अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने एका मोठ्या मैदानाच्या आकाराएवढा मोठा लघुग्रहावर (अ‍ॅस्टेरॉईड) पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा इशारा दिलाय. हा लघुग्रह फार वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचं नासाने म्हटलं आहे. या लघुग्रहाचं नाव २००८ जीओ २० असं आहे. २४ जुलै रोजी तो पृथ्वीजवळून जाणार आहे.

२००८ जीओ २० हा लघुग्रह प्रती सेकंद आठ किमी वेगाने प्रवास करत आहे. म्हणजेच एका तासाला हा लघुग्रह २८ हजार किमी वेगाने पृथ्वीजवळ येत आहे. या वेगाने एखादी वस्तू पृथ्वीवर आदळी किंवा तिने पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला तर हाहाकार उडेल. नियर अर्थ ऑब्जेक्ट प्रकारामध्ये मोडणारा म्हणजेच पृथ्वीजवळून जाणारा हा लघुग्रह २० मीटर रुंद आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून २८७ कोटी ८ लाख ४७ हजार ६०७ किलोमीटर अंतरावरुन जाणार आहे. हे अंतर पृथ्वी आणि चंद्राच्या अंतराच्या आठपट आहे. हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असला तरी हा लघुग्रह अपोलो प्रकारातील म्हणजेच सर्वात घातक लघुग्रहांपैकी एक आहे. नासा या लघुग्रहावर सतत लक्ष ठेऊन आहे. नासाने हा लघुग्रह पृथ्वीला संभाव्य धोका असणाऱ्या प्रकारांमध्ये असल्याचं सांगत या लघुग्रहावर नासाची बारीक नजर आहे.

नक्की पाहा हे फोटो >> सोन्यापासून बनलेला लघुग्रह : …तर पृथ्वीवरील प्रत्येकजण होईल करोडपती

याच वर्षी जून महिन्यामध्ये २०२१ केटी १ हा आयफेल टॉवरच्या आजाराचा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला होता. हा लघुग्रह पृथ्वीसाठी ‘संभाव्य धोकादायक’ प्रकारांमधील होता. हा लघुग्रह पृथ्वीपासून ४.५ मिलियन किमी अंतरावरुन गेला. पृथ्वीपासून ४.६ मिलियन किमीपेक्षा कमी अंतरावरुन जाणाऱ्या खगोलीय वस्तू हा संभाव्य धोकादायक प्रकारात मोडतात. आतापर्यंत अंतराळामध्ये पृथ्वीच्या आजूबाजूच्या भागामध्ये १४० मीटरपेक्षा अधिक मोठा व्यास असणारे आठ हजारहूनअधिक लघुग्रह आढळून आले आहेत. हे सर्व लघुग्रह ७ दशलक्ष किमीपर्यंतच्या परिघामध्ये आढळून आले आहेत.  नासाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व खगोलीय वस्तूंचे वर्गीकरण हे पृथ्वीच्या दृष्टीने “संभाव्य धोकादायक” ठरणाऱ्या अंतराळातील वस्तूंमध्ये करण्यात आलं आहे. “हा लघुग्रह पोटेंशियली हजार्डस अ‍ॅस्टेरॉईड प्रकारातला आहे. पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या लघुग्रहांची एक व्याख्या करण्यात आली आहे. सामान्यपणे अवकाशातील सर्वच लघुग्रह जे ०.०५ ऑस्ट्रॅनॉमिकल युनीटपेक्षा (अंदाजे ७ दशलक्ष किमी) कमी अंतरावरुन जातात त्यांना हाच दर्जा देण्यात येतो,” असं नासाने लघुग्रहांबद्दल सांगितलं आहे.

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार  ४६० फूटांहून (१४० मीटर) अधिक आकाराची कोणतीही खगोलीय वस्तू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता खूपच कमी असते. शंभरपैकी केवळ एखाद्यावेळी अशी घटना घडू शकते असं खगोलशास्त्रज्ञ सांगतात.