महेंद्रसिंग धोनी कॅप्टनशिपच्या भूमिकेतून बाजूला झाल्यावर आता जास्त आक्रमकपणे बॅटिंग करायला लागलाय. गेल्या काही वनडेमध्ये इंग्लंडला त्याने दिलेल्या मारामुळे हे आणखीनच जाणवतंय.

कॅप्टनशिपचा भारच मोठा. टीम सिलेक्शनपासून ते मॅचमधल्या डावपेचांकडे लक्ष द्यावं लागतं. बदलत्या परिस्थितीनुसार ते डावपेच थंड डोक्याने बदलावे लागतात. आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवतानाच त्यांच्या कामगिरीकडे, त्यांच्या अॅटिट्यूडकडे लक्ष द्यावं लागतं. आणि हे सगळं करतानाच ‘फक्त कॅप्टन आहे म्हणून सिलेक्ट होतोय टीममध्ये’असा शिक्का बसू नये म्हणून स्वत:च्या कामगिरीत सातत्य राखावं लागतं.

कॅप्टन कूलने २००७ पासून या सगळ्या जबाबदाऱ्या जबरदस्तपणे पार पाडल्या आणि भारताला २०-२० आणि वनडे वर्ल्डकप मिळवून देत भारताचा तो सगळ्यात यशस्वी कॅप्टन झाला. धोनीच्या आधी भारतीय टीमचे कॅप्टन झालेल्या अनेकांच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम झालेला दिसला. अगदी सौरव गांगुली आणि सचिनसुध्दा त्याला अपवाद नाहीत. पण धोनीने आपल्या कामगिरीत सातत्य राखलं. आणि तो भारताचा खऱ्या अर्थाने आधारस्तंभ झाला.

आता एवढी वर्ष एवढी जबरी कामगिरी केल्यावर कॅप्टनशिपची सवय होणं साहजिक आहे ना. अधिकृत जबाबदारी गेली तरी इतक्या वर्षीची सवय जायला थोडा वेळ लागेल. ईडन गार्डन्सला झालेल्या मॅचदरम्यान हा एक विनोदी क्षण कॅमेऱ्यांनी टिपला आणि तो इंटरनेटवर व्हायरल झाला.

 

"अरे, तू कॅप्टन आहेस नाही का?"
“अरे, कॅप्टन तू आहेस नाही का?”

 

मॅचदरम्यान फिल्डिंग लावताना धोनी नेहमीच्या सवयीने ‘ए तू मागे ये’ , ‘तू पुढे जा’ सांगत होता. पण आपल्या सांगण्याप्रमाणे फिल्डर हलत नसतानाचं पाहत धोनी भानावर आला आणि त्याच्याच मागे उभा असणारा विराट कोहली आता टीमचं नेतृत्व करतोय हे ‘रियलाईझ्’  होत शांत झाला. अर्थात ही परिस्थितीसुध्दा धोनीने त्याच्या ट्रेडमार्क ‘कूलनेस’ने हाताळली आणि घपला झाला तरी लगेच आपण त्या गावचे नाही या थाटात धोनीने गेम सुरू ठेवला! बघा पुन्हा हवं तर

धोनी आणि कोहलीमध्ये इगो क्लॅश बिलकूल नाहीत. आपण कॅप्टन झाल्यावरही आपण धोनीचा सल्ला घेणार असल्याचं कोहलीने याआधीच स्पष्ट केलंय. अशा परिस्थितीतही आपला वावर आणि आपली मतं याचं विराटला दडपण येणार नाही याची धोनीही पुरेपूर काळजी घेतोय. पण एकूणच टीम इंडियाच्या या स्थित्यंतराच्या काळात असे हलकेफुलके विनोदी क्षण पाहायला मिळणार आहेत असं दिसतंय!