आपण पाहिलेलं, अनुभवलेलं दुसऱ्याला सांगणं हे प्रत्येकालाच आवडतं. डोंगर भटकंती ही तर अशा अनुभवांची, आठवणींची जणू खाणच असते. चार भिंतींबाहेरच्या या विश्वात विलक्षण अफलातून अनुभव येतात. कधी वाट चुकलेली असते तर कधी मस्त पावसाळी ट्रेकच्या चिंब भिजलेल्या आठवणी असतात. कधी थकले भागलेले अनुभव असतात, कधी डोंगरमाथ्यावर शेकोटीची ऊब देणाऱ्या आठवणी असतात. तर कधी एखाद्या जनावराच्या चाहुलीने हवालदिल होऊन सारी रात्र जागविल्याच्या अनुभव असतो. कोणत्याही ट्रेकरकडे अशा एकापेक्षा एक आठवणींचा, अनुभवांचा खजिनाच दडलेला असतो. ट्रेकमध्ये जरा कोठे टेकायला मिळालं की कोणीतरी गप्पिष्ट त्याच्या आठवणींची ही सॅक उघडतो आणि सारेच जण त्यात हरवून जातात. खरं तर हीदेखील एकप्रकारची भ्रमंतीच असते.  नेहमी भटकणाऱ्यांना आठवणीत हरवून टाकणारी, तर डोंगरात न गेलेल्यांसाठी मार्गदर्शन ठरणारी हा भ्रमंती. अर्थात या अनुभवांचे, आठवणींचे प्रारंभिक स्वरुप हे मात्र मौखिकच होते. तीर्थाटनाच्या, व्यापाराच्या निमित्ताने भटकणारे प्रवासी, व्यापारी, यात्रेकरु मात्र आपल्या रोजनिशीत किमान तांत्रिक नोंदी करत असत. अशाच प्रकारच्या नोंदी अनेक गिर्यारोहकांनीदेखील नियमितपणे केल्या आहेत. या नोंदीना पुढे फार महत्त्व आले. अर्थात केवळ तांत्रिक नोंदीबरोबरच अनुभव कथनाची, ट्रेकिंगची गोष्ट सांगण्याची याला जोड मिळाली असली तरी त्याचे स्वरुप मात्र मर्यादितच होते. महाराष्ट्रात डोंगरभटकंतीची सुरुवात होऊन आता अर्धशतक उलटले आहे, तरी अनुभव कथनाची, गोष्ट सांगण्याची ही ओढ आजदेखील ताजी आहे. विविध माध्यमांचा प्रसार वाढल्यावर तर हे व्यक्त होणं आणखीच वाढत गेलं. जुन्या रोजनिशींची जागा पुस्तकांनी घेतली, तर नव्या पिढीने लिखित माध्यमाच्या पलीकडे जात ‘इंटरनेट’चा आधार घेत या अक्षरभ्रमंतीला वेगळा आयाम दिला. ब्लॉगिंगच्या माध्यमातून या नव्या पिढीने अक्षरभ्रमंतीला एक अनोखा पैलू जोडला असे म्हणायला हरकत नाही. डोंगर वेडय़ांच्या विश्वात या नव्या पिढीने गेल्या काही वर्षांत मनसोक्त अक्षरभ्रमंती केली आहे. अशाच काही ‘ट्रेकर्स टू ब्लॉगर्स’ची ही ओळख या सदरामध्ये, त्यांच्याच शब्दात!
‘दुर्गसखा’ची सामाजिक भ्रमंती
सह्य़ाद्रीच्या रांगा वरखाली करताना, त्यावरचे वैभव पाहता-पाहताच तिथल्या निसर्ग-पर्यावरणाच्या रक्षणासाठी चार पावले टाकावीत, स्थानिक जनतेसाठी मदतीचे दोन हात द्यावेत आणि सारेच भ्रमण आनंदी, संस्मरणीय करावे या हेतूने त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आणि पाहता-पाहता सामाजिक कार्याचेही नवे डोंगर तयार झाले. ही सामाजिक भ्रमंती आहे, ठाण्यातील दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्टची!
२००९ सालच्या जुलै महिन्यात या संस्थेने सुधागड मोहिमेद्वारे आपल्या या आगळय़ा-वेगळय़ा दुर्गभ्रमंतीचा आरंभ केला. गडांवर जायचे, दुर्गदर्शन करायचे पण या जोडीनेच तिथे असलेला कचरा गोळा करायचा, प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करायच्या, गाळाने भरलेल्या टाक्या साफ करायच्या, गडाची माहिती देणारे फलक लावायचे, चार झाडे लावायची आणि असंख्य आठवणी घेत परत फिरायचे. संस्थेचा हा नित्यक्रम, ज्यातून त्यांनी उभारले आहे, नवे सामाजिक गिर्यारोहण!
या वर्षी संस्थेने माहुली किल्ल्यावर अशीच स्वच्छता मोहीम राबविली आणि दारूच्या बाटल्यांची तब्बल पंचवीस पोती गोळा झाली. कुठल्या गडावर संवर्धनाचे कार्य, कुठल्या गडावर मार्गदर्शक फलक लावणे..‘दुर्गसखा’चे हे कार्य वेगात सुरू झाले. होणाऱ्या प्रत्येक मोहिमेबरोबर संस्थेच्या या कार्यात भर पडत होती. संस्थेने नुकतेच या अशा मोहिमांचे अर्धशतक पूर्ण केले आहे.
आता या टप्प्यावर संस्थेने या अशा सामाजिक कार्यासाठी शहापूर तालुक्यातील पेंढरी नावाचे आदिवासी गाव दत्तक घेतले आहे. या पेंढरी आणि परिसरातील अन्य तीन-चार गावातील शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. गावाला पक्की शाळा नाही, वर्ग नाही, खोल्या नाही तिथे अन्य साधनांची तर गोष्टच दूर. अशा वातावरणात संस्थेने मदतीचे हात पुरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पेंढरीत आता बदल होऊ लागले आहेत. संस्थेचे सदस्य आणि सोबत येणाऱ्या भटक्यांनी चार पैसे या गावासाठी, इथल्या मुलांसाठी द्यायचे. मग या निधीतून या मुलांसाठी शालेय साहित्य जमा झाले. तब्बल दीड हजार मुलांना या साहित्याचे वाटप झाले. या साहित्यात वह्य़ा-पुस्तकांपासून ते संगणकापर्यंत अशा मोठय़ा ‘दप्तरा’चा समावेश आहे. आता संस्थेतर्फे या पेंढरी गावात पक्की शाळा उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. डोंगरदऱ्यातील भटकंती ही मनाला आनंद देणारी, दैनंदिन कामासाठी ऊर्जा पुरवणारी, असंख्य गोष्टींचे ज्ञान पुरवणारी असते. या अशा भटकंतीच्या वाटेवर ‘दुर्गसखा’ने बांधलेला हा ‘सामाजिक कार्या’चा दोर इतरांपेक्षा नक्कीच निराळा आहे.
(अधिक माहितीसाठी दुर्गसखा – ८६९८९५०९०९ किंवा durgasakha@gmail.com  
वर संपर्क साधावा) फिरस्ता

Story img Loader