लोणावळय़ाजवळच्या विसापूर किल्ल्यास भटक्यांच्या जगात एक वेगळे स्थान आहे. या गडावर यावे, भवताल पाहावा, इतिहास शोधावा आणि संध्याकाळ झाली, की पश्चिमेच्या तटावर येऊन बसावे.
महाराष्ट्रात गडकोट किती? नेमके सांगता यायचे नाही. पण चारपाचशे तरी नक्कीच असतील. वेगवेगळय़ा कालखंडात तयार झालेल्या या गडकोटांमध्ये स्वत:ची ओळख मात्र फारच थोडय़ांना! राजगडाला जसा त्याचा बालेकिल्ला, तोरणाच्या माच्या, रायगडावरील वास्तुविशेष, लोहगडाची प्रवेशद्वारे, हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा, चावंडचे सप्ततळे.. ही यातली काही उदाहरणे! या गडांची ही विशिष्ट ओळख मनात घोळवतच अनेक जण या दुर्गाच्या वाऱ्या करतात. या अशाच पैकी एक लोणावळय़ाजवळचा विसापूर! त्याच्याही वाटय़ाला असे एक वैशिष्टय़ आले आहे, ते म्हणजे या गडाची आगळीवेगळी, अद्वितीय आणि आजही अखंडित असलेली अशी तटबंदी! विसापूरचा हा तट म्हणजे निष्ठेचा एकेक दगड चढवत विणलेला जणू भरजरी शेलाच!
विसापूर! समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर असलेला हा गड मळवली रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस भाजे लेणीच्या अगदी माथ्यावर. या गडावर जाण्यासाठी तीन वाटा. एक भाजे लेणी शेजारच्या ओढय़ाच्या कडेने वर जाणारी. दुसरी उत्तरेकडील पाटण गावातून वर चढणारी, तर तिसरी लोहगड-विसापूर दरम्यानच्या गायमुख खिंडीतून विसापूरला वळसा मारत वर जाणारी.
असो! यापैकी उत्तरेकडील वाट दिल्ली दरवाजाने तर दक्षिणेकडील कोकण दरवाजातून गडावर शिरते असे या वाटांचे उल्लेख आहेत. गंमत अशी, की हे दिल्ली व कोकण दरवाजे आज तरी इथे दिसत नाहीत. हा सारा आपला कागदोपत्रीचा इतिहास! ब्रिटिशांच्या हल्ल्यात या दरवाजांनी कधीच माना टाकल्या आहेत. यातील दिल्ली दरवाजाने गडात शिरलो, की वाटेत खोदीव टाक्या, कोठीवजा चौकीच्या जागा आणि कातळातील पायरीमार्ग लागतो. या मार्गावरच दिसणारा सहा फूट उंचीचा कोरीव हनुमान आणि कोठीवरील गणेशाला वंदन करत आत शिरावे.
भलेमोठे सपाटीचे पठार आणि मधोमध बालेकिल्ल्याची ती छोटीशी टेकडी अशी विसापूरची रचना. वर येताच विसापूरचा मोठा भाऊ लोहगड रामराम घालतो. पण त्याचे निमंत्रण थोडेसे बाजूला ठेवत आपण विसापूरचा पाहुणचार घेऊ लागायचे. समोरच डाव्या हाताला सदर लागते. या सदरेशेजारीच एक भलीमोठी तोफ पडलेली आहे. अर्धा भाग उघडा तर अर्धा गाडलेला. गडावर आणखीही एक मोठी तोफ आहे. विसापूरच्या या तोफेविषयी चिं. ग. गोगटे यांच्या १८९६ मधील ‘महाराष्ट्रातील किल्ले भाग १’ या पुस्तकात एक उल्लेख आलेला आहे, तो असा, ‘सुमारे १० फूट लांबीच्या या तोफेवर इंग्लडमधील ‘टय़ुडर’ नामक राजघराण्याचे राजचिन्ह असलेले गुलाबाचे फूल आणि मुकुट आहे. ‘इ. आर.’ ही इंग्रजी अक्षरे कोरलेली आहेत. इंग्लडची राणी एलिझाबेथ हिच्या कारकीर्दीत इंग्रजांची जहाजे हिंदुस्थानात व्यापारासाठी यायची. त्यापैकी एकावर आंग्य््राांनी छापा टाकून वरील तोफ हस्तगत केली व ती पेशव्यांना दिली. सध्या या तोफेच्या कानात खिळे मारून ती निकामी करून टाकलेली आहे.’
