वाढत्या रॅटरेसमध्ये आज मुलं आणि त्यांचे पालक सगळेच अगतिक झाले आहेत. सतत वाढणाऱ्या स्पर्धेत टिकाव धरायचा, तर ‘नेहमीच फास्ट असलं पाहिजे’चा मंत्र लहानग्यांना न कळत्या वयापासून शिकवला जातोय. बालवाडीसाठी किंवा पहिलीसाठी चांगल्या शाळेत प्रवेश कसा मिळेल या विवंचनेत असणारे पालक आपण सतत आसपास पाहतो. एवढी धडपड करून शाळेत प्रवेश मिळवला तरी त्यानंतर होणारी धावपळ ती वेगळीच. सगळ्यांपेक्षा आपलं मूल नेहमी पुढे असलं पाहिजे या अट्टाहासाने त्या मुलाचंही अायुष्य फरफटवलं जातं.

काही दिवसांपूर्वी नेटवर व्हायरल झालेल्या एका फोटोने सगळ्याचं मन गलूबलून आलं.

या फोटोमध्ये दिसतेय एक शाळकरी मुलगी. जेमतेम बालवाडीच्या वर्गात असेल नसेल अशी ही मुलगी शाळेच्या प्रार्थनेच्या तासाला प्रार्थना म्हणताना दिसतेय. खरं तर या फोटोमध्ये काहीचं विशेष वाटत नाही. पण या मुलीच्या गणवेषाच्या खिशाकडे नजर जाते आणि काळजाचा ठोका चुकतो.

या मुलीच्या खिशात दिसतो तो पोळीचा एक रोल. त्या रोलचा आपल्या चिमुकल्या तोंडाने या मुलीने घास घेतलाय खरा, पण लगेचच प्रार्थनेची वेळ झाल्याने बाईंनी ओरडू नये म्हणून या मुलीने उरलेली पोळी तशीच खिशात टाकत भुकेल्या अवस्थेत प्रार्थना म्हणायला सुरूवात केली.

Viral Video : केवळ कुत्र्याला वाचवण्यासाठी मोटारमनने केली धडपड

बालवाडीतल्या मुलीलाही शाळा सुरू होण्याआधी साधा सकाळचा नाश्ता करायला मिळू नये? हा फोटो गेले काही दिवस नेटवर व्हायरल झालाय. ही मुलगी तेलंगणाची असल्याचं हळूहळू समोर आलं. त्यावेळी अनेकांनी हा फोटो ट्वीट करत यासंबंधी तेलंगणा सरकारचे मंत्री के टी रामाराव यांना विचारणा केली. एवढ्या लहानग्या मुलांना जर सकाळी नाश्ता करायला वेळ मिळत नसेल तर शाळेची वेळ एवढ्या सकाळी ठेवलीच का जाते? असं या सर्वांनी मंत्रिमहोदयांना खडसावून विचारलं.

 

ट्विटरवर उठलेल्या या वादळानंतर तेलंगणाच्या मंत्र्यांना याची दखल घ्यावीच लागली. त्यांनीही या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं.या फोटोमुळे आपल्या मनाला खरोखर वाईट वाटतं असं त्यांनी कबूल केलंय. लहानग्यांचं आयुष्य असं प्रेशर कुकरसारखं न राहता त्यांचं जीवन त्यांना मोकळेपणी जगू देण्याची गरज त्यांनी मान्य केली.

पण या समस्येवर आपण कोणता उपाय योजणार आहोत याची माहिती मात्र मंत्रिसाहेबांनी दिली नाही.

सरकार जे कधी, काय करायचं ते करेल. पण आपल्या मुलांना तसंच आपल्या आसपासच्या लहानग्यांना त्यांचं आयुष्य खुलवायला आपण मदत करूया. कल्पनेपलीकडे फास्ट झालेल्या आजच्या जगात एवढी छोटीशा मदत आपण नक्कीच करू शकतो नाही का?