दिल्ली मेट्रोमधील एका जोडप्याचा व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्कींगवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे जोडपे मेट्रोमध्ये सर्वांसमोर एकमेकांचे चुंबन घेताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. ट्विटवर एका व्यक्तीने तर थेट दिल्लीच्या मेट्रो प्रशासनाकडे अशा लोकांसाठी मेट्रोमध्ये वेगळा डब्बा ठेवा अशी मागणी केली आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आताचा आहे की जुना याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे दिल्ली मेट्रोमध्येच एकमेकांना आलिंगन देताना दिसते. त्यानंतर गप्पा मारता मारता हे दोघे सर्वांसमोर एकमेकांचे चुंबन घेताना व्हिडिओत दिसतात. मेट्रोमधील एका प्रवाशाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे बोलले जात आहे. आपली कृती कॅमेरामध्ये रेकॉर्ड केली जात आहे याचा या दोघांनाही अंदाज नसल्याचे व्हिडिओ पाहिल्यावर जाणवते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रीया नोंदवल्या जात आहेत. अनेकांनी मेट्रोसारख्या सार्वजनिक ठिकाणी असे चाळे करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी अशाप्रकारे एखाद्या जोडप्याचा लपून व्हिडिओ बनवणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र मेट्रोमध्ये अशाप्रकारे जोडप्यांनी चुंबन घेण्याचे व्हिडिओ व्हायरल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालेल्या अशाच एका व्हिडिओमध्ये एक जोडपे चुंबन घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या प्रकरणात एका अज्ञात जोडप्याविरोधात आझादपूर पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. प्रवाशांनी मेट्रोमधून प्रवास करताना कोणत्याप्रकारे अश्लील चाळे किंवा गैरवर्तन करु नये अशा सुचना वारंवार दिल्या जातात असं मेट्रो प्रशासनाचं म्हणणं आहे. असं असलं तरी अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात.

दिल्लीच नाही तर कोलकाता आणि मुंबई मेट्रोमधीलही असे व्हिडिओ या आधी व्हायरल झाल्याची उदाहरणे आहेत.

Story img Loader