दगडधोंडय़ांच्या महाराष्ट्रात चैतन्य फुललं ते पराक्रमी पुरुषांच्या रक्तसिंचनामुळे! इथल्या बहुतांश किल्ल्यांना पराक्रमाचा-शौर्याचा इतिहास आहे आणि या शौर्याचे पोवाडे आजही वर्षांकाठी त्या त्या ठिकाणी गायले जातात़ वसईच्या प्रसिद्ध किल्ल्यातही चिमाजी अप्पांच्या पराक्रमाचे पोवाडे दरवर्षी १७ डिसेंबरला गायले जातात़ निमित्त असतं त्यांच्या पुण्यतिथीचं़
अनेक गावांना आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या आणि ऐन भरातील पेशवाईच्या अनेक मातब्बरांचे पराक्रम पाहणाऱ्या वसईच्या किल्ल्याचीही आज महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणेच दुरवस्था झाली आह़े पडकी तटबंदी, ढासळते बुरूज आणि पुरातन वास्तूंचे भग्नावशेष, अशी किल्ल्याची सद्यस्थिती आह़े परंतु या ढासळत्या बुरुजांना छातीचा कोट करून सावरण्याचा यत्न काही स्थानिकांनी चालविला आह़े श्रीदत्त राऊत या तडफदार युवा इतिहास संशोधकाच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या दहा-पाच ध्येयवेडय़ांकडून वसईतील इतिहास जतन करण्याचे आटोआट प्रयत्न गेल्या दशकभरापासून सुरू आहेत़ ‘प्रत्येक रविवार किल्ल्यावर’ असं ध्येय असलेल्या या शिलेदारांमुळे किल्ल्यातील काही वास्तू तरी आज पाहण्यासाठी उपलब्ध होत आहेत़ किल्ल्यातील दारूच्या बाटल्यांचा खच जमा करण्यापासून ते ऐतिहासिक अवशेषांचे शास्त्रोक्त जतन करण्यापर्यंत कित्येक गोष्टी ‘किल्ले वसई मोहीम’ या शीर्षफलकाखाली केल्या जात आहेत़ कोणतीही शासकीय मदत न घेता स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून, वर्षभर किल्ल्यावर अनेक उपक्रम राबविण्यात येतात़ किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्यांना किल्ल्यांच्या इतिहासाची आणि वास्तूंची साधार माहिती देण्यात येत़े या उपक्रमांचाच एक भाग म्हणजे चिमाजी पुण्यतिथी!
ही पुण्यतिथी ‘मोहिमे’कडून अभिनव पद्धतीने पाळली जात़े दरवर्षी पुण्यतिथीच्या एक-दोन दिवस आधी श्रीदत्त पुण्यातील चिमाजींच्या ओंकारेश्वर मंदिराशेजारच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतो. तिथे दिवा लावतो आणि शनिवारवाडय़ातील हजेरी कारंज्यातून पाणी आणतो़ हे पाणी वसई गावातील निर्मळ गावातील विस्तीर्ण तलावातील पाण्यात एकत्र करून वसई किल्ल्यातील चिमाजींच्या पुतळय़ाला पुण्यतिथिदिनी त्याचा अभिषेक केला जातो़ त्यानंतर पुतळय़ाची पूजा केली जात़े यात श्रीदत्तसोबत मोहिमेचे शिलेदारही सहभागी होतात़ डहाणूच्या किल्ल्यावर संशोधनानिमित्त फिरत असताना श्रीदत्तला एक पंधरा किलो वजनाचा मराठेकालीन भरभक्कम दिवा सापडला होता़ हा ऐतिहासिक दिवा पुतळय़ासमोर या दिवशी लावण्यात येतो़ तसेच, चिमाजींसोबत सती जाणाऱ्या त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांच्या नावे या वेळी कलशपूजनही करण्यात येत़े त्याचबरोबर परिसरात रांगोळय़ांचे सडे सजविणे, नवे भगवे निशाण लावणे, असा कार्यक्रम असतो़ त्यानंतर चिमाजी अप्पा यांच्याविषयी श्रीदत्त उपस्थितींना व्याख्यान देतो़ गेली आठ वष्रे हा उपक्रम नित्य सुरू आह़े
(अधिक माहितीसाठी श्रीदत्त राऊत (९७६४३१६६७८) यांच्याशी संपर्क साधावा)
चिमाजींचे पुण्यस्मरण जागवणारा वसई!
दगडधोंडय़ांच्या महाराष्ट्रात चैतन्य फुललं ते पराक्रमी पुरुषांच्या रक्तसिंचनामुळे! इथल्या बहुतांश किल्ल्यांना पराक्रमाचा-
First published on: 11-12-2013 at 11:38 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai remembering chimaji appa