नाणेघाट आणि त्याच्या परिसराला भटक्यांच्या जगात एक खास स्थान आहे. डोंगर-दऱ्या, इथले कोसळते कडे, आकाशात घुसलेले सुळके आणि या साऱ्यांच्या भवतालात घडलेला इतिहास या साऱ्यांमुळे भटक्यांची पावले कायम इथल्या डोंगररानी फिरत असतात. या साऱ्यांच्या केंद्रस्थानी असलेला तो नानाचा अंगठा तर या भटक्यांना कायमच आकर्षित करत असतो आणि आव्हान देत असतो. या नानाच्या अंगठय़ालाच यंदाच्या पावसात आम्ही काही साहसवीरांनी सलगी दिली आणि भर पावसात तो उभा कडा चढत त्या नानाच्या अंगठय़ावर पाऊल टाकले.
मुंबईच्या गिरिविराज संस्थेची ही साहसकथा! सलग दोन वर्षे केलेल्या प्रयत्नानंतर आम्हाला यंदाच्या पावसाळय़ात नानाच्या अंगठय़ाला जिंकता आले. गिरिविराज संस्थेला ऐन पावसाळय़ात सह्य़ाद्रीतील विविध कडे- सुळके  चढण्याची मोठी परंपरा आहे. जीवधनचा वानरलिंगी, नागफणी, रूद्र, हडबीची शेंडी, ढाक भैरीचा कळकरायचा सुळका असे तब्बल ४३ सह्य़सुळके संस्थेने ऐन पावसाळय़ात सर केले आहेत. या अंतर्गतच संस्थेतर्फे गेल्यावर्षीपासून नानाच्या अंगठय़ावर प्रयत्न सुरू होते. यामध्ये आमच्या चढाईला यंदाच्या पावसाळय़ात यश आले.
गेल्या महिन्यात १४ ऑगस्ट रोजी आमची ही मोहीम सुरू झाली होती. कोकणाच्या बाजूने चढाई करताना भिजून गलितगात्र होण्यापेक्षा आम्ही गिर्यारोहकांनी गाडीने थेट नाणे घाटाची नाळ गाठली. १५ ऑगस्टच्या सकाळी चढाईस सुरुवात केली. पाऊस थांबलेला होता. वातावरण एकदम स्वच्छ नसले तरी बऱ्यापैकी प्रकाश होता. काळे ढग जमा होत होते पण घाटात पाऊस न पाडता थेट पुढे जात होता. एकप्रकारे आमच्या चढाईस जणू निसर्गानेदेखील शुभेच्छा दिल्या होत्या. मागच्याच वर्षी या दिवसांत या कडय़ावर चढाई सुरू केली होती, त्यावेळी या बदलत्या हवामानानेच आमची संधी हिरावून घेतलेली होती. तेंव्हा यंदा मिळालेल्या या संधीचे सोने करत आम्ही चढाई सुरू केली.
सुरुवातीला नाणे घाटाच्या गुहेला समांतर रेषेत २०० फूट जात नंतर प्रत्यक्ष चढाईस सुरुवात केली. उर्वरित साडेतीनशे फुटांचा चढाईचा मार्ग हा पारंपरिक होता. खिळे लावत तो सुरक्षित केलेला आहे. पण आम्ही योग्य त्या ठिकाणीच या खिळय़ांचा उपयोग करत आमची चढाई सुरू केली. संध्याकाळी साडेचापर्यंत आम्ही यातील २०० फुटांची उंची गाठली आणि मोहीम थांबविली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मोहिमेस सुरुवात केली आणि पुढील दोन तासात उर्वरित चढाई पूर्ण करत आम्ही नानाच्या अंगठय़ावर झेंडा रोवला. गिरिविराज संस्थेतर्फे यापूर्वी २००५ साली नानाच्या अंगठय़ावर पाठीमागील बाजूकडून अगदी तळातून ९०० फुटांची चढाई
केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा