अमेरिकेतील लोकप्रिय कंपनी याहूचे मेसेंजर अॅप लवकरच बंद होणार आहे. खुद कंपनीकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. याहूच्या संकेतेस्थळाद्वारे ही कंपनी वेब पोर्टल, शोध साधने, ईमेल, बातम्या, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देत असते. या सुविधांच्या अंतर्गतच याहूने मेसेंजर अॅप तयार केले होते. मात्र बदलत्या काळानुसार या अॅपचा वापर कमी झाल्यामुळे हे अॅप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याबदल्यात कंपनीने एक नवी योजना आखल्याचेही पाहायला मिळत आहे.

सध्या पाहायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप मेसेंजर अॅप दिसून येतं. मात्र व्हॉट्स अॅप लोकप्रिय होण्यापूर्वी याहू या मेसेंजर अॅपचा सर्वाधिक वापर होत होता. प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये याहूचे मेसेंजर अॅप दिसून येत असे. मात्र कालांतराने विविध मेसेंजर अॅप आले आणि याहू मेसेंजर अॅपची लोकप्रियता कमी पडू लागली. त्यामुळे कंपनीने मेसेंजर अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या १७ जुलै रोजी याहू मेसेंजर अॅप बंद होणार आहे. मात्र त्या बदल्यात कंपनीने याहू स्क्विरल हे नवे अॅप सुरु केले असून हे अॅप सध्या बीटा वर्जनमध्ये सुरु आहे.

‘कंपनीने याहूचे मेसेंजर अॅप बंद करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी जर वापकर्त्यांना कोणत्या मेसेंजर अॅपचा वापर करायचा असेल तर त्यांनी याहूचे स्क्विरल अॅपचा वापर करावा’, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.