डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करणारे अनेकदा या डोंगरांच्या जगातून धावणाऱ्या वाटांवरही रमतात. जुन्नरच्या पश्चिेमेला अशीच एक वाट या भटकंतीच्या जगात रममाण झाली आहे.
पुणे जिल्ह्य़ातील जुन्नरमध्ये फिरण्यासारखी खूप काही स्थळे आहेत. किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, देवराया, ग्रामीण आदिवासी संस्कृतीचे दर्शन देणारी जंगलांच्या कुशीत विसावणारी गावे असे बरेच काही इथे आहे. अशाच काही स्थळांची भेट घडवणाऱ्या जुन्नरमधील एका वाटेवर आज स्वार होऊयात.
जुन्नरहून आपटाळेमार्गे नाणेघाट आणि पुन्हा नाणेघाटातून घाटघरमार्गे जुन्नरला येणारी ही वर्तुळवाट. शिवनेरीच्या कुशीतून ही वाट निघते. थोडेसे अंतर गेलो, की डोंगरकुशीतील बौद्धकालीन तुळजा लेणी भेटते. तिचे ते कोरीव काम पाहायचे आणि पुन्हा पुढे निघायचे. थोडय़ाच वेळात आपण आपटाळे गावात पोहोचतो. या प्रवासात डाव्या बाजूला दिसणारे वरसुबाईचे डोंगर, आंबे हातविजला जाणारा इंगळूनचा घाट आपली सोबत करत असतो. आपटाळय़ातून २ मार्ग फुटतात. एक दाऱ्या घाटाकडे तर दुसरा आपल्या ठरलेल्या नाणेघाटाकडे जातो.
एव्हाना आपण घाटमाथ्यावरील वातावरण सोडून हळूहळू कोकणचा अनुभव घ्यायला सुरवात केलेली असते. जुन्नरच्या अगदी १५-२० किलोमीटरवर हा कोकणचा अनुभव. तो मनाची अवस्था तरल करून जातो. आजुबाजुला लाल माती, खळाळणारे झरे, देवराया वाटाव्यात अशी घनदाट झाडांची जमावट आणि या सर्वात आपल्याला घेऊन जाणारी ही वळणदार वाट. थोडय़ाच वेळात समोर एक अजस्र डोंगर दिसू लागतो. सगळीकडून २५०-३०० फूट नसíगकरीत्या तुटलेला कडा. या कडय़ावर तटबंदी. अरे हा तर चावंड किल्ला. तोंडातून शब्द बाहेर पडेपर्यंत आपण रस्त्यावरील चावंड पाटीजवळ येतो. उजवीकडे वळायचे आणि जंगल वाटेत हरवून जायचे. ही वाट आपल्याला चावंड किल्ल्याला थोडासा वळसा घालून चावंड गावात घेऊन जाते. डोक्यावरील टोपी पडेल एवढा उंच किल्ला आणि त्यावर चढण्यासाठी असणारी डोंगराच्या पोटात लपलेली वाट पाहून आपण अचंबित होतो. जितका चावंड किल्ला अजस्र, अभेद्य आणि अचल तितकेच सुंदर, निसर्गरम्य असे चावंड गाव.
गडावरची पुष्करणी, खोदीव तळी, अन्य वास्तू पाहायच्या आणि गड उतरत पुढे निघायचे. पुन्हा थोडय़ाच अंतरावर आणखी एक फाटा फुटतो. पूर गावाकडे निघतो. या गावात एक प्राचीन मंदिर दडलेले. कुकडेश्वर! कुकडी नदीच्या उगमस्थळी हे कोरीव मंदिर ९ व्या शतकात कुणा झंज राजाने बांधले. मध्यंतरी पुरातत्त्व खात्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर पाहायचे आणि पुन्हा मुख्य रस्त्याला येत नाणे घाटाकडे कूच करायची.
डावीकडे असणारा शंभूचा डोंगर जणु एखादा किल्लाच वाटावा अशा दिमाखात उभा असतो. मजल दरमजल करत, आजूबाजूचा निसर्ग अनुभवत, छोटे मोठे जलाशय, भाताची शेते आपली सोबत करत आपला प्रवास सुरू असतो. थोडय़ाच वेळात समोर तो नानाचा अंगठा दिसू लागतो. वातावरण स्वच्छ असेल तर उजवीकडे दूरवर भरवगडाची भिंत दर्शन देते. थोडय़ाच वेळात डावीकडे जीवधन किल्ला हसतमुखाने आपले स्वागत करतो. जीवधनचा सोबती वानरिलगी चा सुळकाही आव्हान देत असतो. वेळ असेल तर गडावर जायचे, नाहीतर पुढे निघायचे.
