“बरंय हा आमचा अमका तमका किचनमध्ये जात नाही. घराला आग लावून ठेवेल. हेहेहेहे”

“मला काहीही शिजवता येत नाही” चेहऱ्यावर पानिपत जिंकल्याचा आव.

“आता घे रे हाताने. बायको आली की देईल तुला” हे वाक्य भयानक असलं तरी मायाळू चेहऱ्यामुळे ते खपून जातं.

जमाना बदलून युगं लोटली. चूल, मूल एवढ्यापुरतंचं स्त्रीचं आयुष्य मर्यादित नसल्याचे निबंध परीक्षेत लिहित सगळेजण मोठे झाले. आपल्या घरातही स्वयंपाक काय फक्त मुलींनी करायचा नसतो असं निक्षून सांगितलं जातं. पण आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या हुशारीने आपलं करिअर घडवणाऱ्या सगळ्या ‘तरूण पुरूषांची’ आपल्या भविष्यातल्या बायकोकडून अजूूनही काहीशी पारंपरिक अपेक्षा असते. स्त्री-पुरूष समानतेची वाक्य फेकत कंपनी इंटरव्ह्यूच्या ग्रुप डिस्कशनमध्ये पास झालेले हे बहाद्दर लग्नाचा विचार आला की या ‘पारंपरिक मोड’ मध्ये जातात.

आपलं करिअर व्यवस्थितपणे हाताळणाऱ्या नव्या पिढीतल्या महिला प्रोफेशनल्सना बऱ्याच वेळेला स्वयंपाकाची सवय नसते. लहानपणापासून जिद्दीने मेहनत करत पुढे आलेल्या या मुलींना अनेकदा स्वयंपाक बिलकूल येत नाही. पण या साध्याशा असलेल्या गोष्टीचा मोठा गवगवा होतो आणि स्वयंपाक येणं ही स्त्रीत्वाची पहिली ‘सामाजिक सीईटी’ मानली जाते.

वाचा- स्मरणशक्तीच्या जोरावर भारतीय मुलीने केला विश्वविक्रम

हे सगळं सांगण्याचा आताच उद्देश काय? तर नेटवर सध्या काही मीम्स व्हायरल झाली आहेत. या मीम्समध्ये एक पुरूष स्वयंपाक करताना दाखवलाय आणि खाली ‘पुरूष स्वयंपाक का करतात कारण आमच्या पिढीतल्या बायका स्वयंपाक शिकल्याच नाहीत’ असं लिहिलंय.

 

पुरूषांना स्वयंपाक 'करावा लागतो'?
पुरूषांना स्वयंपाक ‘करावा लागतो’?

 

थोड्याथोडक्या विनोदासाठी कदाचित ठीक असेल पण हे मीम नेटवर लाखोंना आवडलं नाहीये. अनेक पुरूषांनी तसंच बायकांनीही यावर टीका केलीये. ही मीम्स जिथे जिथे पोस्ट झाली आहेत तिथे तिथे चिडलेल्या महिलांनी ‘पुरूष स्वयंपाक का करतात? कारण तुम्ही स्वतंत्र व्यक्ती आहात आणि स्वावलंबीपणे जगण्यासाठी स्वयंपाक येणं आवश्यक आहे’ असा कमेट्स दिल्यात. कितीतरी पुरूषांनीही या मीमवर निगेटिव्ह प्रतिक्रिया दिल्यात. आणि या पुरूषांना ‘कित्ती चांगले’ पुरस्कार देण्याआधी लक्षात घ्यायला हवं की असा म्हणण्यामागे क्रांतिकारी विचार वगैरे नाही, असा विचार ‘काळाची गरज’ वगैरे काॅलमखाली ढकलण्याचीही गरज नाही. कुठल्याही स्वावलंबी व्यक्तीने चांगलं आयुष्य जगण्यासाठीची ही एक किमान गरज आहे. आणि हीच गरज महिलांनी व्यक्त केली की त्यांना फेमिनिस्ट, स्त्रीमुक्तीवादी वगैरे विशेषणं हेटाळणीच्या स्वरूपात आणि तंत्र म्हणून लावत व्यक्तिगत शेरे मारले जातात.

याचा अर्थ असा नाही की आपण आसपास घडणाऱ्या घटनांकडे प्रोफेसरी चष्म्यातून पहावं. हलक्याफुलक्या विनोदाला आपल्या सामाजिक जीवनात नक्कीच स्थान असतं. पण फक्त विनोदाच्या उद्देशाने तयार केलेल्या यासारख्या मीमचं पर्यवसान ‘तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो’ मध्ये झाला नाही तरी मिळवली.