एका नदीच्या वळणाची ही गोष्ट! .हिरवाकंच डोंगर, शेकडो रानफुलांसह उमललेला. या हिरवाईतून चंद्रकोरी वळण घेत मधोमध वाहणारी ती नीरा नदी. तिच्या केवळ या आकाराने या स्थळाला सौंदर्य-चेहरा बहाल केला. यातून जन्माला आले एक रमणीय स्थळ!

‘विस्तीर्ण नदीचा काठ,
पसरली दाट फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट,
कुणी सैराट बावरा पक्षी!’’
पुण्याजवळील भोरच्या दिशेला जात असताना भोर अलीकडेच काही अंतरावर एका डोंगरावरून खालचे दरीतले दृश्य पाहिले आणि कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कधीतरी वाचलेल्या त्या पंक्ती एकदम आठवल्या.
काय होते ते दृश्य! ..हिरवाकंच डोंगर, शेकडो रानफुलांसह उमललेला. त्याची ही हिरवाई त्याच्या अंगाखांद्यावरून थेट समोरच्या क्षितिजापर्यंत पोहोचलेली. दूरवर दाटून आलेल्या नभाचे लोट त्यावर उतरू पाहणारे. मधेच त्या ढगांआडून श्रावण-भाद्रपदातील ते उन्हाचे कवडसे झिरपणारे. ..आणि अशा या ओलेत्या हिरवाईतून चंद्रकोरी वळण घेत मधोमध वाहणारी ती नीरा नदी!
..अचानकपणे पुढय़ात उभ्या राहणाऱ्या या निसर्गदृश्याने स्तिमित व्हायला होते.
नीरेचा चंद्रहार! एका नदीच्या वळणाची ही गोष्ट! तिच्या केवळ या आकाराने या स्थळाला सौंदर्य-चेहरा बहाल केला आहे. कुठे दूरवर वरंध घाटात उगम पावणारी ही नीरा नदी भोर शहराला सलगी देत, भाटघर धरणाच्या अंगणातून पुढे सरकते. या धरणाजवळच संगम गावात या नीरा आणि वेळवंडी नदीची गाठभेट होते. या भेटीमुळेच या गावाला संगम असे नाव मिळाले. वेळवंडी नदी भाटघरला पाणी पुरवणारी. दोन खोऱ्यांत स्वतंत्र संसार मांडणाऱ्या या बहिणी इथे एकत्र येतात आणि नदीचा प्रवाह आणखी सशक्त होतो. नीरेचे नाव घेतच वाहू लागलेली ही सरिता पुढे काही अंतरावर डोंगर-टेकडय़ांना धडकते. मग यातून वाट काढता काढताच या प्रवाहाला एका चंद्रकोरीचा आकार मिळाला आणि त्यातून जन्माला आले एक रमणीय स्थळ!
नीरा नदीचे हे सौंदर्य पाहण्यासाठी भोरची वाट पकडावी. पुण्याहून भोर ६० किलोमीटर. पुणे-बेंगलोर महामार्गावर कापूरहोळहून भोरसाठी फाटा फुटतो. या फाटय़ावरून वळलो, की सात ते आठ किलोमीटरवर खंडोबाचा माळ नावाचा डोंगर-टेकडीचा भाग लागतो. याच्या माथ्यावर जाऊन थांबायचे. सुरुवातीला नवख्यांना या माळावर का थांबलो असाच प्रश्न पडतो. पण मग थोडेसे डावीकडे चालत गेलो आणि समोरच्या दरीतले ते अद्भुत दृश्य पाहिले, की थांबण्यातील रहस्य उलगडते आणि पाहणाऱ्यांचे चेहरेही उजळतात.
नीरेचा हा देखावा कधीही आले तरी चार घटका मन रमवणारा-गुंतवणारा! पण यातही पावसाने भाद्रपदात प्रवेश केला, की इकडे वाट वाकडी करावी. साऱ्या डोंगरदऱ्या नखशिखान्त हिरव्यागच्च झालेल्या असतात. त्यावर सोनकी, तेरडा, कवल्या, आभाळी, नभाळी, सीतेची आसवं, गेंद अशा नाना प्रजातींची, नाना रंग-आकारांची रानफुले उमललेली असतात आणि हिरवाईच्या याच देखाव्यावर लाल-गढूळ पाण्याचे एक भलेमोठे पात्र चंद्रकोरीचा आकार घेत पुढय़ात साकारलेले असते. ..जणू त्या हिरव्या सृष्टीच्या गळय़ातील चंद्रहार!
इथे डोंगरकाठावर-उंचीवरून हे सारे दृश्य पाहताना खूपच प्रसन्न वाटते. मन गुंतून जाते. सर्वत्र व्यापून राहिलेले ते गूढ आकाश, काळय़ा-जांभळय़ा ढगांनी भरलेले असते. खाली दूरवर क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवाई आणि या हिरवाईतूनच मधोमध उमटलेली ती नीरेची चंद्रकोर! तिचे ते गढूळ पाणी मातीचे गायन गात असते. रंगाचा हा पट्टा कुठून येतो आणि कुठे जातो हे कुतूहल जागे होते. ते शमवताना या पात्राभोवतीचे ओढे-नाले, गावे, भाताची शेती ही अन्य पात्रेही या चित्रात रंग भरू लागतात. दूरवर भाटघरचा तो चमचमता जलाशय या साऱ्या दृश्याला गूढ करत असतो. शांतता ही तर या स्थळाचा आत्मभाव. इतकी, की जणू स्वत:चा शोध लागावा. तिच्यात चिंब बुडालो असतानाच कुठूनतरी मोरांचे आवाज लक्ष वेधून घेतात. मग समजते या देखाव्यात हे मयूरपंखही बागडतात. प्रसन्नतेला चैतन्यही लाभते. एका नदीचा प्रवाह शोधता शोधता गुंतायला होते. मधेच अंधारून येते, एखादी छोटीशी सर भवतालच्या सगळय़ा गवतावर मोती पसरून जाते आणि मग पाठोपाठ उतरणाऱ्या उन्हाच्या कवडशांवर हे सारे मोती चमचम करू लागतात. कधीतरी अचानकपणे समोर त्या क्षितिजावर इंद्रधनूचे चाप उमटतात. ..‘नीरेच्या चंद्रहारा’च्या साक्षीने सुरू असलेले हे निसर्गाचे खेळ पाहता पाहताच समाधी लागून जाते.
   

**Why does the Earth appear flat despite being round?**
Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !