काही महिन्यांपूर्वीच भारतात उपलब्ध झालेली रिलायन्सची जिओ ४ जी सेवा ही इतकी यशस्वी झाली की ती अल्पावधीतच देशातील सर्वोत्तम ४ जी सेवा ठरली. रिलायन्सने आपली जिओ ४ जी सेवा पूर्णपणे मोफत दिली त्याबरोबरच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मोफत दिली त्यामुळे साहजिक  रिलायन्सने कोट्यवधी ग्राहकांना आपल्या सेवेने जोडले. पण आता रिलायन्सच्या नावे एक नवा मॅसेज फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

वाचा : तुमचे जिओ सीम प्रीपेड आहे की पोस्टपेड? खात्री करा; अन्यथा…

व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर रिलायन्स जिओच्या नावे एक लिंक शेअर होत आहे. डेटा मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात ही लिंक आहे. सध्या रिलायन्सकडून ग्राहकांना दरदिवशी १ जीबी डेटा मोफत दिला जातो, पण ही मर्यादा १० जीबीपर्यंत वाढवायची असेल तर या लिंकवर क्लिक करा अशा संदर्भातील मेसेज येत आहे. ‘http://upgrade-jio4g.ml/’ या युआरएलची ही लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यास त्यात फोन नंबर, ईमेल आणि इतर काही महत्त्वाची माहिती भरण्यास सांगितली जाते. या लिंकवर युजर्स जेव्हा क्लिक करतो तेव्हा ही लिंक अन्य ग्रुपवर पाठवण्यास सांगण्यात येते. असा मेसेज जर तुम्हालाही येत असेल तर अशा लिंकवर क्लिक करणे धोक्याचे ठरु शकते. कारण तुमची महत्त्वाची माहिती हॅक होण्याची शक्यता आहे.

वाचा : ए गणपत, चल खाना ला!

याच लिंकच्या खाली छोट्या अक्षरात आपला रिलायन्स जिओशी कोणताही संबध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही लिंक फेक असल्याचे समजून येते. तेव्हा अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन रिलायन्स जिओकडून करण्यात आले आहे.