माझ्या सह्य़ाद्री भटकंतीमध्ये कौशीचा वृक्ष (Sterculia tirmiana) मी जिथे पाहिला होता, ती जागा अतिशय दुर्गम आहे. महाडच्या जवळ ‘भीमाची काठी’ म्हणून एक ठिकाण आहे. डोंगरावरील गावालगतचा एक मोठ्ठा सुळकेवजा कडा उभाच्या उभा असा मुख्य डोंगरापासून सुटावलेला आहे. त्याच्या माथ्यावर लांबट असा भूभाग आहे. त्यावर बरीचशी कारवी आहे. आणि दुसऱ्या टोकाशी तो उभा आहे. लालभगव्या रंगाची आकर्षक फुले, पेल्यासारख्या फुलांतून बाहेर डोकावणारा पुंकेसर आकर्षक रंगामुळे तो चांगलाच लक्षात राहिला. ह्य़ानंतरच्या भटकंतीमध्ये फलटण जवळच्या श्री. बाबूभाई गांधी यांच्या शेतात बांधावर अचानक पुन्हा तो दिसला. कौशीच होता तो; पण या वेळी त्याच्या माथ्यावर पिवळसर लाल, लांबट लहान लहान पंखे लोंबत होते. टोकाच्या बाजूला दोन्ही बाजूला फुगीर असलेले. खाली पडलेल्या त्या पंखांसारख्या बिया मी उचलून घेतल्या होत्या.
वनस्पतीसृष्टीमधील फुलांच्या मोहक दुनियेचा परिचय लहानपणीच झाला होता. पण त्यांतील आकार, रंग, वासाचं वैविध्य मला भटकंतीतून लक्षात आलं. नुसत्या फुलांच्याच नव्हे तर बियांच्यामधलं वैविध्य पाहून तर मती गुंगच होईल. ह्या बियांमध्ये, त्यांच्या पोतांत, रंगांत, आकारांत मला जणू माणिकमोती गवसले होते. आणि या बियांमधल्या पंखपऱ्यांची विविध रुपं पाहून मी अगदी हरखूनच गेले होते; कोणीही हरखून जाईल अशाच आहेत त्या पंखपऱ्यांच्या विविध परी. लहानपणापासूनच पळसाच्या प्रवाळफुलांच्या रंगांची मनावर मोहिनी होतीच. पण एकवेळी झाडावर हिरवे राघूच लटकलेत की काय म्हणून मी नवलाने पाहिले तर काय, पळसाच्या कोंवळ्या हिरव्या बियांचे लांबट पंख झाडावर लटकले होते. कालांतरानं हे हिरवे पोपट पिवळट तपकिरी रंगाचे होताना आणि बिया पक्व होऊन वाऱ्याबरोबर लांब लांब जाऊन पडलेल्या पाहिल्या आणि मग निसर्गातल्या या पंखपऱ्या पाहायचा छंदच लागला.
वावळीचे कितीतरी वृक्ष रस्त्याच्या कडेनं, मैदानाच्या कडेनं आढळतात. सांगलीच्या आमराईमध्येही ते विपुल आहेत. त्यांची फुलं मुद्दाम लक्ष दिल्याशिवाय कधी आली आणि गेली ते कळतही नाही. पण त्याच्या लांबट गोलाकार पण अगदी लहान हलक्या, पिवळ्या पंखाच्या लाखो बिया फांद्यांवर लटकलेल्या असतात. तेव्हा त्यांच्याकडे लक्ष जातेच. पक्व झालेल्या या पिवळट तपकिरी बिया वाऱ्यावर उडून कितीतरी लांब जातात, अंकुरित होतात आणि नव्या जीवनाची सुरुवात करतात. वावळीच्या या बिया माकडं खातात म्हणून त्यांना ‘मंकी बिस्कीट’ असंही म्हणतात.
