हरिश्चंद्रगड ट्रेकला भटक्यांच्या जीवनात एक वेगळे स्थान आहे. या गडावर जाण्यासाठी सहा वाटा आहेत. आमच्या गिरिविहार संस्थेतर्फे यंदा यातील तीन वाटांनी एकाचवेळी गडावर चढाई करण्याचे ठरले आणि साऱ्या मोहिमेतच नवा जोश निर्माण झाला.
हरिश्चंद्रगड ट्रेकला भटक्यांच्या जीवनात एक वेगळे स्थान आहे. या गडावर जाण्यासाठी सहा वाटा आहेत. आमच्या गिरिविहार संस्थेतर्फे यंदा यातील तीन वाटांनी एकाचवेळी गडावर चढाई करण्याचे ठरले आणि साऱ्या मोहिमेतच नवा जोश निर्माण झाला.
भटके, गाडय़ा, रेशनिंग यांचे नियोजन सुरु झाले. सर्व तयारी होत या तिन्ही वाटेने जाणारी मंडळी निघाली. हरिश्चंद्रगडावर एकूण ६ वेगवेगळ्या वाटा जातात. एक ठाणे जिल्ह्य़ातून कोकणकडय़ाच्या पायथ्यापासून नळीची वाट, दुसरी पुणे जिल्ह्य़ातील खिरेश्वरहून जुन्नर दरवाज्याने, तिसरी खिरेश्वरहूनच टोलार िखडीतून, चौथी नगरमधील कोथळे गावातून टोलार िखडीतून, पाचवी नगर जिल्ह्य़ातील पाचनई वरून तर शेवटची नगर जिल्ह्य़ातील पाचनईवरूनच कोकण दरवाजाने. यातील पाचनईची वाट ही सर्वात आरामशीर आणि कमी वेळाची तर नळीची अंगावर येणारी, अवघड. आम्ही यातील तीन वाटांची निवड केली होती. एक नळीची, दुसरी जुन्नर दरवाजामार्गे तर तिसरी पाचनईकडील! यातील आम्ही पाचनईकडील वाटेने वर चढत होतो.
या सर्वात नळीची वाट म्हणजे एकदम भन्नाट. एक तर पार तळकोकणातून माथ्यापर्यंत चढाई आणि सोबतीला सतत कोकणकडय़ाचा भव्य पडदा. कोकणकडय़ाच्या उत्तरेला असलेल्या एका घळीतून ही वाट वर चढत जाते. पावसाळय़ात धो धो वाहणारे धबधबे ही सगळी वाट ठिसूळ करून टाकतात. आणि तेच पाऊस सरल्यावर इथे पाण्याचा कुठेही मागमूस शिल्लक उरत नाही. यामुळेच या काळात चढाईला आलात ,तर आठ नऊ तास स्वत जवळ असलेल्या पाण्यावर काढावे लागतात.
खिरेश्वर आणि नळीच्या वाटेचे सदस्य एकाच बसने निघाले. या वाटेने जाणाऱ्या १२ जणांना घाटाच्या खाली कोकणकडय़ाच्या पायथ्याशी सोडून बस वर खिरेश्वरला पोहोचली.
नळीच्या वाटेने जाणाऱ्या मंडळीनी पायवाट शोधण्यात वेळ जायला नको म्हणून वाटाडय़ा बरोबर घेतला. या टीमने प्रत्येकी साधारण ४ लिटर पाणी सोबत ठेवले होते. ही वाट कडय़ाच्या पश्चिम दिशेला अगदी कडय़ालगत असल्याने सूर्यदेव प्रसन्न व्हायला प्रत्यक्ष सूर्योदयापेक्षा जास्त वेळ लागतो. भल्या सकाळी मंडळींनी चालायला सुरुवात केली. वाटेत त्यांना एक पाण्याने भरभरून वाहणारा धबधबा लागला. वाटाडय़ाच्या माहितीनुसार हे पाणी नळीच्या वाटेतूनच खाली येत होते. याचवेळी वाटाड्याने अतिशय आत्मविश्वासाने संघनेत्याला सांगितले, कशाला इतके पाणी बाळगताय, नळी भरलीय पाण्याने! झाले, नाही तरी पाण्याचे ओझे बाळगणे जीवावर आलेच होते. प्रत्येकानेच मग आपापली इष्टाइल दाखवत पाण्याचे बुधले रिकामे केले. मजल दरमजल करत डोंगरभटके वर जाऊ लागले. निसर्गाच्या भव्यदिव्यतेची मजा घेत, कधी घसरत तर कधी दोराची मदत घेऊन चढू लागले. पण दोन तीन तास उलटले तरी पाण्याचा काहीच पत्ता दिसेना. यावर वाटाड्या म्हणे ‘काय की, गेल्या हप्त्यात आलो होतो तेंव्हा लई पाणी होते, एवढ्यात कसे सुकले कळत नई.’ त्याच्या या वाक्याबरोबर साऱ्यांच्या डोळय़ांपुढे मात्र काजवे चमकले. पण आता करता काय, वर पोहचेपर्यंत तग धरायलाच हवा होता. मजल दरमजल करत साधारण संध्याकाळी ४ च्या सुमारास मंडळी कोकणकडय़ाच्या माथ्यावर पोचली.
