निसर्गाचा एक नियम आहे. जो ताकदवान आहे तोच शेवटपर्यंत जगतो आणि ज्याला या निसर्गाशी मिळते जुळते घेता येत नाही त्याचा अंत मात्र निश्चित आहे. त्यामुळे लाखो वर्षांपासून ज्यांना निर्सगाशी अनूकुलन साधत आले नाही ते या भूतलावरूनच नष्ट झाले. असे कित्येक प्राणी, पक्षी, किटक झाडांच्या प्रजाती असतील त्या अनूकुलन न साधल्यामुळे नष्ट झाल्यात . पण इतक्या वर्षांच्या कालखंडात पृथ्वीवर एक सजीव असाही आहे कि ज्याने आजही आपले अस्तित्त्व टिकवून ठेवले आहे. यातला एक म्हणजे कासव.
अशाच एका कासवाची सध्या चर्चा सुरू आहे. या कासवाचे वय आहे १०० वर्षे. तसे जगात याहूनही अधिक वय असलेले कासव आहेत पण दिएगोबद्दल विशेष सांगायचे तर दिएगो ८०० पिल्लांचा बाप आहे. एक काळ असा होता कि इस्पानोला बेटावरून कासवाची एक प्रजाती पूर्णपणे विलृप्त होण्याच्या मार्गावर होती. या बेटावर फक्त १४ कासव उरले होते. त्यामुळे या प्रजातींच्या संवर्धनासाठी या ठिकाणी मोहिम राबवली गेली. कासवांचे प्रजनन व्हावे यासाठी दिएगोला या बेटावर आणण्यात आले आणि तेव्हापासून दिएगो हा एकमेव कासव या बेटावरील कासवांच्या प्रजातीला वाचवण्यास वरदान ठरला. आतापर्यंत दिएगोमुळे या बेटावर जवळपास ८०० पिलांचा जन्म झाला आहे. काही वर्षांतच या बेटावर असलेल्या १४ कासवांची संख्या ही हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे दिएगोचे महत्त्व अधिक आहे.