वर्षां सहलींना सध्या गती आली आहे. यामध्ये कुटुंबासह जाऊन पाहण्याजोगी आणि शांततेचा स्पर्श देणाऱ्या स्थळांच्या शोधार्थही अनेक जण असतात. अशांसाठीच पुणे जिल्हय़ातील भोर तालुक्यातील आंबवडे गाव खूप काही देऊनजाईल.
पाऊस कोसळू लागला, की ज्या काही ठिकाणांची आठवण होते त्यामध्ये पुणे जिल्हय़ातील रायरेश्वर ही अशीच एक हमखास जागा. वर्षां ऋतू सुरू झाल्यावर एकदा तरी या रायरेश्वराच्या पठारी जाणे होते. या प्रत्येक वेळी धावताना आणखी एक जागा मध्येच अडवते. पायांना बांधून ठेवते आणि मनाला भुरळ पाडते. ती म्हणजे आंबवडे!
हिरडस मावळातील हे एक छोटेसे गाव. डोंगरदरीत, हिरवाईच्या कुशीत पहुडलेले. गावाला खेटूनच एक खळाळता ओढा वाहतो. या ओढय़ाच्या काठावर दाट झाडीत एक प्राचीन शिवालय दडले आहे आणि या साऱ्यांच्या सहवासात कधीही गेलो, तरी केवळ नीरव शांतता आणि भरून राहिलेली प्रसन्नताच अनुभवायला मिळते!
..आंबवडेची ही अनुभूती गेली कित्येक वर्षे हृदयात साठवलेली आहे. म्हणून तर दरवर्षी वर्षांकाळ सुरू झाला, की रायरेश्वराच्या वाटेवर निघायचे आणि वाटेतील या आंबवडय़ात अडकायचे असा जणू नियम झाला आहे.
भोरपासून १० किलोमीटरवर हे आंबवडे गाव. इथपर्यंत येण्यासाठी भोरवरून एसटीची सोय आहे. डोंगरदरीतली ही वाट हिरवाईची सोबत करतच निघते. पावसाने सारा भवताल भिजून चिंब झालेला असतो. रस्त्याकडेला खाचरांमध्ये तरारलेला भात त्याचा गंध उधळत असतो. या अशा धुंदीतच आंबवडय़ाला पाय लागतात आणि मनातील ते स्वप्न सत्यात उतरलेले दिसू लागते.
खळखळत्या ओढय़ाच्या काठावर शांतपणे पहुडलेले ते गाव. ओढय़ाच्या पलीकडच्या तीरावर घट्ट झाडी आणि या झाडीतच दडलेले ते नागेश्वराचे प्राचीन शिवालय. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या एखाद्या सरीने स्वच्छ-ताजे झालेले हे दृश्य. त्याला पाहताच शरीराआधी मन चिंब भिजून जाते.
या दृश्यातील ते ओले रंग अनुभवण्यासाठी निघावे तो अगदी सुरुवातीलाच एक कमान आपले स्वागत करत पुढय़ात येते, ‘सर जिजिसाहेब सस्पेंशन ब्रिज’! आंबवडय़ाचे पहिलेच नवलविशेष!
आंबवडे हे भोरचे संस्थानिक पंतसचिव यांचे गाव. या संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी गावातच आहे. ही समाधी आणि नागेश्वर मंदिर या संस्थानकाळच्याच आठवणी. ही दोन्ही स्थळे ओढय़ाच्या पलीकडे. या पैलतीरी जाण्यासाठीच कधी संस्थानकाळी हा झुलता पूल इथे आकारास आला. आंबवडय़ात शिरणाऱ्या प्रत्येक पावलांचा काही काळ इथे या झुलत्या पुलावर रेंगाळतो.
आंबवडे गावाशेजारून वाहणारा हा ओढा म्हणजे छोटीशी नदीच आहे. चांगली रुंदी आणि खोली. म्हणून मग हे पात्र ओलांडण्यासाठी १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी केली. याची रुंदी ४ फूट तर लांबी दीडशे फुटांच्या घरात आहे. पुलाच्या दोन्ही अंगास रेखीव कमानी आहेत. त्यावर पुलाच्या बांधकामाचे तपशील सांगणारे लेख आहेत. माथ्यावर ‘ओम’ हे शुभचिन्ह कोरलेले आहे.
