गुजरातमधील वडोदरा येथील एका १४ वर्षीय मुलाने अभ्यासावरुन पालकांचे सतत बोलणे ऐकवे लागते या रागातून स्वत:च्याच घरात दीड लाखांची चोरी केली. विशेष म्हणजे या चोरलेल्या पैशांमधून या मुलाने थेट गोवा गाठलं आणि तेथील क्लबमध्ये जाऊन हे पैसे खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. अखेर वडोदरा पोलिसांनी या मुलाचा शोध घेऊन त्याला पुन्हा पालकांच्या ताब्यात दिलं आहे.

दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाला त्याचे पालक कायम अभ्यास करत नाहीत, नुसता टाइमपास करत असतो असं बोलून हिणवायचे. मध्यंतरी त्याच्या आजोबांनाही अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यावरुन त्याची शाळा घेतली. त्यामुळे संतापाच्या भरात या मुलाने आपलं घर सोडलं. तो थेट रेल्वे स्थानकावर पोहचला आणि गोव्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला. मात्र आधारकार्ड नसल्याने त्याला खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर हा मुलगा अमितनगर सर्कलजवळ गेला आणि तेथून पुण्याला जाणारी बस पकडली. पुण्यामध्ये आल्यानंतर त्याने गोव्याला जाणारी बस पकडली आणि आपलं ड्रीम डेस्टीनेशन गाठलं.

इकडे वडोदऱ्यामध्ये मुलगा बेपत्ता झाल्यामुळे चिंतेत असणाऱ्या पालकांनी पोलिसांकडे मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार देऊ घरी आल्यानंतर घरातून दीड लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिल्याचे द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

हा मुलगा पैसे घेऊन गोव्याला गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दीड लाख घेऊन गोव्यातील क्लबमध्ये मज्जामस्ती करण्यासाठी हा मुलगा गेल्याचे समजले. दुसरीकडे घेऊन आलेले पैसे संपत आल्याचं लक्षात आल्यानंतर या मुलाने पुन्हा गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय़ घेतला. मात्र गुजरातमध्ये गेलं तरी घरी जायचं नाही असं त्याने ठरवलं होतं. अखेर तो पुण्यात पोहचला. त्याने पुण्यात एक सीमकार्ड घेतलं. त्यानंतर त्याने एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून गुजरातचं तिकीट बूक केलं. तिकीट बूक केल्यानंतर त्याने मोबाईल सुरु केला.

पोलिसांनी हा मुलगा कधी ना कधी मोबाईल वापरेल या अपेक्षेने त्याला मोबाईल ट्रेस करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मोबाईल सुरु केल्यानंतर पोलिसांना या मुलाची लोकेशन समजली. त्यानंतर त्यांनी तातडीने त्या ट्रॅव्हल एजंटला फोन केला आणि हा मुलगा ऑफिसमधून बाहेर पडणार नाही यासंदर्भात काळजी घेण्याची सुचना त्यांनी केली. दरम्यान दुसरीकडे पोलिसांनी पुणे पोलिसांना संपर्क करुन या मुलाला ताब्यात घेण्याची विनंती केली. पुणे पोलिसांनी या मुलाला ट्रॅव्हल एजंटच्या ऑफिसमधून ताब्यात घेतलं. पुणे पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी या मुलाला वडोदरा पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर या मुलाला शनिवारी त्याच्या घरी सोडण्यात आलं.