सिंधुसागराच्या तटावरील विजयदुर्ग सर्वाच्याच परिचयाचा आहे. या किल्ल्याच्या दोन बाजूने समुद्र तर एका बाजूने वाघोटन खाडी आहे. उर्वरित शिल्लक जमिनीची बाजू चिंचोळी आहे. या विजयदुर्गच्याच अलीकडे काही अंतरावर गिर्ये गाव आहे. इथेही या वाघोटन खाडीचा काही उपभाग आलेला आहे. या खाडीच्याच काठावर कोठारवाडीत गिर्येतील एक छोटासा कोट दडलेला आहे. इतिहासात विजयदुर्गच्या जाडीने महत्त्वाचे स्थान असलेला हा कोट आजवर अभ्यासक, पर्यटकांच्या नजरेतून मात्र पूर्णपणे सुटल्याचे दिसते. नुकतीच याची माहिती मिळाली आणि आमची भटकंती या कोटात घडली.
या कोटाकडे जायचे असल्यास विजयदुर्गचीच वाट पकडावी. या रस्त्यावर पडेल आणि गिर्ये गावाच्या दरम्यान ही वाघोटनची उपखाडी भेटते. या खाडीवर इथे पूल बांधलेला आहे. हा पूल इंग्रज काळातील आहे. त्या वेळी त्याचे बांधकाम उभे राहात नव्हते. तेव्हा इथे रेडय़ाचा बळी देण्यात आला. या घटनेमुळे या भागाला त्यावेळेपासून रेडे बांध नावाने ओळखले जाऊ लागले. ती ओळख आजही कायम आहे. खाडीवरील या पुलानंतर लगेचच एक रस्ता डावीकडे वळत कोठारवाडी नावाच्या गावाकडे जातो. या वाडीचे इथून अंतर आहे दीड किलोमीटरभर. या गावातच विजयदुर्गचा हा उपदुर्ग दडलेला आहे.
खरेतर विजयदुर्गची भूमी वाघोटन खाडी आणि समुद्र यांनी घेरलेली आहे. यामुळेच या वस्तीला आणि पुढे या गडाला घेरिया हे नाव पडले. या घेरियाचाच अपभ्रंश होत या गावाचे नाव झाले गिर्ये. या बेटासारख्या भागाला लागून असलेला जमिनीचा भाग म्हणून या उपखाडीच्या भागाला त्यावेळेपासूनच महत्त्व आले होते. यातूनच या खाडीच्या मुखावर (बेटाच्या बाजूस) चिरेबंदी बांधणीचा एक मजबूत कोट बांधण्यात आला. समुद्र आणि खाडीच्या पाण्यावर जागता पाहरा ठेवणारा हाच कोठारवाडी किंवा गिर्येचा कोट.
आज ही कोठारवाडी या किल्ल्याच्या आतच वसलेली आहे. या किल्ल्याला काही बुरुजांचे अवशेष आजही दिसतात. हा कोट समुद्रापासून खाडीच्या काठाने जवळपास ३०० फुटापर्यंत बांधण्यात आला असून तो टेकडीवर उंचावत गेला आहे. खाडीच्या काठावरील दोन बुरुज व थोडीफार तटबंदी आजही शाबूत आहे. समुद्रकाठावरील बुरूज लाटांचा मार अंगावर घेत आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. गडावरची एक तोफही इथे त्या इतिहासाच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवते आहे.
या परिसराच्या सुरक्षिततेसाठी समुद्राच्या बाजूने कातळावर ठिकठिकाणी टेहळणी बुरूज उभारण्यात आलेले आहेत. वर माथ्यावर वीराचे तळे नावाचा तलाव आहे. या तलावाच्या परिसरात या बुरुजांचे अवशेष आता काही वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. आज मात्र समुद्र व खाडीलगतचे बुरूज व तटबंदी वगळता इतर अवशेष नष्ट झाले आहेत.
हा परिसर गिर्ये गावाच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे यास गिर्येचा कोट म्हणणेच योग्य आहे. या गिर्ये गावची कोठारवाडी ही एक वाडी आहे. आता हे कोठारवाडी नाव सुद्धा बहुधा या कोटामधील कोठारातील साठय़ामुळे पडले असावे. पण एकूणच विजयदुर्गच्या इतिहासात या उपदुर्गाचे महत्त्वही मोठेच असणार आहे. या दुर्गाकडे तसे आजवर कुणाचे लक्ष गेले नाही, हेही आश्चर्य वाटावे असे आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा