राज्यामध्ये मागील आठवड्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढलं. यामध्ये शेकडो नागरिक अडकले होते. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला. बुधवारी रात्रभर पडलेला पाऊस, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती, अशा तीन घटना एकाच कालावधीत घडल्यामुळे गुरुवारी चिपळूण शहर शब्दश: जलमय झाल्याचं पहायला मिळालं. चिपळूण मुख्य बाजारपेठेत सकाळी ११ वाजता १० फूट पाणी होते. शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले असून, काही ठिकाणी पहिल्या मजल्यांवरील घरांमध्येही तीन ते चार फूट पाणी भरले. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले. सुमारे १६ वर्षांपूर्वी, २६ जुलै २००५ घ्या महापुरापेक्षाही निसर्गाचा मोठा प्रकोप चिपळूणकर अनुभवत असून शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले आहेत. काही ठिकाणी तर पहिल्या मजल्यावरही घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी भरले आहे. अशातच चिपळूणमधील पूर परिस्थितीची दाहकता दाखवणारे काही व्हिडीओ आणि फोटो समोर येत होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेला. या व्हिडीओमध्ये काही फूट पाणी साचलेल्या इमारतीच्या गच्चीवर एका व्यक्तीला खेचण्यात येत असल्याचं दिसत होतं. मात्र या प्रयत्नात तोल गेल्याने ती व्यक्ती दोन मजली इमारतीच्या गच्चीजवळून खाली साचलेल्या पाण्यात पडताना व्हायरल व्हिडीओ पहायला मिळाली. मात्र ही व्यक्ती कोण होती?, तिचं पुढे काय झालं? यासंदर्भात अनेकांना अनेक प्रश्न पडले होते. या प्रश्नांची उत्तर आता समोर आली आहेत.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: कॅलिफोर्निया ते कोकण… जगभरातील १० देशांमध्ये पुरांचे थैमान; Climate Change कडे दुर्लक्ष केल्याची फळं?

व्हायरल व्हिडीओत काय होतं?

व्हायरल व्हिडीओमध्ये एका इमारतीच्या गच्चीवरुन काहीजण हवेने भरलेल्या टायर ट्यूब आणि रस्सीच्या मदतीने खाली पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या टायरला पकडून ही व्यक्ती दोन मजले वरपर्यंत जाते. गच्चीवरील लोक टायरला बांधलेल्या दोरीच्या मदतीने तिला वर घेत असतात. मात्र अगदी वर पोहचल्यानंतर गच्चीवरील लोक टायर हातात घेऊन या व्यक्तीला वर खेचण्याचा प्रयत्न करत असतानाच या व्यक्तीचा हात सुटतो आणि ती थेट दोन मजल्याच्या उंचीवरुन खाली पुराच्या पाण्यामध्ये पडते. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, नंतर या महिलेला वाचवण्यात आलं की नाही यासंदर्भातील काही महिती लगेच समोर आली नव्हती. मात्र आता यासंदर्भातील सर्व तपशील समोर आलाय. आधी तो व्हायरल व्हिडीओ पाहूयात.

व्हिडीओ चिपळूणचाच…

हा व्हायरल व्हिडीओ चिपळूणचाच आहे का अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र हा व्हिडीओ चिपळूणचाच असून व्हिडीओमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडलेल्या व्यक्तीचं नाव सुधीर भोसले असं आहे. सुधीर यांचं याच इमारतीजवळ गॅरेज असून त्यांनी त्या दिवशी नक्की काय घडलं यासंदर्भात बीबीसी मराठीला विशेष मुलाखत दिलीय.

नक्की काय घडलं?

सुधीर भोसले यांचं या इमारतीजवळ भोसले गॅरेज नावाचं दुकान आहे. “पावसाचं पाणी साचत होतं तेव्हा मला कळलं नाही. एका छोट्या पिल्लाला घेऊन मी गॅरेजमधील खिडकीतून उडी मारुन बाहेर पडलो,” असं सुधीर सांगतात. “इमारतीच्या सदस्यांनी टायरला रस्सी बांधून वर घेण्याचा प्रयत्न केला. छोटी पिल्लं वरती सुखरुप गेली. मात्र मी घसरुन पडतो,” असंही सुधीर यांनी सांगितलं.

पाण्यात पडल्यानंतर काय केलं?

पाण्यात पडलात तेव्हा तुमच्या मनात काय होतं? असा प्रश्न सुधीर यांना विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना सुधीर यांनी, “पूर्ण घाबरलो होतो मी. लास्ट स्टेप होती असं थोडक्यात सांगता येईल. पण पोहता येत असल्याने सावरलो. रस्सी आणि टायरने या लोकांनी मला पुन्हा वर खेचून घेतलं,” असं सांगितलं.

गच्चीवर पोहचले अन्…

टायरवरुन घसरुन पडलात तेव्हा नक्की काय घडलं?, याबद्दलही सुधीर यांनी सविस्तर तपशील सांगितलं. “त्यावेळी गंभीरच परिस्थिती होती. पूर्ण डोळ्यावरती काळोख आला होता. कसा पडलो आणि काय मला कळलंच नाही. खाली पडून पाण्यात पूर्ण बुडाल्यानंतर वर आल्यावर मला कळलं की अरे आपण पाण्यातच बुडालोय. मग मला शुद्ध आली. मग परत टायर सोडण्यात आला. मी टायरला पकडून वर गेलो. गच्चीवरती गेल्यानंतर तिथे असणाऱ्या कट्ट्यावर मी झोपूनच राहिलो. शरीरातील सर्व दम निघून गेला होता,” असं सुधीर म्हणाले.

(फोटो : बीबीसीच्या व्हिडीओवरुन स्क्रीनशॉर्ट)

“अशाप्रकारचा प्रसंग माझ्यासोबत कधीच घडला नव्हता. पण मी यामधून सुदैवाने वाचलो,” असंही सुधीर म्हणाले.