बलात्कार प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलेले डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांचे आर्थिक साम्राज्य ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. डेरा सच्चा सौदाच्या माध्यमातून गुरुमीत राम रहिम यांनी देशभरात अनेक ठिकाणी आश्रम उभारले आहेत. राम रहिम यांच्या मालमत्तेचे मूल्य अब्जावधींच्या घरात जाते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली आणि त्यावेळी त्यांची खोली पोलिसांकडून तोडण्यात आली.

‘दैनिक भास्कर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पंचकूला येथे सेक्टर २३ आणि सेक्टर १५ मध्ये बाबा राम रहिम यांची अलिशान घरे आहेत. तिथे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा लाथा मारुन उघडला. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये दोन पोलिस दरवाजावर लाथा मारताना दिसत आहेत. या दोन्ही घरांना पोलिसांनी टाळे ठोकले आहे. त्यांच्या सेक्टर २३ मधील घरात मोठ्या प्रमाणात काठ्या मिळाल्या आहेत.

बाबा राम रहिम हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र आहेत. राम रहिम यांनी ९ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे हरजीत सिंह यांच्याबरोबर लग्न झाले. त्यांना जसमीत नावाचा एक मुलगा आणि चरणप्रीत आणि अमरप्रीत अशा दोन मुली आहेत. त्यांची पत्नी आश्रमात राहत नाही आणि सार्वजनिक ठिकाणीही फारशी दिसत नाही.

बाबा राम रहिम यांची जीवनशैली अतिशय उंची आहे. राम रहिम यांच्याकडे रेंज रोव्हर या महागड्या गाड्यांचा ताफाही आहे. प्रवास करताना त्यांच्याकडून तब्बल १०० गाड्यांचा वापर होतो. दरम्यान, देशातील केवळ ३६ व्यक्तींना व्हीव्हीआयपी दर्जा देण्यात आला आहे. या व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये राम रहिम यांचाही समावेश होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांची झेड प्लस सुरक्षा काढण्यात आली.