विसापूरवरच्या या दोन्ही तोफांना स्वच्छ करत त्यांचा हा इतिहास शोधणे गरजेचे वाटते. खरेतर प्रत्येकच गडावरील या अशा वास्तू-वस्तूंचे योग्य जतन-संवर्धन करत त्यांचे संशोधन व्हावे, त्याची माहिती तिथेच गडावर मांडावी.. हे असले स्वप्न आम्ही पाहायचेच नाही का? जाऊद्यात! आपण आपले पुढील दुर्गदर्शनाला निघूयात. विसापूरच्या या सदरेच्या मागे गडावरील बालेकिल्ल्याची टेकडी! पण किल्लेदाराच्या वाडय़ाचे आणि शिबंदीच्या काही घरटय़ांचे अवशेष सोडले तर हा बालेकिल्ला फक्त आडनावापुरताच! नाही म्हणायला गणेशाची एक सुंदर मूर्ती या भग्नावस्थेतही चैतन्य निर्माण करत असते.
या बालेकिल्ल्याच्या भोवतीने गडावर सर्वत्र सपाटीची जागा आहे. या सपाटीवरून उत्तर-पूर्व-दक्षिण आणि पश्चिम अशा दिशेने गडप्रदक्षिणा सुरू करावी. सुरुवातीलाच महादेवाचे एक छोटेखानी मंदिर लागते. या मंदिरासमोरच्या दीपमाळेवर गणेशासह काही शिल्पं मिरवत असतात. यापुढे एक मोठा तलाव आणि त्याच्या काठावर मारुतीचे मंदिर येते. आपल्याकडे कुठल्याही गडकोटांवर अशी मारुती, गणेश, महादेव आणि शक्तिदेवतेची मंदिरे हमखास दिसतात. विसापूरवर तर यातील एकटय़ा मारुतीची सहा राऊळे आहेत. या अशा अनामिक शक्तींमुळेच मग या अनगड गडांवरून फिरताना कधीही एकटे वाटत नाही. सतत कुणीतरी पाठीशी असल्यासारखे वाटते.
या मारुती मंदिराकडून उत्तरेकडच्या तटावर यावे. वाटेत एका वीरपुरुषाची प्रतिमा असलेली घुमटी लागते. कोणातरी वीराचे हे स्मारक! याशिवाय या उत्तरेकडील तटावर एकदोन ठिकाणी काही आकृत्या-शिल्पंही कोरलेली आहेत. हा तट जिथे संपतो त्या ईशान्येकडील बुरुजावर एक गोल चौथरा बांधलेला आहे. त्याच्या बाजूने चर खोदलेला आहे. एखादे दगडी चाक फिरवण्यासाठीचीच ही रचना. पण ही काही चुन्याची घाणी नाही, तर सर्व दिशांना तोफ फिरवण्यासाठीची योजना आहे. या बुरुजाच्या अलीकडे टेहळणीसाठी पुन्हा एक स्वतंत्र बुरूज बांधलेला आहे. किल्ले स्थापत्यातील हा एक आगळा प्रकार! तेला-तुपाच्या टाक्याही इथे दिसतात.
उत्तर दिशा सोडून पुढे पूर्वअंगाने दक्षिणेकडे जाऊ लागलो, की वाटेत आणखी एक खोदलेला तलाव दिसतो. या गडावर चारही दिशांना असे छोटे-मोठे तलाव खोदून पाण्याची उत्तम सोय केलेली आहे. एप्रिल ते जून दरम्यानचा कालावधी सोडला तर वर्षभर यातील पाणीसाठा उपयोगी पडतो. दक्षिण बाजूस गडाचा दुसरा, कोकण दरवाजा येऊन मिळतो. एकेकाळचा हा राजमार्ग पण आज दगडमातीच्या ढिगाऱ्यात तो चोरून उभा आहे. या दरवाजातून आत आलो, की लगेच काही खोदीव कोठय़ा आणि टाक्या लागतात. यातील काही टाक्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. पुण्याच्या संशोधिका डॉ. शोभना गोखले यांनी या लेखांचे संशोधन केलेले आहे. ही खोदकामेच गडाचे प्राचीनत्व सिद्ध करतात. खरेतर ज्या गडाच्या पोटात लेणी, तो नि:संशय दोन-एक हजार वर्षांपूर्वीचा मानावा असा एक तर्क आहे. ऐन बोरघाटाजवळची गडाची योजना, पोटातील भाजे लेणी, गडावरील खोदकामे, त्यावरील ब्राह्मी लेख या साऱ्यांमुळे या लोहगड-विसापूरचा इतिहास प्राचीन काळापर्यंत निश्चितपणे जातो. मुस्लीम राजवटीमध्ये या गडाचा उल्लेख ‘इसागड’ असा येतो. पण गडाला आजचे जे रूप आले आहे, ते मराठेशाहीतील! यातही लोहगडमुळेच हा गड मजबूत केलेला असावा. ‘किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये, असल्यास तो त्याच्या आहारी आणावा. ते शक्य न झाल्यास त्यास तटबंदी घालून मजबूत करावा.’ शिवरायांच्या आज्ञापत्रातील हा नियमच विसापूरच्या दुर्गारोहणास कारणीभूत ठरला असावा.
