Zomato CEO Job : हातात डिग्री आल्या आल्या आल्या भरगच्च पगाराची नोकरी मिळावी अशी सर्वसाधारण अपेक्षा सर्वांची असते. अगदीच भरगच्च पगार नाही मिळाला तरी पोटापुरता पगार मिळावा, एवढीच माफक अपेक्षा असते. त्यामुळे चांगल्या कंपन्यांमधून नोकऱ्यांच्या जाहीराती आल्या की बेरोजगार तरुण लागलीच त्यासाठी अर्ज करत असतात. पण तुम्ही कधी पगाराशिवाय पूर्णवेळ नोकरी करण्याचा विचार केलाय का? एवढंच नव्हे तर या नोकरीसाठी तुम्हाला तब्बल २० लाख रुपयेही भरावे लागणार आहेत, असं कोणी सांगितलं तर तुम्ही अर्ज कराल का? पण झोमॅटोने असे निकष लावूनही त्यांना जवळपास १० हजार अर्ज आले आहेत. याबाबत झोमॅटोचे संचालक दीपिंदर गोयल यांनी एक्स पोस्ट केली आहे.

२० नोव्हेंबर रोजी दीपिंदर गोयल यांनी एक्स पोस्ट केली होती. त्यात त्यांनी चिफ ऑफ स्टाफ या पदासाठी भरती असल्याचं म्हटलंय. त्यांना या पदासाठी एका माणसाला कामावर घ्यायचं असून त्यासाठी काही नियम आणि अटीही दिल्या आहेत. या माणसाला वर्षभर पगाराशिवाय काम करावं लागणार असून सुरुवातीला २० लाख रुपये भरायचे आहेत. तरीही या कंपनीला १० हजारांचे अर्ज आले आहेत.

हेही वाचा >> कंपनी असावी तर अशी! तब्बल १००० कर्मचाऱ्यांना ट्रिपसाठी थेट स्पेनला पाठवले तेही मोफत

अर्ज करण्याकरता नियम आणि अटी काय होत्या?

पात्रता अन् निकष

पदासाठी अर्ज करणारा भुकेला (कामासाठी) असला पाहिजे. त्याच्याकडे कॉमन सेन्स असला पाहिजे. तो संवेदनशील असला पाहिजे. तसंच, उमेदवाराकडे फारसा अनुभव नसला तरीही चालेल. पण तो नम्र असला पाहिजे. उत्साहित असला पाहिजे. त्याच्याकडे उत्तम संवादकौशल्य असलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीकडे शिकण्याची वृत्ती असली पाहिजे”, असे काही पत्रता निकष दीपिंदर गोयल यांनी एक्स पोस्टमध्ये दिलेत.

नोकरीची माहिती

भविष्यतील झोमॅटोच्या (ब्लिंकिट, जिल्हा, फिडिंग इंडियासहीत) वाढीसाठी जे काही शक्य आहे ते करण्याची तयारी

या नोकरीतून काय मिळणार?

मॅनेजमेंट स्कूलमधून दोन वर्षांच्या डिग्रीतून जे मिळणार नाही त्यापेक्षा दहापट अधिक या कंपनीत शिकायला मिळेल. माझ्याबरोबर आणि अशाच काही हुशार लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळेल, असं दीपिंदर गोयल म्हणाले.

पगार किती असणार?

एक वर्षभर या नोकरीसाठी कोणताही पगार मिळार नाही. तसंच, तुम्हाला या नोकरीसाठी २० लाख रुपये भरावे लागणार आहेत. ही फी फिंडिग इंडियाला दान केले जाणार आहेत, अशी महत्त्वाची अटही यात टाकण्यात आली आहे. तसंच, दुसऱ्या वर्षापासून ५० लाखांहून अधिक पगार दिला जाईल. याबाबत दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला चर्चा करून ठरवलं जाईल.

आतापर्यंत किती जणांचे आले अर्ज?

ही पोस्ट केल्यानंतर चोवीस तासांच्या आत दीपिंदर गोयल यांना जवळपास १० हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. पण यामध्ये त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली आहे. अर्ज आलेल्यांपैकी कदाचित सगळ्यांकडेच ५० लाख रुपये आहेत. किंवा काहींकडे थोडेसेच पैसे असतील. काहीजण म्हणतील की त्यांच्याकडे पैसे नाहीत. तर काहीजणांकडे खरंच पैसे नाहीत, असंही दीपिंदर गोयल यांनी म्हटलंय.