इकडे पाचनईकडील मंडळी म्हणजे आम्ही ६ जण अतिशय सुंदर अशा सावलीदार पायवाटेने साधारण तीन तासात पठारावर पोचलो. वाटेत आसमंताची, फुलांची तसेच फुलपाखरांची मनसोक्त छायाचित्रे घेतली. पण पठारावर पोचलो आणि जे काही ऐकले होते ते ओंगळ दृश्य आमच्या नजरेसमोर आले. गडावरील हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरासमोरच्या पठारावर काटक्यांनी बांधलेली झोपडीवजा किमान १० हॉटेल आमचे स्वागत करायला हजर होती. इथे सुटीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांचा आकडा ऐकून थक्क व्हायला झाले. दोनशे ते तीनशे लोक एका दिवसात गड दर्शन करून जातात. राहणाऱ्यांचा आकडाही दोनशेपर्यंत असतो. या सर्वाना सामावून घेईल अशी सांडपाण्याची, निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची इथे काहीही सोय नव्हती. हे सारेच त्रासदायक होते.
वर्षांनुवर्ष हे गड किल्ले सामान्य जनतेच्या खिजगणतीतही नव्हते. आमच्यासारखी मोजकी डोंगरवेडी मंडळी या गडावर वावरत होती, आता रस्त्यांच्या सोईमुळे म्हणा किंवा गिरीभ्रमणाचे एक विदारक पेव फुटल्यामुळे अनेक गडांवर हे असे विदारक दृश्य आता दिसू लागले आहे. हरिश्चंद्रगड हा त्यातलाच एक.
हरिश्चंद्रेश्वराचे हे मंदिर प्राचीन आहे. अतिशय सुबक असे कोरीवकाम असलेल्या देवळात राहण्यासाठी दगडात कोरून काढलेली ऐसपस गुहा आहे. या देवळात आम्ही विसावलो. शिदोरीतले पदार्थ संपवून जुन्नर दरवाज्याने येणाऱ्या सहकाऱ्यांची वाट पाहत बसलो. थोडय़ाच वेळात हा संघ आम्हाला येऊन मिळाला. मग आम्ही दोन्हीही गट नळीच्या वाटेने येणाऱ्या टीमचे स्वागत करायला कोकणकडय़ाच्या दिशेने निघालो.
संध्याकाळी चार पर्यंत ही टीमही वर पोहोचली. विजेत्याच्या आवेशात आम्ही सारे भेटलो. तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातून चढाई करून आलेले आमचे हे कंपू होते. एकाच गडावर एकाच वेळी अशी तीन मार्गानी होणारी ही अशी पहिलीच चढाई असेल. या साऱ्यांचाच आमच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि थरार होता. हाच आनंद घेत आम्ही सारे कोकणकडय़ावर आलो आणि समोरील सूर्यास्ताच्या साक्षीने या आठवणींना चिरंतन केले.
हरिश्चंद्रगडाची चढाई तीन वेगळ्या वाटांनी
हरिश्चंद्रगड ट्रेकला भटक्यांच्या जीवनात एक वेगळे स्थान आहे. या गडावर जाण्यासाठी सहा वाटा आहेत. आमच्या गिरिविहार संस्थेतर्फे यंदा यातील
आणखी वाचा
First published on: 08-01-2014 at 10:29 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trekking to harishchandragad