‘प्रेम’ ही एक अशी भावना आहे, जी आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. मुळात या भावनेला वेळेचं, वयाचं, दिवस- रात्रीचं, ऋतूचक्राचं, सामाजिक स्तराचं कसलं- कसलं बंधन नसतं. आपल्या आयुष्यात अपेक्षा नसताना ही भावना डोकावून जाते आणि बस्स… मग सुरु होतो प्रवास प्रेमाचा. आपुलकीने, विश्वासाने एकेकांची साथ देण्याचा. मुंबईच्या स्नेहा चौधरी आणि हर्ष मेहता यांची प्रेमकहाणीसुद्धा अशाच काही निकषांवर उभी राहिली. पण, हे सर्व झालं ऑनलाइन. सारं जग स्मार्ट होत असताना प्रेमाची भावना कशी बरं यात मागे राहिल?

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आलेली हर्ष आणि स्नेहाची प्रेमकहाणी अनेकांची मनं जिंकून गेली. मुख्य म्हणजे हे शिकवून गेली की प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्ध्यात असण्यापेक्षा, दररोज त्या व्यक्तीला भेटण्यापेक्षा मनाने एखाद्या व्यक्तीशी जोडलं जाणं, त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात आपलं स्थान मिळवणं हीच गोष्ट एखाद्या नात्याचा पाया भक्कम करते.

स्नेहा आणि हर्षच्या बाबतीतही असंच झालं. वयाच्या २८व्या वर्षी लग्नासाठी मुलं शोधतेवेळी स्नेहाला फेसबुकवरुन एक मेसेज आला. ‘आपण एकमेकांना ओळखतो का?’, असं त्यात लिहिलं होतं. तिने लगेचच त्या मेसेजला उत्तर दिलं. त्या एका मेसेजनंतर स्नेहा आणि हर्षचं बोलणं सुरु झालं. लहानमोठी प्रत्येक गोष्ट ते दोघंही एकमेकांना सांगू लागले. दिवसाचे जवळपास १८ तास ते बोलत असायचे. हे सर्व मेसेंजवर होत होतं. मोबाईलची बॅटरी कमी व्हायची त्यावेळी या दोघांनाही आधार होता तो म्हणजे स्काईपचा. हर्ष ऑस्ट्रेलियामध्ये असल्यामुळे स्नेहाची आणि त्याची भेट झालीच नव्हती. पण, त्यांच्यामध्ये होणाऱ्या गप्पा, लहानसहान गोष्टींविषयीच्या चर्चा सुरु असताना हर्षने तिला आपण प्रेमात असल्याचं सांगितलं. त्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली. कधीही न भेटलेल्या हर्षच्या मागणीचा स्वीकार करत त्याला होकार देण्यात स्नेहाने क्षणाचाही विलंब केला नाही.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

कोर्ट मॅरेज करण्याच्या अवघे दोन दिवस आधी हर्ष मुंबईत आला. त्यावेळी पहिल्यांदाच हे दोघं एकमेकांना भेटले होते. विमानतळावर हर्ष आणि स्नेहाने एकमेकांना मिठी मारली, त्यांच्यामध्ये कोणताही संकोचलेपणा नव्हता. जणूकाही ते एकमेकांना वर्षानुवर्षे ओळखत आहेत, इतकी सहजता त्यांच्या वागण्यात होती. आज त्यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. स्नेहाने तिची ही सुरेख ‘ऑनलाइन’ प्रेमकहाणी सर्वांसमोर मांडत प्रेमाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन सर्वांसमोर ठेवला आहे. तिची ही प्रेमकहाणी सध्याच्या काळाला, तरुण प्रेमी युगुलांना बऱ्याच गोष्टी शिकवून जाईल यात शंका नाही.