गडावरील हे अभेद्य बांधकाम पाहायचे असेल तर मग आता पश्चिम तटावर चला! विसापूरला उत्तर, पूर्व आणि दक्षिण या तीनही दिशांना तुटलेले खोल कडे आहेत. तेव्हा गड राखायचा असेल, तर तो खरा पश्चिमेकडूनच! मग यासाठी दिल्ली दरवाजापासून ते थेट लोहगड-विसापूर दरम्यानच्या खिंडीपर्यंत तब्बल एक किलोमीटर लांबीचा आणि आठ ते दहा फूट रुंदीचा असा तट घालण्यात आलेला आहे. विसापूरचा सारा जीव त्याच्या या तटात आहे.
कोरीव चिऱ्यांमधले बांधकाम, आखीवरेखीव रचना, रुंद रस्ता, जागोजागी ठेवलेले जिने-पायऱ्या, आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही अशी तटाची उंची, अर्धवर्तुळाकार बुरूज, या तटबुरुजांना माऱ्यासाठी जागोजागी ठेवलेल्या जंग्या, खिडक्या, तटावरील देवतांची शिल्पं-मंगल प्रतीके, तटाच्या आतील शिबंदीची घरे, पाण्याच्या टाक्या, दारूगोळय़ाची कोठारे, तटाच्या पोटातील खोल्या आणि अगदी शौचकूपांची रचनादेखील..!
काय नाही या तटबंदीत? साऱ्या महाराष्ट्रात अद्वितीय असे हे बांधकाम! तो बांधण्यासाठी लागलेला दगड किल्ल्यावर खोदलेल्या टाक्यांमधूनच मिळवला आहे. या पश्चिम भागात टेकडीलगत अनेक टाक्या खोदलेल्या दिसतात. यातील एकाच्या भिंतीवर तर हनुमानाचे एक भव्य शिल्पही कोरलेले आहे. जणू ही शक्तिदेवताच पाण्यात उतरली आहे. एका ठिकाणी एकात एक गुंफलेल्या सात टाक्यांचा समूह आहे. गडावरील या टाक्या खोदून जलसंचय केला आणि दगडही मिळवला!
बांधकामासाठी लागणारा चुना मळण्यासाठी लावलेली घाणी आजही इथे त्याच्या चाकासह उभी आहे. शेजारीच काही दगडी जातीही दिसतात. सगळे कसे ताजे वाटते. असे वाटते, जणू आत्ता हे सारे काम संपवून ते मजूर-कामगार गडाखाली उतरलेत. कुठल्याही वस्तूंभोवतीच्या संस्कृतीशी असे एकरूप झालो की त्या आपल्याशी बोलू लागतात.
तटाचे हे वैभव पाहात पुन्हा वायव्येकडील शेवटच्या बुरुजावर यावे. यावर ती दुसरी भलीमोठी तोफ विसापूरच्या सामर्थ्यांचा परिचय करून देत असते. या बुरुजावरूनच थोडय़ा वेळापूर्वी पाहिलेला पश्चिमेकडचा सारा तट एका नजरेत येतो. महाराष्ट्रात एवढे गडकोट, पण विसापूरच्या या तटाची सर कुणालाही नाही. केवळ ही तटबंदी पाहण्यासाठी दुर्गभटके विसापूरच्या वाऱ्या करतात. संध्याकाळी इथे तटावर आलो, की लोहगडाकडून येणारा पश्चिमेचा वारा बरोबर शिवकाळातील अनेक आठवणीही घेऊन येतो. सूर्यास्ताची सोनेरी किरणे इथे उतरू लागल्यावर तर सारा तटच उजळून निघतो. त्याचे ते जागोजागीचे गवाक्ष-खिडक्या जिवंत होतात, मावळतीचा दिनकर त्यात रंग-रूप भरू लागतो. संध्येच्या त्या पवित्र समयी मग विसापूरचा हा सारा तट एखाद्या ‘त्रिपुरी’चेच लेणे भासू लागतो!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा