सातारा जिल्ह्य़ातील माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांचा भाग हा तसा दुष्काळी पट्टा! या भागात कुणी पर्यटनासाठी निघाल्याचे कधी कानावर येत नाही. खरेतर या भागातही गडकोट, सुंदर धाटणीची कोरीव मंदिरे, जुने वाडे असे बरेच पाहण्यासारखे आहे. पण या भागातल्या वैशाखवणव्यामुळे या स्थळांची पर्यटन चर्चा तशी अभावानेच होते. यालाही एक पर्याय आहे. पावसाळा सुरू झाला आणि घाटमाथ्यालगत तो धुमाकूळ घालू लागला की, खरेतर इकडे माणदेशी वळावे. हलका पाऊस, मधेच ऊन, हिरवे डोंगर अशा आल्हाददायक वातावरणात या भागातील भटकंती वेगळ्या जगात घेऊन जाते. आजचा आपला थांबा असाच देश पठारावरचा – नांदगिरी!
साताऱ्याहून लोणंदसाठी एक रस्ता गेला आहे. याला जुना पुणे रस्ता असेही म्हणतात. या रस्त्यावरील ‘सातारा रोड’ हा भाग तिथल्या कूपर उद्योगसमूहामुळे सर्वपरिचित आहे. या ‘सातारा रोड’ च्या पुढेच हा नांदगिरी किल्ला! साताऱ्यापासून या ‘सातारा रोड’ पर्यंत येण्यासाठी नियमित एसटी बस सेवा आहे. या थांब्याच्या पुढे पंधरा-वीस मिनिटे चालले की, आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदगिरी गावी येतो. या गावाजवळील धुमाळवाडीतूनच या छोटेखानी गडावर वाट निघते.
खरेतर ‘सातारा रोड’ भागात आल्यावरच ‘नांदगिरी’ दिसू लागतो. एखाद्या जहाजाप्रमाणे त्याचा आकार! तसेच त्याच्या माथ्यावरील तो एकुलता एक वटवृक्षही आपले लक्ष वेधून घेत असतो.
समुद्रसपाटीपासून अकराशे मीटर उंचीवर हा गड! देश-पठारावरच्या या गडाची एक गंमत, हे एकतर उंचीने तसे बेताचे आणि त्यातच उघडा माळ यामुळे गडाची सरळ वाट कुठेही न चुकवता अवघ्या अध्र्या-एक तासात गडाच्या दारात पोहोचवते. तत्पूर्वी वाटेत ऐन कातळात खांब सोडून खोदलेले एक टाके दिसते. खांब सोडत टाके खोदण्याची पद्धत प्राचीन! त्यामुळे या गडाचे प्राचीनत्वाशी असलेले नाते आपोआपच सिद्ध होते. आम्ही गेलो त्यावेळी या टाक्यातील जलदेवता प्रसन्न होऊन बाहेर वाहात होती.
कडय़ाला समांतर असा गडाचा पहिला दरवाजा येतो. त्याची कमान, भोवतीचे बांधकाम अद्याप उत्तम; परंतु त्यालाच आता एक लोखंडी दरवाजा बसवला आहे. या दरवाजातच पाण्याची मोठी टाकी आणि त्यापाठीमागे एक नव्याने खोलीही काढलेली. चौकशी केल्यावर समजले की, कुणा बुवा-महाराजांनी इथे त्यांचा संसार थाटला आहे. आमच्याकडे पुरातत्त्व खात्याच्या कृपेने निराधार झालेल्या अनेक गडकोट, लेण्या, मंदिरांमध्ये या अशा बुवा-महाराजांनी आपले बस्तान बसवलेले आहे. त्यांच्या निव्वळ ध्यानधारणा, पूजेला विरोध असण्याचे कारण नाही, पण ही मंडळी ऐतिहासिक वास्तूंमध्ये हे असे परस्पर फेरफार करत स्वत:चे नवे कार्य (?) उभे करतात त्या वेळी मात्र आमच्या इतिहासाला मोठा धोका निर्माण होतो.
थोडय़ा वेळापूर्वी गड चढताना एक स्थानिक मुलगा वाट अडवत म्हणाला होता, ‘महाराज नाहीत गडावर!’ त्यावेळी त्याच्या प्रश्नात चिडवणे वाटले होते, म्हणून त्याला म्हणालोही, ‘महाराज नाही, पण त्यांचा गड तरी आहे ना?’.. त्या मुलाच्या प्रश्नातील हे ‘महाराज’ वर आल्यावर उलगडले.
या दरवाजातून एक मार्ग गडावर, तर दुसरा समोरच कडय़ाच्या कडेने खाली एका गुहेत उतरतो. ही गुहा म्हणजे नांदगिरीचे अद्भुत लेणे! नांदगिरीचे सारे वैभव-आकर्षण या लेण्यात! आत शिरण्यासाठी खाली एक अरुंद मार्ग आहे. खाली वाकत आत शिरावे तो अंधाराबरोबरच गुडघाभर पाणीदेखील भय दाखवत पुढे येते. कुठे जमिनीखाली-कातळाच्या पोटात खोदलेले लेणे, डोळ्यात बोट जाईल असा अंधार आणि आता सोबतीला हे पाणी.. पहिल्या पावलाबरोबरच अंगावर शिरशिरी उभी राहते.
एका लोखंडी कठडय़ाचा आधार घेत त्या अंधारातून पुढे सरकायचे. तब्बल ३५ मीटर आतपर्यंतचा हा प्रवास! एक-दोन पावले टाकली की, सरावलेल्या डोळ्यांना थोडे दिसायला लागते. दोन्ही बाजूंना खोदकाम केलेले. या सर्वच दालनात पाणी भरलेले. मूळ लेणे खोदले असतानाच त्याच्यात कुठूनतरी हे पाणी झिरपू लागले आणि आता याचे जललेणे झालेले. खरेतर पाणी झिरपू लागल्याने आपल्याकडील अनेक लेण्या बाद झाल्या. पण नांदगिरीच्या या लेण्याचे सौंदर्य या पाण्याने आणखी वाढले आणि त्याचे जललेणे झाले.
लेण्याच्या अगदी शेवटी काही छोटय़ाशा खोल्या. त्यातील एकात मंद तेवणारा दिवा होता. ज्योतीच्या त्या तेवढय़ाशा प्रकाशानेही त्या अंधाऱ्या गुहेत चैतन्य निर्माण झाले होते. या ऊर्जेतूनच पावले झपझप त्या दालनापुढे आली आणि अंधार, काळोख, भीती हे सारे भाव गळून जात एक शांत-प्रसन्न दर्शन घडले.
..काळ्या पाषाणातून उमललेले ते रूप! ध्यानस्थ बैठक, दोन्ही हात नाभीपाशी एकवटलेले, नेत्र अंतर्धान पावलेले आणि साऱ्या शरीरावरच समाधीयोगाची प्रसन्न छटा पसरलेली! डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पाश्र्वनाथाचे रूप! साधारण नवव्या शतकातील ही मूर्ती. बहुधा ही लेणीही त्याच काळातील असावी.
या पाश्र्वनाथाला स्थानिक लोक पारसनाथ म्हणतात. दत्ताशी त्याचे नाते जोडतात. यातूनच मग अन्य एका कोनाडय़ात दत्तात्रेयांच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना झाली. अन्य एका ठिकाणी देवीची एक मूर्तीही दिसते.
पाण्यात उभे राहून एखादे लेणे पाहणे-अनुभवणे ही कल्पनाच निराळी. पाण्याला पायाने दूर सारत त्याचे एकेक दालन पाहू लागायचे. अंधार-काळोख आणि पाण्याने भरलेली ही दालने. पण त्यातही गूढ भाव जाणवू लागतात. भय आणि प्रसन्नतेच्या मिश्र छटा स्पर्श करतात आणि प्राचीनत्वाचा वास काळाच्या खोल-खोल उदरात घेऊन जातो. नांदगिरीचे हे जललेणे एका वेगळय़ाच जगाचे दर्शन घडवते.
अशा या लेण्यांचे दर्शन घेण्यापूर्वी थोडीशी सावधानता हवी. अशी एकांतस्थळे जशी साधक-तपस्वींना आवडतात, त्याचप्रमाणे ती कडय़ाकपारीत पोळी बांधणाऱ्या मधमाश्यांनाही भावतात. नांदगिरीच्या या लेण्याच्या भाळीही अशी आग्यामाश्यांची चांगली दोन-चार मोठाली पोळी आहेत. तेव्हा सुसाट वागणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या, विडी-काडी ओढणाऱ्यांनी अशा पवित्र जागांपासून थोडेसे दूरच राहावे, नाहीतर या माश्या त्यांचा इंगा दाखवतील.
असो! नांदगिरीचे हे जललेणे पाहात पुन्हा पहिल्या दरवाजातून वर गडाकडे सरकावे. लगोलग दुसरा दरवाजा. यानंतर आतमध्ये उजव्या हातास गडाची रक्षणदेवता मारुती रायाचे मंदिर! यानंतर थोडे वर चढून आले, की गडमाथा येतो.
नांदगिरी दक्षिणोत्तर पसरलेला. अरुंद असलेल्या या गडमाथ्यावर दोन-चार मोठाली तळी, खडकात खोदलेली काही टाकी, शिबंदीच्या घरांचे अवशेष, धान्य आणि दारुगोळय़ाची कोठारे आदी वास्तू दिसतात. सुरुवातीलाच एक तळे हिरव्या रंगाचे पाणी दाखवत येते. या तळय़ाच्या काठावर एक समाधीही आहे. ती कुणाची हे मात्र कळत नाही. याच्या बाजूलाच चुन्याची घाणी आहे. त्याचे ते दगडी चाक आजही इथे त्या इतिहासातील आठवणी सांगत असते. या तळय़ाला खेटूनच शिबंदीच्या घरांचे अनेक अवशेष दिसतात.
