मुंबई पोलिस सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असतात हे आपण पाहतो. या माध्यमातून ते जगजागृती करण्याचा प्रयत्न करतात. फेसबुक, ट्विटरसारख्या साईटसवर काही मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करुन मुंबई पोलिसांकडून हे काम केले जाते. यामध्ये अनेकदा वाहतुकीबाबत जनजागृती केली जाते. कधी ड्रिंक अँड ड्राईव्हविषयी तर कधी हेल्मेट वापरण्याविषयी नागरिकांना संदेश दिला जातो. अशाचप्रकारे नागरिकांचे प्रबोधन करणारा एक व्हिडिओ मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Need we say more? #TrafficDiscipline pic.twitter.com/TupYEIhXV2
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 12, 2018
हा व्हिडिओ जवळपास १ मिनिटाचा असून या फोटोला काही कॅप्शन देण्याची गरज आहे? अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. रस्ता क्रॉस करताना आपण अनेकदा घाई करतो आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. पण रस्त्यावरुन भरधाव वेगाने वाहने येत असल्याने व्हिडिओमधील मांजर बराच वेळ रस्ता क्रॉस न करता थांबून राहते. सगळी वाहने गेल्यानंतर ती शांतपणे रस्ता क्रॉस करते. त्यामुळे नागरिकांनीही रस्ता क्रॉस करताना योग्य ती काळजी घ्यावी हे कोणताही मेसेज न लिहीता मुंबई पोलिस आपल्या फॉलोअर्सना सांगत आहेत.
मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाऊंट फॉलो करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याला नागरिकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. १४०० जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला असून ३७०० जणांनी तो कमी कालावधीत लाईक केला आहे. आता मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर त्यांना ४२ लाख जण फॉलो करत आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत एखादा चांगला संदेश पोहचविण्यासाठी मुंबई पोलिस या माध्यमाचा अतिशय चांगला वापर करत आहेत.