पारगडचा किल्ला उतरून खाली आलो, तर गाडी पंक्चर होती; ती दुरुस्त होईपर्यंत घाटांतून पायी हिंडत असताना पारगडच्या उतारावर ४ पंखी फळांचे घोसच्या घोस लटकलेले दृष्टीस पडले. अत्यंत आकर्षक हिरवट, किरमिजी लाल रंगाचे. किती सुंदर रचना होती त्या घोसांची आणि प्रत्येक बीच्या चार बाजूला उभे चार पंख आणि चारी पंखांच्या मधल्या चिवट आवरणांत त्याचं लांबट ‘बी’ याच कॉम्ब्रेटसी कुळांतील. ऐनाच्या बिया मात्र मोठ्ठय़ा ४ किंवा ५ पंखांच्या, पण पंख सुबक नाहीत म्हणजे पिळूकीच्या तुलनेत हं! हे पंखाचे पडदे इतके चिवट आणि घट्ट विणीचे की मधल्या बी पयर्ंत मला कधी पोंचताच आले नाही. परंतु खारीचे टोकदार दात आणि पक्ष्यांच्या कठीण टोकदार चोंची मात्र या कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या आतल्या बीपर्यंत बाहेरून भोक पाडून अचूक पोचतात. या पंखधारी बिया वाऱ्याबरोबर, पावसाबरोबर, पाण्याबरोबर दूरदूर पोचतात. दीर्घकाळ ओलीत राहिल्या की यांचं आवरण मऊ पडतं आणि मधल्या बीच्या वरील छिद्रातून अंकुर बाहेर पडतो. नवीन झाड मातीत रुजते. अर्जुन वृक्षही याच कुळांतला म्हणजे ऐनाचा भाऊच. त्याच्याही बिया पंखधारीच, ऐनासारख्याच, पण अधिक सुबक पडदे असलेल्या. तानसाच्या जंगलात मानवी वावर तसा कमी होता. पानगळीच्या या जंगलात पानगळ, ओलावा सगळं तिथल्या मातीत सतत मिसळून एकरुप होऊन तिथल्या झाडांना पोषणद्रव्ये देत असतात. त्यामुळे तिथली ऐनाची सडसडीत लांब लांब पंखाची बिजे पाहून मला नवल वाटले होते. बिया बियांच्या चणीतही फरक असावा नां, माणसं नाही कां काही बुटकी आणि आडव्या अंगाची तर कांही उंच आणि सडसडीत. तसच बियांमध्येही असतं याचं नवल होतं.
पुण्यात कोथरूडला परमहंस नगरामागे आहे ‘म्हातोबा’ ची टेकडी. उन्हाळ्यात तिथे गोल पंखाच्या बियांचा खच पडलेला असतो. गोल पंख्याच्या मध्यभागी फुगीर दिसणारी त्याची ‘बी’. ‘बी’ वरचं त्याचं आवरण त्याभोवतीनं पंख्यासारखं आणि बीच्या फुगीर भागाच्या एका टोकाला या ‘बी’ चे ‘देठ’. गोल पेल्याला धरायला लांब दांडा असतो नां तसं हे देठ, पण लांब नाहीं आखूड! या भोवतीच्या पंखाचे आवरण फाडून आंतल्या ‘बी’ पर्यंत नाहींच पोचता येत. त्या पंखाला पेशींच्या आवरणाची भक्कम जाळी असते. या बिया पक्व पिवळ्या झाल्या की वाऱ्याबरोबर उडत लांब लांब जातात. मातीत जातात. ओल मिळाली की अंकुरतात.
सह्य़ाद्रीतील डोंगररांगातून भटकून घराकडे परतत असताना आम्ही ट्रकला लिफ्ट मागितली होती आणि ट्रकच्या टपावर बसून आम्ही अंबोली ते आजरा आलो होतो. हिवाळा संपत आला होता आणि रस्त्याच्या दुतर्फा आम्ही लाललाल, तांबूस किरमिजी रंगाचा फुलोरा पाहिला. ती फुले नव्हती तर तो ‘केंजळ’ वृक्षाचा ‘बिजोरा’ म्हणजे बियांचा गुच्छ होता आणि त्याचे लहानलहान पंख एकमेकांलगत. एका मोठय़ा ‘बिजोरा’चा पसारा होता तो. त्याचा लालभडक बिजोरा कालांतरानं काळा पडतो. जमिनीवर पसरून मातीशी एकरुप होतो.
