पाऊस या शब्दातली जादू आणि पावसाच्या अनुभवाची जादू, ज्याची त्यानेच अनुभवावी अशी असते. उन्हाच्या तापाने, हल्लक, सैरभैर झालेले मन, पावसाच्या शिडकाव्यानेच स्थिर होते. ओलावते. हळूहळू आसमंताला, मनाला ‘हिरवी झिंग’ चढत जाते आणि एक वेळ मात्र अशी येते, की
झडी लागून राहिल्या पावसाच्या
नसे ऊन्ह स्वप्नात दिसाच्या
सगळेकाही ठप्प! अविरत पाऊस, घनगर्द उदास आभाळ आणि हुरहुरणारे मन!
‘‘काहीच नको’’ अशी अवस्था. पक्षीपाखरे घरटय़ात चिडीचूप, फुलांनी, वेलींनी, दांडग्या पाऊसथेंबांपुढे शरणागती पत्करलेली आणि चहुवार फक्त नको वाटणारा गारवा आणि ओला वास, भरून राहिलेला स्पर्श, स्वर, रंग आणि गंध यांची जाणीव करून देणारी इंद्रिये हताश झालेली असताना ‘जिव्हा’ मात्र तुमच्या अस्तित्वाला साद घालत असते. पाऊसकाळात स्पर्श, स्वर, रंग, गंध यांचा आनंदभंडारा लुटण्यासाठी निसर्गाने कित्येक ‘पाऊसखुणा’ जागोजाग उमटवलेल्या असतात. मग रसनाच रीती का राहावी? मात्र त्यासाठी थोडी ‘हटके’ इच्छा असावी लागते. थोडी ‘हटके’ भटकंती करावी लागते, थोडे ‘हटके’ जिव्हालौल्य असावे लागते.पाऊसकाळात काही विशिष्ट रानभाज्या उगवतात. त्यांची लज्जत औरच असते. आवडो न आवडो, पण एकतरी अनुभव घ्यायला काय हरकत आहे! सहजच एकदा मोजदाद केली तर दीड-दोनशे रानभाज्या आहेत असे लक्षात आले. घाटावरच्या वेगळय़ा, कोकणातल्या वेगळय़ा, मुंबईजवळच्या वाडय़ातल्या वेगळय़ा! पावसाळी रानभाज्यांची संख्या जरा जास्तच असते. पावसात, रानवाटांवरून चालताना या ‘रानसया’ ओळख दाखवायला लागतात. कुर्डू, पाथरी, भारंगी.. कुणी हृदयासाठी चांगली, कुणी किडनीसाठी, कुणी रक्तशुद्धीसाठी! भारंगी तर बहुगुणीच- रूपगुणांनी युक्त! तिची जांभळी फुले जितकी सुंदर तितकीच तिची भाजीही मस्त. पाथरी, पत्थरालगत वाढते म्हणून पाथरी किंवा तिला प्रस्तरिणीही म्हणतात. पण या रानभाज्यांबाबत दोन नेम काटेकोरपणे पाळावेच. त्या कधीही मुळापासून उपटू नयेत, फक्त पानेच खुडावी आणि एकदाच खाव्यात. कोकणात अशी ‘तेरं’ मिळतात, पावसात! ‘तेरं’ म्हणजे दुसरे-तिसरे काही नाही तर अळूची कोवळी, छोटी पाने. त्यांची भाजी विशिष्ट पद्धतीनेच करायची. तीही नियमानुसार एकदाच करून खायची आणि वर्षभर ‘तिच्या’ आठवणी काढून झुरायचे, उसासे टाकायचे. अर्थात ‘तेरं’ म्हणजे अंगणा-परसात मुद्दाम रुजवलेले अळू नव्हे. रानात, ओढय़ा-ओहोळांकाठीच ती शोधावी लागतात. मुंबईकरांना पावसाळय़ातच फक्त मिळणारी, ‘शेवरं किंवा शेवळं’ खास मर्जीतली. त्यांची उस्तवारही तितक्याच हिमतीने करतील. अशीच एक शेंडवळ नावाची भाजी असते. भाजी कसली, नाजूक मोत्यांचे अलवार घोसच! गंधही नाजूक साजूक. शेंडवळाची भाजी खायची म्हणजे दुष्टपणाच! याच दिवसातला एक मोठ्ठा घोळ म्हणजे ‘घोळ’ नावाची भाजी. इतर रानभाज्यांच्या मानाने मुबलक असते आणि चविष्टही! पावसाळी भटकंतीत या पाऊसखुणाही कधी चाचपून पाहाव्यात!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा