Rare half-female, half-male bird: युनिव्हर्सिटी ऑफ ओटागोचे प्राणीशास्त्रज्ञ प्रोफेसर हॅमिश स्पेन्सर यांना कोलंबियामध्ये सुट्टीच्या वेळी अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांची प्रजाती आढळली. पक्षीशास्त्रज्ञ जॉन मुरिलो यांनी जंगली हिरव्या हनीक्रीपरचे वैशिष्ट्य लक्षात आणून दिल्यावर हा दुर्मिळ शोध लागला आहे. शेकडो वर्षात न आढळलेली अत्यंत दुर्मिळ पक्षाची ही प्रजात अर्धी मादी व अर्धी नर स्वरूपात असल्याचे समजतेय. या पक्ष्याची पिसे अर्धी हिरव्या रंगाची म्हणजेच मादी रूपातील तर अर्धी निळ्या रंगाची म्हणजेच नर रूपातील असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. मुरिलो व स्पेन्सर यांच्या कॅमेरात या पक्ष्याचे फोटो कैद झाल्यावर अभ्यासात ही माहिती समोर आली.
वैज्ञानिकदृष्ट्या ‘द्विपक्षीय गायनॅन्ड्रोमॉर्फिक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पक्षात, नर आणि मादी दोन्ही वैशिष्ट्ये असतात. अशा पक्ष्यांमध्ये, शरीराची एक बाजू पिसारा आणि पुनरुत्पादक अवयवांसह नर स्वरूपात दिसते, तर दुसरी बाजू पिसारा आणि पुनरुत्पादक अवयवांसह मादी स्वरूपात दिसते. पक्ष्यांच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये अनुवांशिक विसंगतीमुळे ही दुर्मिळ वैशिष्ट्य जुळून येतात. ज्यात पेशी नर आणि मादी दोन्ही स्वरूपात विकसित होत जातात.
द्विपक्षीय गायनॅन्ड्रोमॉर्फिझमचे हे विशिष्ट उदाहरण ज्यात एका बाजूला नर आणि दुसऱ्या बाजूला मादी अंग असते असे दर्शवते की, इतर अनेक प्रजातींप्रमाणे, पक्ष्यांमध्ये सुद्धा नर व मादी एकत्रित दिसण्याची शक्यता आहे. अंडी तयार करताना मादी पेशींच्या विभाजनातील त्रुटीमुळे अशी स्थिती उद्भवते, जी पुढे दोन शुक्राणूंद्वारे दुहेरी गर्भधारणा झाल्यावर विकसित होते, असे स्पेन्सर यांनी स्पष्ट केले.
संशोधकांनी काय सांगितलं?
या संशोधनाविषयी प्रोफेसर स्पेन्सर म्हणाले की, “अनेक पक्षीनिरीक्षक त्यांचे संपूर्ण आयुष्य अशा शोधासाठी प्रयत्न करत असतात. पक्ष्यांच्या कोणत्याही प्रजातीमध्ये ‘द्विपक्षीय गायनड्रोमॉर्फ’ स्थिती सहज दिसू शकत नाहीत. पक्ष्यांमध्ये ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे, मला न्यूझीलंडमधील कोणतेही उदाहरण माहित नाही. हे खूप आश्चर्यकारक आहे, मला ते पाहण्याची खूप महत्त्वाची व खास संधी मिळाली.” या संशोधनाच्या संबंधित निरीक्षणे जर्नल ऑफ फील्ड ऑर्निथॉलॉजीमध्ये प्रकाशित केली गेली आहेत, ज्यात हे १०० वर्षांनी आढळलेले गायनॅन्ड्रोमॉर्फिझमचे दुसरे उदाहरण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संशोधकाने स्पष्ट केले की गायनॅन्ड्रोमॉर्फ्स सारख्या स्थितींमुळे पक्ष्यांमधील लैंगिक भिन्नता आणि लैंगिक वैशिष्ट्यांवर आधारित वर्तन समजून घेण्यासाठी महत्वाचे आहेत. गायनॅन्ड्रोमॉर्फिझम हे हर्माफ्रोडिटिझमपेक्षा वेगळे आहे, जिथे एखाद्या व्यक्तीमध्ये एकाच वेळी नर आणि मादी दोन्ही प्रजनन अवयव असतात. याउलट गायनॅन्ड्रोमॉर्फिझममध्ये एक बाजू नर व एक बाजू मादी असे स्वरूप दिसून येते.