हा झुलता पूल भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित पंतसचिव यांनी आपली आई श्रीमंत जिजिसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधला. यासाठी त्या वेळी १० हजार रुपये खर्च आला. १५ नोव्हेंबर १९३७ रोजी मिरजेचे राजे सर गंगाधरराव ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या साऱ्या तपशिलाची नोंद या पुलाच्या दोन्ही बाजूकडील स्वागत कमानींवर घेतलेली आहे.
झुलत्या पुलाचा तपशील वाचला, की त्याच्यावरचे हे चालणे, हलणे आणखी मजेशीर वाटू लागते. ही गंमत अनुभवायची आणि पलीकडच्या तीरावर दाखल व्हायचे. अगदी सुरुवातीला आपण समाधी परिसरात येतो. एका मोठय़ा इमारतीत मधोमध भोरच्या राजाची, शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. छत्रपती संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या सीमांचे रक्षण करण्यात या पंतसचिवांचा मोठा वाटा होता. या समाधीशेजारीच संस्थानच्या राणीसाहेब जिजिसाहेब यांचा अर्धपुतळा आहे. ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांनी घडवलेला हा पुतळा पाहण्यासारखा आहे. या अशा स्मारकांच्या केवळ दर्शनातूनही इतिहासाच्या त्या पर्वात बुडायला होते.
या स्मारकाशेजारूनच एक वाट नागेश्वराकडे उतरते. हे मंदिर थोडेसे खोलगट भागात आहे. जुन्या मोठाल्या वृक्षांच्या गर्दीतूनच एक पायरी मार्ग वळणे घेत या नागेश्वरासमोर दाखल होतो. मोठा फरसबंदी प्राकार, भोवतीने तट, ओवऱ्या, पाण्याची कुंडे, पाण्याचे वाहते प्रवाह आणि या साऱ्यांच्या मधोमध उभे असलेले नागेश्वर मंदिर! एखादा नायक असावा असे.
दूरवरूनच ही रचना लक्ष वेधून घेते. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर एका उंच जोत्यावर उभे आहे. मंदिराच्या दर्शनी भागावरच एक लेख लावलेला आहे. ज्यामध्ये नागसंस्कृतीतील लोकांचा हा देव असून, या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केल्याचा अल्लेख आहे.
मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वाराभोवती नाजूक शिल्पकाम केलेले आहे. आतील स्तंभही शिल्पकलेने नटलेले आहेत. बाहय़भिंतीवर उमलती कमळे, झाडांच्या पानांचे नक्षीपट उठवण्यात आले आहेत. हत्तीवर अंबारीत स्वार झालेली कुणी राजमान्य व्यक्ती, शरभ, मोर आदी शिल्पांची रचना आहे. शिखरही असेच कोरीव. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराच्या मागील पूर्व अंगासही एक कोरीव दरवाजा असल्याचा भास होतो. पण जवळ गेल्यावर तो त्या स्थापत्याचाच एक भाग असल्याचे समजल्यावर उडायला होते.
आंबवडय़ाला वळसा घालत निघालेला तो ओढा इथे नागेश्वराजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे उडय़ा घेत धावत असतो. जवळ गेल्यावर त्याच्या तुषारांमध्ये भिजायला होते. पावसाळय़ातील त्याचे हे विराट रूप पाहण्यासारखे असते.
ओढय़ाचा हा खळखळाट अनुभवत मंदिर प्राकारात यावे तो ती नीरव शांतता पुन्हा स्पर्श करू लागते. मंदिराभोवती पाण्याच्या कुंडांची रचना आहे. ज्यातून पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत. पाण्याच्या या प्रवाहांनाही एक नाद असतो.
भोवतीची गर्द झाडी, त्यातील पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचे खेळते प्रवाह आणि या साऱ्यांच्या मधोमध उभा नागेश्वराचा तो प्राकार! हे सारे पाहता-अनुभवताना चित्त एकाग्र होऊ लागते. आपल्या या समाधीला, या शांत अनुभूतीला गाभाऱ्यातील तो घंटानाद खोलवरची कंपने पुरवत असतो. मध्येच पावसाची एखादी सर येते. तिच्या पाठी दरीत कोंडलेले ढगही उतरतात आणि सारेच चित्र धूसर होते. त्या धूसरपणात दिसणाऱ्या आकृतीलाही एक गूढता असते.
मुशाफिरी : आंबवडे
वर्षां सहलींना सध्या गती आली आहे. यामध्ये कुटुंबासह जाऊन पाहण्याजोगी आणि शांततेचा स्पर्श देणाऱ्या स्थळांच्या शोधार्थही अनेक जण असतात.
आणखी वाचा
First published on: 06-08-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trip to ambavade village in bhor taluka