गोव्याच्या कुठल्याही भागांत गेलं तर उन्हाळ्यामध्ये लालचुटक रंगाचे होपियांचे वृक्ष वैपुल्यानं दिसतात. ही पाने वा फुलं नसून त्या वृक्षाच्या पंखधारी बिया असतात. रचना तर इतकी सुंदर की मध्यभागी टपोरं हिरवं बी आणि त्याच्या दोन बाजूला दोन हिरवे पंख. कालांतरानं हे दोन्ही पंख लाल रंगाचे होतात. लाल पंखाचे लहान लहान पक्षीच झाडाला लागलेत की काय असं वाटतं. लोखंडी किंवा ‘व्हेंटिलागो’ या वेलालाही एकपांखी बिया लटकतात. वेलाला लहानसे देठ, त्या देठालगत गोल बी आणि त्या ‘बी’चा तोल संभाळणारा एक पंखा. वारा आला की मित्रासवे या पंखधारी बिया डुलत राहतात.
‘फणशी किंवा ‘शिशू’च्या कोवळ्या हिरव्या शेंगाची रचना आणखीनच वेगळी. लांबट, मध्ये रुंद आणि दोन्ही टोकांशी निमुळत्या शेंगेच्या मध्यभागी बी असते. पावसाळ्यांत या हिरव्या शेंगा पाऊसवाऱ्यासंगे झिम्मा खेळतात की काय असं वाटतं.
माझ्या लहानपणी आम्ही एक वर्ष मिरजेला होतो. तिथे झाडावर चढलेल्या एका वेलाखाली पडलेल्या ३ पंखी बिया वेचायला आम्हा मुलांची झिम्मड उडायची. माधवी लता किंवा मधुमालतीचा वेल होता तो. त्याच्या तपकिरी ३ पंखी बिया वाऱ्याबरोबर गरगरत खाली येताना मध्येच धरायासाठी आमची धडपड असे आणि अलिकडे झाडांच्या अभ्यासाचा नाद लागल्यावर हिप्पोक्रेशियाच्या वेलाच्या ३ ‘बी’ पंखधारी बियांची रचना पाहून अगदी कमाल वाटली होती निसर्गाच्या योजनेंची. देठाला खाली झुकलेला ३ रुंद पाती, अगदी घरांतल्या छताला टांगलेल्या पंख्याच्या पात्यासारखी, पण चपटी नाहीत तर फुगीर देठाला लटकलेली. या तीन पात्यांची बी मी घरी आणून ठेवली. कांही दिवसानी ती पूर्ण वाळली आणि त्याची फुगीर पाती मध्ये तडकली, उभी भेग पडली आणि आंतून लाल तपकिरी रंगाच्या पातळ पापुद्रा म्हणजे पंख असलेल्या बिया बाहेर डोकावू लागल्या. या पंखाच्या एका टोकाला बीज होते आणि या पंख्याची एकावर एक अशी चवड आंत दाटीनं बसली होती. देठाला धरून ३ पात्यांचा पंखा हलवला आणि आंतल्या पंखधारी बिया बाहेर उधळल्या. ‘३ पंखी विमानात एकएक पंखधारी बिया’ कसं काय हे निसर्गाला सुचतं बुवा! ‘फेबसी’ कुळांतील पंखधारी बियांचा नाजूक नखरा तर पाहात राहावा. वारस, टेटू, खडशिंगी, मेढशिंगी, पजेनालिया यांची फुले नाजूक, सुंदर, वासाची असतात खरे, पण पंखधारी बिया केवळ अद्भुत. म्हणजे बाहेर आवरण, शेंग किंवा पुडय़ासारखे, म्हणजे मेढशिंगीची शेंग अरुंद, चपटी, गोल वळलेली, तर खडशिंगीची कठीण कवचाची लांब शेंग मगरीच्या टणक कातडीसारखी, तर टेटूची शेंग रुंद लांब तलवारीसारखी, थोडी बाकदार, तर वारसची फुगीर लठ्ठ उभट पुडय़ासारखी. ३ पुडाची शेंग आणि आंत पंखधारी बियांची चवड असते. मध्यभागी ‘बी’ आणि बाजूनं लांबट पांढरा पंख, तलम. त्यावर बारीक बारीक शिरांच्या रेषां. टेटूच्या शेंगेतील पंखधारी बिया केवळ सुंदर, तलम, अर्धपारदर्शी. पापुद्रा असलेल्या शेंगा पक्व झाल्या की फुटून वाऱ्याबरोबर सर्वदूर पसरतात. तर स्पथोडियाच्या हिरव्या फुगीर ‘कनू’च्या आकाराच्या शेंगांत पुन्हा आंत एक टणक पापुद्रा-पिवळा जणू बाळ बियांखाली गोधडीच. अन पातळ पारदर्शी पंखामध्ये ‘बी’. पोपटांचं हे आवडतं खाद्य. चोच बाकदार असल्यामुळे या झाडावर उलटे होऊन पोपट या शेंगा चोचीनं फोडतात आणि बिया खातात. बिया इतक्या विपुल असतात की पोपटांनी खाताखाताच त्यातल्या काही हवेत उधळतात आणि निवान्तपणे डोलत जमिनीवर उतरतात. पऱ्याच ना या.
वेगवेगळी झाडं बघायच्या नादानं बेंगलोरच्या टाटा इन्स्टिटय़ूटमध्ये गेले होते. केवढी विविधता होती तिथे! एका झाडावर देठाला लटकलेले कांटेदार गोलसर फळ आणि त्याला धरून खाली झुलणारा त्याचा किरमिजी रंगाचा पंख असे हे ‘बी’ मी पहिल्यांदाच पाहात होते. जड फळाला तोलून धरणारा तो पंख म्हणजे अगदी कमाल होती. त्या कोवळ्या फळाचा तो पंख कोवळ्या हिरवट किरमिजी रंगाचा होता. काही दिवसांनी हे पंखवालं फळ खाली पडलं होतं. पण आतां तो पंख पिवळट तपकिरी झाला होता आणि फळही काळपट झाले होते. पंखाला धरूनच ते फळ उचलावं लागलं. फळाचे दाटदाट लांब कांटय़ासारखे केस चांगलेच टोचरे होते. फेबसी कुळांतील या झाडाची फुले मला अजून पाह्य़ला मिळाली नाहीत, कारण फुलांचा हंगाम नव्हता.
‘बी’ हाताशी, नव्हे केसाशी धरून उडणाऱ्या ‘म्हाताऱ्या’ ही आपण कधीतरी पाह्य़ल्या असतीलच. निदान काटेसांवरीच्या नक्कीच. तशाच त्या कांचनी फुलांच्या गणेर वृक्षाच्याही म्हाताऱ्या. आकारानं वांग्यासारख्या, कडकडीत बाह्य़ आवरणांच्या पुडय़ांत लपलेल्या असतात. आंतला कापूस कमालीचा मऊ, तलम आणि त्याच्या टोकाशी काळे अर्धचंद्राकृति लहानसे बीज असते. निसर्गमातेनं या मऊसूत तलम केसांना बाहेरच्या राठ आवरणांत ठेवलं नाही तर त्या बाह्य़ आवरणाच्या आंत पुन्हा एक पातळ पापुद्रा, बियांच्या खाली असतो. पूर्ण पक्व झालेलं फळ तीन कमलदलांप्रमाणे, आंतला पापुद्राही ३ दलांत वेगळा होतो आणि मऊ हलक्या कापसाबरोबर त्यालगत गुंतलेले ‘बी’ही दूरदूर जाते. पण हे बीज मातीत रुजवून रोपे करायचे मानवी प्रयत्न मात्र यशस्वी होत नाहीत असा अनुभव आहे. झाडाच्या जमिनीत लांब पसरलेल्या मुळांपासूनच नवीन रोपे जमिनीबाहेर आलेली दिसतात. किंवा हे काळे बी पक्षीही खात असतील आणि त्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बीजांतून रोपं उगवत असतील. सामान्यांसाठी अजूनतरी ‘गणेर’ चे पुनरुत्पादन कसे होते हे कोडेच आहे.
लापतानी किंवा ‘Anodendron’  नावाच्या वेलीची लहान लहान ५ वाळलेल्या पाकळ्यांची नाजूक स्वस्तिक सारखी चांदणफुले फार सुंदर असतात आणि त्याची जुळी टोकाशी निमूळती होत जाणारी त्याची शेंग सुरूवातीला हिरवी असते. कालान्तरानं ती फुटते आणि त्यातून म्हाताऱ्या बाहेर उधळतात. प्रत्येक म्हातारी म्हणजे पांढऱ्या केसांचा मऊ पुंज असतो, त्याच्या टोकांशी कारळ्यासारखं काळं बी असतं. बाहेर पडताना या म्हाताऱ्याचे केस फुलून उलटे होतात आणि पांढऱ्या पॅराशूटसारख्या त्या धरतीवर विसावतात.
निसर्गातील वैविध्य, रचनाचातुर्य, रंगाची योजना, हे झाडांत, फुलांत दिसते. तसे ते ‘बी’ मध्येही दिसते. पुनर्निर्मिती, वाढ, प्रसार, म्हणजे उत्पत्ति, स्थिति, विलय यांतून पुन्हा नवनिर्मिती अशा निसर्ग चक्रांतून निसर्ग वंशसातत्य टिकवत असते. बीजप्रसार हा त्यांतील चक्राचाच भाग. पण तो बीजप्रसार करण्यासाठी निसर्गाने ज्या युक्तया योजल्या आहेत नां त्यातील एक युक्ति म्हणजे बीजांना पंख देणे. झाडं चालत नाहीत, स्थिर असतात; मग प्रभावी बीजप्रसारासाठी बियांनाच पंखाची योजना निसर्गानं केली, पंखांमुळे बीजे वाऱ्याबरोबर पाण्याबरोबर, पावसासंगे दूर दूर जाऊन रुजतात. त्या पंखांच्या तरी किती परी बघा, ऐन, पळस,वावळ वगैरेंची ‘पंखधारी’ बिजं झाडावर लटकलेली, तर वारस, मोरवा, टेटू, खडशिंगी या झाडांवर कठीण असे बाह्य़ आवरण असते. ते फुटल्यावरच आतली पंखधारी बिजं बाहेर उडत जाणार, दूरदूर पसरून रुजणार. तर, कांटेसांवर, गणेर, लामतानी यांच्यातला हलका कापूस किंवा मऊ पांढऱ्या केसांच्या म्हाताऱ्या बियांना घेऊन विखुरणार. तर उक्षी, भिंगरी यांच्यातली फुलं वाळली की हृदयसंपुटांत सूक्ष्म बिजं घेऊन यांची भिरभिरी वाऱ्याबरोबर गिरक्या घेत आसपास पडतात. अनेकदां मला वाटतं की निसर्गातील या पंखांच्या बियांपासून स्फूर्ति घेऊन माणसानं कितीतरी शोध लावले असावेत. माधवी लता, साल, या वेली आणि वृक्षांच्या तीनपंखी बिजांवरून तर माणसानं विमान बनवलं नसेल? ऐन, अर्जुन, पिळुकीच्या बिया पाहून घुसळणीची रवी बनवायची कल्पना माणसाला सुचली असेल, तर लामतानीच्या केसाळ म्हातारीचा जमिनीवर उतरणारा घुमटाकार पाहून पॅराशूट बनवायची कल्पना त्याला सुचली असेल. स्त्रियांच्या अलंकारांतही या पंखधारी बियांचे अनुकरण दिसते. खरोखरच निसर्गाच्या निर्मिती प्रक्रियेतील आविष्कार थक्क करणारे खासच आहेत.

Massive tree falls in Ubud Monkey Forest in Bali kills two tourists tragic incident caught on camera
Bali: जंगलात फिरत होते पर्यटक, अचानक कोसळले भले मोठे वृक्ष; दोन पर्यटकांनी गमावला जीव, थरारक Video Viral
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Nazca lines
Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
Story img Loader