थोडे पुढे आलो, की नाणे घाटाच्या आधीच एकदम तुटलेला कडा आणि खोल दरी मनात धडकीच भरवते. हा अपूर्ण अवस्थेतला गुणा घाट. अजून पुढे गेलो, की नाणे घाटातील उजवीकडचा दगडी रांजण आणि गणेश मंदिर दिसू लागते. पावसाळ्यात इथे बऱ्याचदा धुके असते, त्यामुळे फार लांबचा परिसर दिसत नाही. पण धुक्याचा हा खेळही अनुभवण्यासारखा. नाणेघाट गेल्या २३०० वर्षांपासून महाराष्ट्राच्या आद्य राजा सातवाहनांचे भूषण सांगत आहे. दख्खनच्या तत्कालीन समृद्धीत नाणे घाटाचा फार मोठा वाटा राहिला आहे. त्याच्या या निमुळत्या नाळेतून खाली उतरताच समोर विस्तीर्ण पसरलेले कोकण उभे राहते. तळाशी सर्वत्र हिरवाई पसरलेली. नाणे घाटाची नागमोडी वाट या हिरवाईतून खाली उतरत असते. नाणे घाटातील गुहेत सातवाहनांनी केलेल्या दानधर्मावरचे ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. या परिवारातील सदस्यांची शिल्पेही इथे कोरण्यात आली होती. पण आता त्यांचे अवशेष शिल्लक आहेत. मनात आले तर जीवधनची चढाई करावी, नाणेघाट उतरून खाली जंगल वाट तुडवत कोकणात उतरावे किंवा बाजूच्या भोरांडय़ाच्या नळीने खाली उतरण्याचा आनंद घ्यावा आणि नसेलच काही करायचे तर इथेच नाणे घाटाच्या डोक्यावर निरभ्र आकाशदर्शन करत मुक्काम करावा. जुन्नर शहरापासून नाणेघाट ४५ किलोमीटर दूर आहे. पण मजल दरमजल करत हे अंतर जास्त वाटत नाही.
आता परत फिरताना निमगिरी-हजसरची वाट पकडायची. परतीच्या या वाटेवर नाणेघाटातून साधारण ५ किलोमीटरवर अजनावळे गाव लागते. या निसर्गरम्य गावातील देवराई बघण्यासारखी आहे. आपण पुढे जात राहावे आणि निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण करत राहावी..असाच हा रस्ता. काही अंतर गेलो, की निमगिरी गाव लागते. निमगिरी गावच्या पश्चिमेला डोक्यावर निमगिरीचा किल्ला छत्रछाया धरून अविचलपणे उभा असतो. वेळ असेल तर या गडाचे दर्शन घ्यायचे नाहीतर पुढे मार्गस्थ व्हायचे. परतीच्या या वाटेवर आपल्या एका बाजूला विविध डोंगर रांगा तर दुसऱ्या बाजूला माणिकडोह जलाशय आपली सोबत करत असतो. जलाशयाच्या पलीकडच्या तीरावर दिसणारा चावंडही आपल्यावर करडी नजर ठेवून असतो. नागमोडय़ा वाटेने सरकत असताना वाटेतच अचानकपणे हडसर गाव येते. याच्या डोक्यावरच तो हडसरचा किल्ला. खाली पायथ्यावरूनही त्याची ती अभेद्यता डोळय़ांत भरते. डोंगर कपारीशी लपून बसलेली वाट गडाचे निमंत्रण देते. हाताशी वेळ असेल तर या गडाचीही वारी करायची, अन्यथा पुढे सरकायचे. थोडय़ाच वेळात माणिकडोह धरणाजवळून ही वाट पुन्हा जुन्नर शहरात दाखल होते.
साधारण शंभर किलोमीटरच्या या प्रवासात शिवनेरी, चावंड, जीवधन, निमगिरी, हडसरसारखे किल्ले; तुळजा लेणी, कुकडेश्वर मंदिर, प्राचीन नाणेघाट अशी अनेक गिरिस्थळे त्यांचे दर्शन देतात. छोटी गावे, त्यातील देवराया, भोवतीच्या डोंगररांगा, त्यावरचे जंगल, नद्या, जलाशय असे बरेच काही या वाटेवर भेटते. डोंगररांगा भटकणाऱ्यांसाठी हा सारा भागच वेड लावणारा आहे. मग चला तर..!