जपानमधील जगविख्यात टोयोटा कंपनीने वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये एक नवा ट्रेण्ड सुरु केला आहे. या कंपनीने दक्षिण अमेरिकेतील शेतकऱ्यांना आलीशान लक्झरी कार्स विकत घेण्याची अनोखी ऑफर दिलीय. विशेष म्हणजे या गाड्या घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकून पैसे देऊन कार नेण्याची गरज नाहीय. कंपनीने जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार शेतकरी थेट शेतमालाच्या मोबदल्यात शोरुममधून आलिशान कार घेऊन जाऊ शकतात.

टोयोटा बार्टर नावाच्या या अनोख्या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन अथवा मक्याच्या पिकांच्या मोबदल्यात टोयोटा एसयूव्ही किंवा टोयोटा पिकअपचे मालक होण्याची संधी कंपनीने दिली आहे. कंपनीने ही योजना अ‍ॅग्री बिझनेस म्हणजेच कृषी व्यवसाय धोरणाखाली सुरु केली असून शेतकऱ्यांना आपण मदतीचा हात पुढे करत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सोयाबीन किंवा मक्याच्या पिकाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना ज्या गाड्या मिळणार आहे त्यामध्ये तीन पर्याय उपलब्ध आहेत. टोयोटा हिलक्स पिकअप ट्रक, टोयोटा फॉर्च्यूनर किंवा टोयोटा कॅरोला क्रॉस एसयूव्ही असे हे तीन पर्याय आहेत.

कंपनी या योजनेअंतर्गत बाजारभावाने मका किंवा सोयाबीनचं पीक थेट शेतकऱ्यांकडून विकत घेणार आहे. जेवढं पीक तेवढ्याप्रमाणात गाडीची किंमत कमी केली जाणार. गाडीच्या पूर्ण किंमतीऐवढं पीक विकल्यास शेतकऱ्यांना एक पैसाही खर्च न करता ही गाडी दिली जाईल. मात्र हे धान्य विकत घेताना कंपनी त्याची पूर्णपणे चाचपणी करणार आहे. धान्याचा दर्जा तपासल्यानंतरच अंतिम सौदा करण्यात येतील. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ब्राझीलमध्ये टोयोटाच्या थेट विक्रीपैकी १६ टक्के विक्री ही थेट शेतीसंबंधित क्षेत्राशी निगडीत आहे. त्यामुळे या ऑफरच्या माध्यमातून गाड्यांची विक्री वाढेल अशी अपेक्षा कंपनीला आहे.

२०१९ साली कंपनीने यासंदर्भातील पायलेट प्रोजेक्ट सुरु केला होता. मात्र आता कंपनीने शेतीवर आधारित लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात गाड्या घ्याव्यात यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. कंपनीच्या जास्तीत जास्त गाड्या विकल्या जाव्यात आणि शेतीसंदर्भातील गाड्या विक्रीची टक्केवारी १६ पेक्षा अधिक वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. ही योजना ब्राझीलमधील बाहिया, मँटो ग्रासो, गोइयास, साओ पाओलोसारख्या प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे. तसेच टप्प्याटप्प्यात ही योजना इतर ठिकाणीही लागू करण्यात येणार आहे. या पद्धतीमुळे रोख किंवा कार्डाच्या माध्यमातून व्यवहार न करता शेतकरी एका हाताने द्या एका हाताना घ्या या तत्वावर व्यवहार करुन गाडीचे मालक होऊ शकतात. पूर्वी जगभरामध्ये अशापद्धतीने देवाणघेवाण चालायची. जे पिकतं, ज्याचं उत्पादन घेतलं जातं त्याच्या मोबदल्यात आवश्यक वस्तू घेतल्या जायच्या. सध्या भारतात तरी कंपनी ही योजना सुरु करणार नसली तर काही नवीन गाड्या कंपनी लवकरच भारतात उतरवणार आहे.