ऐतिहासिक सिडनी कसोटीत हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाचा सामना केला आणि नाबाद राहून सामना अनिर्णित राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. हनुमा विहारी जखमी असल्याने त्याला धावता येत नसल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. पण त्याच्यासोबत दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणाऱ्या अश्विनला तर सोमवारी सकाळी सरळ उभंही राहता येत नव्हतं, याची माहिती अश्विनच्या पत्नीने ट्विटरद्वारे दिली आहे.

कसोटी सामना संपल्यानंतर, “या व्यक्तीच्या पाठीत रविवारी रात्री असहाय्य वेदना होत होत्या, रात्री तो तसाच झोपला. सोमवारी सकाळी तर त्याला सरळ उभंही राहता येत नव्हतं. त्याला इतका त्रास होत होता की बूटांच्या लेस बांधण्यासाठीही तो वाकू शकत नव्हता”, अशी माहिती अश्विनच्या पत्नीने ट्विटरद्वारे दिली. यासोबतच, इतका त्रास होत असतानाही अश्विनने केलेली कामगिरी पाहून चकित झाले असंही तिने म्हटलं. नंतर अजून एका ट्विटमध्ये, “त्याला वाकता येत नसल्याने आता पॅकिंगमध्ये माझी मदत कोण करणार”, असं मजेशीर ट्विटही तिने केलं. तिच्या  ट्विटवर लगेचच अश्विननेही, “डोळ्यात पाणी आलं…नेहमी माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद” असा रिप्लाय दिला.

आणखी वाचा- भारतीय संघाचा ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ आला समोर; रहाणेने अश्विनला मिठी मारली आणि…


अश्विनने सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी हनुमा विहारीसोबत 62 धावांची मोलाची भागीदारी केली आणि सामना अनिर्णित राखला. अश्विनने 128 चेंडूंमध्ये नाबाद 29 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी जवळपास 40 पेक्षा जास्त षटकं फलंदाजी केली.

आणखी वाचा- भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाने फलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. कसोटी क्रिकेटमध्ये 41 वर्षानंतर चौथ्या डावात भारताने 110 पेक्षा जास्त षटके फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या 407 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 131 षटके खेळली आणि सामना ड्रॉ केला. तसं पाहायला गेलं तर सामना ड्रॉ होणं हे भारतासाठी विजयापेक्षा कमी नाही. कारण भारताने दुखापतग्रस्त खेळाडूंच्या मदतीनं हे यश मिळवलं.