या अवशेषांमधून एक वाट दक्षिणेकडे निघते. या दक्षिण भागातच खालून खुणावणारा तो विशाल वटवृक्ष आपल्या पुढय़ात येतो. या वटवृक्षाच्या छायेतच कुणा अब्दुल करीम नामक पिराचे एक थडगे आहे. या परिसरात गडावरील एखाद्या प्राचीन वास्तूचे कोरीव दगडही अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. बहुधा इथे एखादे प्राचीन मंदिर असावे.
दक्षिणेप्रमाणे उत्तर बाजूसही काही अवशेष आहेत. गडाच्या चारही बाजूस कडे असल्याने आवश्यक त्या ठिकाणीच तटबंदी घातलेली आहे.
नांदगिरीचे हे दुर्गदर्शन झाले की, लक्ष भवतालाकडे वळते. नांदगिरीवरून अनेक दुर्गशिखरे खुणावतात. यातील काहींवर गडकोटांची शेलापागोटीही चढवलेली आहेत. जरंडेश्वर, अजिंक्यतारा, चंदन-वंदन, वैराटगड, किन्हईचा डोंगर, त्यापाठीमागे दूरवर औंधच्या यमाईचा डोंगर अशी दूरदूरची गिरिशिखरे खुणावतात. गडाभोवतीचा हा प्रदेश उजाड-दुष्काळी, त्यातूनच वग्ना आणि वसना या नद्या त्यांची कोरडी पात्रे घेऊन वाहतात. एरवी शुष्क-करपलेली ही पात्रे पावसात थोडीफार पाझरतात. दूरवरचा तो खटावचा तलाव दिसतो. हा सारा भूगोल पाहता-पाहताच मग लक्ष पुन्हा गडाच्या मुळाशी म्हणजेच त्याच्या इतिहासापाशी येऊन ठेपते.
नांदगिरीची निर्मिती कोल्हापूरच्या राजा भोजची! त्याच्यानंतर तो आदिलशाही-निजामशाही या मुस्लिम सत्ताधीशांकडे होता. छत्रपती शिवरायांनी परळी (सज्जनगड), सातारा (अजिंक्यतारा) घेतल्यावर लगेचच हा किल्ला घेतला. या गडाची ‘कल्याणगड’ ही दुसरी ओळख बहुधा शिवकाळानंतरचीच असावी. पण याचे कारण समजत नाही. शिवकाळानंतर पंतप्रतिनिधी आणि त्यानंतर पेशव्यांकडे गडाचा ताबा होता. याच काळात इसवी सन १७९१ मध्ये इंग्रज अधिकारी मेजर प्राईस याने नांदगिरीची पाहणी केली होती. त्याच्या या भेटीच्या आधारे तो त्याच्या ‘मेमरिज ऑफ फिल्ड ऑफिसर’ या ग्रंथात म्हणतो, ‘क३ ’‘ ’्र‘ी ँ४’’ ऋ ं २ँ्रस्र् ऋ ६ं१!’
मराठय़ांच्या कारकिर्दीत नांदगिरी हे तालुक्याचे ठिकाण होते. या गडावर सरकारी तिजोरी होती. किल्ल्याचा कारभार पाहण्यासाठी मामलेदार, फडणीस, हवालदार, दफेदार, कारकून, नाईक आदी हुद्देकरी नेमले होते. एकूणच यामुळे नांदगिरी आपले महत्त्व टिकवून होता. गडावरचे मराठय़ांचे हे राज्य १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धापर्यंत कायम होते. त्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातच इंग्रजांनी त्यावर कब्जा मिळवला आणि नांदगिरीचे ‘दुर्गवर्तमान’ संपून ‘इतिहासपर्व’ सुरू झाले.
इंग्रजांनी गड जिंकल्यावर त्याची दुर्ग म्हणून असलेली सर्व शक्ती नष्ट केली. तट-बुरुज, इमारती पाडल्या, तोफा पळवल्या, दारूकोठारे उद्ध्वस्त केली. सारा किल्ला एक स्मशान झाला. गडाची ताकद त्याच्या आक्रमण आणि संरक्षणामध्ये! किल्ल्याची हीच ताकद ब्रिटिशांनी अन्य किल्ल्यांप्रमाणे इथेही नष्ट केली. या दरम्यान पुढे १८६२ मध्ये एक ब्रिटिश अधिकारी या किल्ल्याच्या भेटीवर आला होता. या वेळी त्याने ‘एक भग्न, बेवसावू आणि निर्जन किल्ला’ अशी नांदगिरीची उपेक्षा केली. आज एकविसाव्या शतकातही यात फारसा फरक पडलेला नाही. दुर्दैवाने ब्रिटिशांनी दिलेला हा ‘वारसा’ आम्ही आजही जतन केला आहे.