भारतामध्ये तिसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर निर्बंध असताना देखील सुनिता गजेराने यांनी यूएसमधून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ज्यामुळे त्या आपल्या भावाला अवयव दान करून जीवनदान देऊ शकली. सुरूतचा रहिवासी ३६ वर्षीय सुरेश देवानी मागील एक वर्षापासून लिव्हर सिरोसिस आजाराने पीडित होता, ज्यामुळे त्याला वाचवण्यासाठी त्वरित प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. सुरेशला जून २०२० मध्ये लिव्हर सिरोसिस आजार असल्याचे निदान झाले आणि गेल्या एक वर्षापासून तो हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत होता.
त्याला अनेक संसर्ग झाले आणि त्याची स्थिती झपाट्याने खालावत होती. त्याला वाचवण्याचा आणि स्थिती सुधारण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे यकृत प्रत्यारोपण. पण महामारीदरम्यान अवयव दानाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली. सुरेशच्या पत्नीला तिचे यकृत दान करण्यासाठी विचारण्यात आले, पण प्रत्यारोपणसाठी तिचे यकृत जुळत नव्हते. सुरेशच्या यूएसएमधील बहिणीला त्याच्या आजारपणाबाबत समजले, तेव्हा तिने स्वत:हून पुढाकार घेतला व अवयवदान केले.महामारीमुळे विमानप्रवासाला परवानगी मिळवण्याचे मोठे आव्हान होते. खरेतर मागील विविध महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत आणि अनेक देशांनी भारताकडे येणारी विमानसेवा थांबवली आहे. तसेच अवयव दाता परेदशातील असेल तर भारतामध्ये जिवित अवयवाचे दान करण्यासंदर्भातील नियम कडक आहेत. अवयवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी हे नियमन आहेत. पण ही जीवन वाचवण्याबाबतची ही स्पेशल केस होती. मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील टीम्सनी यूएस एम्बेसी व एफबीआयकडून आवश्यक कागदपत्रे हस्तांतरित करण्यामध्ये आणि प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (डीएमईआर) यांच्याकडून अंतिम मान्यता मिळवण्यामध्ये सुरेशच्या बहिणीला मदत केली.
”या केसमधून आपल्याला एक शिकवण मिळते की, दूर परदेशात राहत असले तरी नाते कधीच कमकुवत होत नाही. ही केस अवयव दानाच्या थोर कार्याला अधिक चालना देण्याचे उत्तम उदाहरण आहे. दरवर्षी भारतामध्ये जवळपास ५ लाख व्यक्तींना जीवनदायी अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. प्रत्यारोपणांसाठी दात्यांच्या अनुपलब्धतेमुळे अनेक रूग्णांचा मृत्यू होतो. म्हणूनच अवयवदानाचे महत्त्व समजून घेण्याची गरज अधिक महत्त्वपूर्ण आहे,” असे मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लाण्ट अॅण्ड एचपीबी सर्जरी विभागाचे सल्लागार व प्रमुख सर्जन डॉ. गौरव गुप्ता म्हणाले.