Father & Daughter Emotional Video: बाप म्हातारा होतो, बाप आजारी पडतो पण बाप दुबळा कधीच होत नाही. वयाच्या कुठल्याही टप्यावर आपल्या लेकरांच्या पाठीशी ताकदीने उभा असतो म्हणूनच तो ‘बापमाणूस’ठरतो. अगदी अंथरुणाला खिळला असला तरी बाप घरात आहे याचा किती आधार वाटतो हे दुर्दैवाने अनेकांना फार उशिरा समजतं. कुणाही पेक्षा ९ महिने जास्त बाळाचा सहवास अनुभवलेली आई आपल्या मुलांना सर्वात जवळून ओळखते, पण डोळे अधू झाले, मेंदू साथ देईनासा झाला तरीही आपल्या लेकराची चाहूल ओळखणारे बाबा अनेकदा दुर्लक्षित राहतात. अशाच एका वडिलांचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करत आहे. शंभरी पार केलेल्या वडिलांचा शेतात काम करतानाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच भावुक व्हाल.

मयुरी बुरंगुळे या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. यामध्ये गंगा आई अशा दुसऱ्या पेजला कोलॅब्रेशनमध्ये जोडले आहे. कॅप्शननुसार व्हिडिओमध्ये दिसणारे आजोबा हे गंगा आई यांचे वडील आहेत. जेव्हा शेतात काम करत बसलेल्या बाबांना या गंगा आई भेटायला जातात तेव्हा मिणमिणत्या डोळ्यांनी हे आजोबा लगेचच आपल्या लेकीला ओळखून मिठी मारतात. “गंगाआईच्या वडीलांनी नुकतीच शंभरी ओलांडली. आता दृष्टी अंधुक झाली, ऐकू येणं कमी झालं आहे, पाठीचा कणा वाकला आहे, शरीर थकुन गेलं आहे, पण बापाची माया आजही आभाळा एवढी आहे.” अशा कॅप्शनसह मयुरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर लिहिलेला मजकूर सुद्धा तितकाच काळजाला भिडणारा आहे. “बापाची नजर कितीही कमजोर झाली तरी तो लेकीला ओळखतोच” हे एक वाक्य नेटकऱ्यांना सुद्धा रडवून गेलं आहे.

तब्बल दीड लाखाहून अधिक लाईक्स असलेल्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून आम्हालाही आमच्या आजोबांची आठवण आली असे अनेकांनी म्हटलेय. तर एका युजरने आपला अनुभव शेअर करत, “माझे वडील पाच वर्षं अल्झायमरशी लढत होते पण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत माझा चेहरा लक्षात ठेवला. त्यांची आता खूप आठवण येते.”अशी कमेंट केली आहे. तर काहींनी एवढं वय असूनही आजोबांना का कामाला लावलंय असा प्रश्न केला होता ज्यावर उत्तर देताना मयुरी यांनी लिहिले की, “माझे आजोबा शेतकरी आहेत, ते स्वेच्छेने रोज न चुकता काम करतातच म्हणूनच आज १०२ वर्षांचे असूनही ते निरोगी आहेत. “

हे ही वाचा<< Video: मूर्खपणावर एकच उत्तर! मासेमाराने आधी जोडप्याचा जीव वाचवला मग अशी शिक्षा दिली की बघून डोक्यावर हातच माराल

या व्हिडीओवरून आम्ही गंगा आई हे पेज सुद्धा तपासले असता त्यांनीही वयाच्या या टप्यात रील्सच्या माध्यमातून आपला छंद जोपासला आहे हे आम्हाला दिसून आलं. सिद्धार्थ चांदेकर पासून ते अनेक मराठी कलाकारांसह गंगा आई यांचे सुद्धा फोटो व व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.