मनाली परिसरातील हिमालयाच्या पीरपंजाल भागामध्ये असलेल्या ‘हनुमान तिब्बा’ या हिमशिखरावर ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांनी नुकतीच यशस्वी चढाई केली. १९,७५३ फूट उंचीचे हे हिमशिखर चढाईसाठी अवघड श्रेणीतले मानले जाते. ‘गिरिप्रेमी’च्या आशिष माने, कृष्णा ढोकळे, परेश नाईक या तीन गिर्यारोहकांनी हे यश नोंदवले. नरेन पाटील यानेही या मोहिमेत सहभाग घेतला होता.
‘हनुमान तिब्बा’ हे हिमालयातील अवघड शिखरांपैकी एक मानले जाते. चढाईसाठी कठीण श्रेणीतली ही चढाई आहे. या चढाईसाठी बियास नदीच्या उगमाजवळ बियास कुंड (उंची १५,५०० फूट) इथे तळछावणी लावली जाते. पुढील सर्व चढाई ही तांत्रिक स्वरूपाची आहे. वाटेत वरच्या दिशेने अंगावर येणाऱ्या दगडांचा मारा चुकवत चढाई करावी लागते. अखेरची चढाई तर ९०० फुटांच्या बर्फाच्या भिंतीवरून आहे. यामध्ये ‘आइस पिटॉन’चा वापर करत ही चढाई करावी लागते. या साऱ्यांना तोंड देत ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांनी यश मिळवले. या वर्षांमध्ये इंद्रासन, नलिनी पाठोपाठ ‘गिरिप्रेमी’ने यशस्वी केलेली ही सलग तिसरी मोहीम.
या मोहिमेसाठी ‘गिरिप्रेमी’चे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आणि खेमराज ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा