आयुष्य आपल्याला प्रत्येक दिवशी किंबहुना प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकवत असतं. मग ती एखादी मोठी शिकवण असो किंवा आनंदी राहण्याचा अगदी सोपा मार्ग असो. आयुष्याच्या या प्रवासात आपला जन्मच जणू विविध गोष्टी शिकण्यासाठी झालेला असतो. सध्या मुंबईचला एक चहा विक्रेता सर्वांनाच नकळत का असेना पण आनंदी होण्याचा मंत्र शिकवत आहे. त्यासोबतच वडील म्हणून एखाद्या व्यक्तीची आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे धडपड सुरु असते, याचा प्रत्ययही त्याचा अनुभव पाहून येत आहे.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवरुन त्याचा अनुभव शेअर करण्यात आला आहे. आयुष्यात पैशानेच सर्व गोष्टी विकत घेता येतात ही जरी वस्तुस्थिती असली तरीही पैशापलीकडेही समोरच्या व्यक्तीला आपल्यामुळे होणारा आनंदसुद्धा फार महत्त्वाचा असतो हे त्या चहा विक्रेत्या शेअर केलेला प्रसंग वाचताना लक्षात येत आहे. हल्ली मॅकडोनल्ड, बर्गर किंग, स्टारबक्स, सीसीडी, बरिस्ता या सर्व आऊटलेट्स तरुणाईमध्ये किंवा एकंदर सर्वांमध्येच फार प्रचलित झाल्या आहेत. पण, या ठिकाणी जाऊन खाणं हे प्रत्येकवेळी सर्वांच्याच खिशाला परवडेल असं नसतं. पण, या ठिकाणी पहिल्यांचा गेल्यानंतर जो आनंद होतो तो काही औरच असतो. मुंबईतील एका चहा विक्रेत्याने असाच एक सुरेख क्षण सर्वांना सांगितला आहे. यावेळी एक बाप म्हणून त्याचा आनंद ओसंडून वाहत असल्याचं लक्षात येत आहे.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती

तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण कोणता असं विचारलं असता त्या चहा विक्रेत्याने एक किस्सा सांगितला. ‘एका जवळच्याच मोठ्या हॉटेलमध्ये काहीतरी कार्यक्रम होता. जेथे दुपारच्या जेवणानंतर सर्वांनाच चहा प्यायची इच्छा झाली. त्यावेळी मला इतके पैसे मिळाले जितके मी एका महिन्यातही कमवत नाही. तो दिवस खुपच खास होता. मी माझ्या पत्नी आणि मुलांना घेऊन पहिल्यांदाच मॅकडोनल्डमध्ये गेलो होतो. त्या सर्वांना त्यांच्या आवडीचे बर्गर खाऊ घातले. त्या बर्गरसोबत मुलांना काही खेळणीसुद्धा मिळाली. त्याच क्षणी मुलांनी माझ्याकडे जणू काही मीच त्यांचा हिरो आहे, अशा नजरेनं पाहिलं. तोच माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण होता’, असं त्या चहा विक्रेत्याने सांगितलं. आयुष्यात आनंदाच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाला त्या चहा विक्रेत्याचा एक छोटासा अनुभव बरंच काही शिकवून गेला असं म्हणायला हरकत नाही. आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी झटणाऱ्या, स्वत:च्या इच्छांना दूर सारत मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या बाबाची कहाणी सोशल मीडियावर अनेकांना भावूक करुन गेली आहे.