जग हळूहळू तंत्रज्ञानाकडे जास्त झुकू लागले आहे. माणसांची जागा मशीन्सने घेतली, पण या मशीन्स हाताळायला माणसं असायची पण आता ती जागा जाऊन त्या ठिकाणी रोबोट आले. आज जगभरातील अशा कित्येक कंपन्या आहेत जिथे काम करण्यासाठी यंत्रमानव म्हणजेच रोबोटचा वापर केला जातो. चीन तर रोजची कामं करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात रोबोटची निर्मिर्ती करत आहे. या रोबोटमुळे काम जरी हलंक झालं असलं तरी माणसं मात्र बेरोजगार झालीत. तेव्हा रोबोटचा वापर करणा-या कंपन्यांकडून कर आकारला जावा असा सल्ला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे.

कंपनीत एखादे काम करण्यासाठी जर कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली तर त्याच्या पगारावर कर आकारला जातो. मग तेच काम जर रोबोट करत असले तर त्यावरही कर आकारला जावा असे मत बिल गेट्स यांनी क्वार्ट्ज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे. या करातून येणारा पैसा वुद्ध आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी वापरावा असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा कर्मचा-यांच्या कल्याणासाठी ही रक्कम खर्च करावी असेही ते म्हणाले.

जगातील फक्त श्रीमंतच नाही तर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही बिल यांचे नाव आदराने घेतले जाते. ऑक्सफेमच्या एका संशोधनानुसार बिल गेट्स यांची प्रगती जर अशीच होत राहिली तर वयाच्या ८६ व्या वर्षी ते जगातील पहिले ट्रिलेनियर (खरबपती) बनतील. काही दिवसांपूर्वी ऑक्सफेमने एक अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार जगात फक्त आठ व्यक्ती अशा आहेत ज्यांकडे जगातील सर्वाधिक संपत्ती एकवटली आहे. या यादीत बिल गेट्स हे पहिल्या क्रमांकावर होते. बिल गेट्स यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की कोणत्याही मोठ मोठ्या कंपन्या आणि अविकसनशील देशही ते सहज विकत घेऊ शकतात.