गणपती हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता असलेला गणपती हा सर्व जातीच्या आणि धर्मांच्या लोकांना एकत्रित बांधून ठेवतो. गणपतीचा उत्सव हा केवळ भारतातच नाही तर जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, यावरून गणेशप्रतिमा जनमानसात किती खोलवर रुजली आहे, हे आपल्याला दिसून येते. गणरायाची अनेक रूपे आपल्याला मोहून टाकतात. पण आता ज्या गणपतीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याचं रूप तर तुम्हाला मोहून टाकेलच पण त्याचं वय आणि ठिकाण ऐकूनही तुम्ही अचंबित व्हाल.
छत्तीसगडमधील बस्तरच्या ढोलकल डोंगराच्या माध्यावर एक छोटे दगडी बांधकाम असलेले घुमट नसलेले मंदिर असून त्यामध्ये गणरायाची सहा फुटी मुर्ती विराजमान आहे. दहाव्या शतकातल्या या गणपीच्या मुर्तीचा शोध बैलाडिला खाणीचे सर्वेषण सुरू असताना इंग्लिश भूगर्भशास्त्रज्ञ क्रूकशँक यांनी १९३४ साली लावला. बस्तरच्या घनदाट जंगलात तेरा हजार फुटांवर ही मुर्ती स्थानापन्न झालेली आहे. ९ व्या आणि १० व्या शतकातील नागवंशी साम्राज्याच्या काळातील मुर्ती असल्याचा अंदाज अभ्यासकांनी बांधला आहे. विशेष म्हणजे या मुर्तीच्या परिसरात मानवाने तयार केलेली दगडी हत्यारंही सापडली आहेत. पुरातत्व शास्त्र आणि संस्कृती विभागाने या मुर्तीचे आणि जागेचे सर्वेषण पूर्ण केले असून विस्तृत अहवाल येणे अद्याप बाकी आहे.