आहेत. या विषयावर पंचवीसहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मभूषण, अर्जुन, पंजाब सरकारचा ‘निशान-ए-खालसा’, तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार आदी सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
‘‘माऊंट एव्हरेस्ट हे माझे पहिले प्रेम आहे. गेल्या अनेक वर्षांत मी त्याच्याशिवाय दुसरा विचारच केलेला नाही. एक ना दोन तब्बल १४ वेळा त्या ‘सगरमाथा’ने मला त्याच्या शिरी पाऊल ठेवू दिले. आता याच ‘एव्हरेस्ट’वर पुढील चढाई करणार आहे, ती माझ्या देशातील हृदयरुग्णांसाठी’’
जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर तब्बल १४ वेळा आणि त्यातही शेवटच्या तीन चढाई तर या चालू, एकाच हंगामात केवळ नऊ दिवसांत, अशी विक्रमी कामगिरी करणाऱ्या कामी शेर्पा यांनी त्यांची ही नवी मनीषा मांडताच समोर साक्षात ‘एव्हरेस्ट’च उभा राहिल्याचा भास झाला. गिर्यारोहण क्षेत्रात स्वत: उत्तुंग शिखराएवढी कामगिरी केलेल्या कामी शेर्पा यांनी त्यांच्या या एव्हरेस्ट प्रेमाचा उपयोग आता त्यांच्या देशबांधवांसाठी करून घेण्याचे ठरवले आहे.
चौदा वेळा हे सर्वोच्च शिखर सर करणारे कामी शेर्पा यांची पुढील वर्षीची एव्हरेस्ट मोहीम खूपच आगळी वेगळी आहे. ही मोहीम ते बांगलादेशच्या समुद्रकिनाऱ्यापासून सुरू करणार असून तिथून ते नेपाळपर्यंतचे तब्बल एक हजार किलोमीटरचे अंतर पायी चालत येत या सर्वोच्च शिखरावर चढाई करणार आहेत. आपल्या या नव्या मोहिमेने, आगळ्या-वेगळ्या साहसाने ते साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणार आहेत. पण त्यांचे हे लक्ष विशिष्ट कारण-हेतूसाठी त्यांनी राखून ठेवलेले आहे. नेपाळमधील वाढत्या हृदयरुग्णांवरील उपचार, या आजाराच्या उपाययोजनांचा प्रसार यासाठी ते ही मोहीम करणार आहेत. बांगलादेश आणि नेपाळमध्ये असलेल्या मोठय़ा प्रमाणातील व्यसनाधिनतेमुळे हृदयरुग्णांचे प्रमाण वाढत आहे, त्यासाठी या मोहिमेतून व्यसनांच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे.
‘‘सारे जग अस्वस्थ-अस्थिरतेच्या उंबरठय़ावर उभे आहे. कालपर्यंत ही अस्थिरता फक्त नैसर्गिक आपत्ती, अपघातापर्यंत मर्यादित होती, पण आता याला घातपाताचीही जोड मिळाली. हा दहशतवाद आता साऱ्यांच्याच उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. अशा वेळी त्याला सामोरे जाण्यामध्ये गिर्यारोहण खेळाची मदत नक्की होते. हा छंद भक्कम शरीराबरोबर कणखर मन तयार करतो.’’
चार वेळा वेगवेगळय़ा मार्गानी आणि कारणांसाठी एव्हरेस्ट सर करणारे लवराज धर्मसक्तू या खेळाचा आणखी एक पैलू सांगत होते. सध्याच्या काळाला उपयुक्त, जवळचा वाटणारा! सीमा सुरक्षा दलाच्या सेवेत असणारे लवराज गेली अनेक वर्षे दिल्लीत राहून या खेळाशी समाज जोडण्याचे, त्यातही शाळकरी मुलांना याची गोडी लावण्याचे काम करत आहेत. त्यांच्या बोलण्यातून या छंदातील प्रत्यक्ष चढाई-उतराईपेक्षाही हे अन्य पैलूच जास्त चर्चेला आले आणि तेच जास्त महत्त्वाचे वाटले.
‘‘हा निव्वळ छंद, खेळ नाहीच, तर ती एक चांगले-सुदृढ व्यक्तिमत्त्व घडवणारी सवय आहे. अशा सवयी असलेल्या व्यक्तिमत्त्वातूनच पुढे चांगला समाज बांधला जातो..’’
लवराज यांच्या बोलण्यातून गिर्यारोहणाचे हे अन्य जगही चर्चेला आले. आजवर चार वेळा एव्हरेस्ट आणि जवळपास तेवढय़ाच उंचीची अन्य बत्तीस शिखरे सर करणारे लवराज या प्रत्येक मोहिमेमागे काही विचार घेऊन जात आहेत. नुकतीच मे २०१२मध्ये चौथ्यांदा सर केलेल्या एव्हरेस्ट मोहिमेसाठीही त्यांनी ‘एव्हरेस्ट कचरा निर्मूलन’ हेतू बांधला होता. त्यांच्या मोहिमेतील सदस्यांनी एव्हरेस्टच्या शिखरावरून परत येताना तब्बल १२०० किलो कचरा खाली आणला.
लवराज म्हणतात, ‘‘आज हिमालयात अनेक शिखरांना बर्फाच्या जोडीने अशा कचऱ्यानेही वेढले आहे. खाद्यपदार्थाची वेष्टने, प्लॅस्टिक, तंबू, वापरलेले ऑक्सिजन सिलिंडर, दोर, एवढेच काय तर मानवी विष्ठादेखील, या साऱ्यांनी आमची ही हिमशिखरे प्रदूषित, गलिच्छ होऊ लागलीत. वाढत्या प्रदूषणापासून हिमालयाला वाचवायचे असेल तर गिर्यारोहणाच्या खेळात प्रत्येकानेच काही सभ्यता-नियमही अंगीकारावे लागणार आहेत.’’
अशा पद्धतीच्या शास्त्रशुद्ध, निकोप आणि समाज घडवणाऱ्या गिर्यारोहणाच्या प्रसारासाठी लवराज सध्या प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी दिल्लीतील शाळकरी मुलांवर सध्या लक्ष केंद्रित केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा