नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात चलन कलह सुरु असताना या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या नोटा आणि बँकेतील रांगा यांचे चांगलेच वारे वाहताना दिसत आहे. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर काही नेटीझन्स पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करत मोदींना पाठिंबा देत आहेत. तर काही नेटीझन्स मोदी सरकार बड्या उद्योगपतींना सोडून गरिबांना त्रस्त करत असल्याचे सांगत मोदींच्या निर्णयाला विरोध दर्शवत आहेत.  ८ नोव्हेंबरला मोदींनी १००० आणि ५०० च्या जुन्या नोटांना व्यवहारातून हद्दपार केल्याची घोषणा केल्यानंतर ९ तारखेला बँकांना जाहीर झालेल्या सुट्टीनंतर बँक आणि डाक कार्यालयाबाहेर लोकांच्या रांगाच्या रांगा दिसत आहेत. या निर्णयामुळे ज्या प्रमाणे लोकांचे हाल होत आहेत. त्याच प्रमाणे बँकेतील कर्मचाऱ्यांचे देखील हाल होताना दिसत आहे.

केरळमधील एका बँक कर्मचाऱ्याने नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण लोकांना होणाऱ्या त्रासाचे वर्णन केले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये त्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये माणुसकीचे दर्शन आपल्या पोस्टमधून करुन दिले. मालापुरम जिल्ह्यातील रामदास नावाच्या बँक कर्मचाऱ्याने कष्टाचा पैसा सुरक्षिततेसाठी बँकेमध्ये येणारे नागरिक बँकेमध्ये सहकार्य दाखवत असल्यामुळे आभार मानले. देशात उदभवलेल्या चलन कलहाच्या परिस्थितीमध्ये लोकांचे सहकार्य मिळत असल्याचे त्याने म्हटले आहे. एवढेच नाही तर रांगेत उभे असणाऱ्या लोकांना गावातील काही लोक जेवणापाण्याची सोय करत असल्याचे पाहून त्याने ही पोस्ट लिहली. त्रस्त लोकांना मदत करणारे लोक मला माणुसकीचे  दर्शन करुन  देतात, असे रामदासने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.

रामदास कार्यरत असणाऱ्या बँकामध्ये आसपासच्या दहा गावातील लोक पैसे काढण्यासाठी येतात. या भागात अनेक बँका किंवा एटीएमची सुविधा नसल्यामुळे नोटाबंदीची सर्वाधिक झळ या भागातील लोकांना बसत असल्याचे त्याने म्हटले आहे. आसपासच्या गावातून आपल्या बँकेत येणाऱ्या लोकांना स्थानिक लोक मदतीचा हात पुढे करत असल्याचे अनुभव हा आनंददायी असल्याचे त्याने म्हटले आहे. आपले काम प्रामाणिकपणे करुन बँकेत येणाऱ्या नागरिकांचे हाल आणि त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक जनतेच्या कौतुक टीपणारी रामदासची  पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.