तामिळनाडूनच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांचे सोमवारी रात्री निधन झाले. अभिनेत्री ते तामिळनाडूच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारा त्यांचा प्रवास एकूणच थक्क करणारा होता. त्यांच्या मृत्यूनंतर अभिनेत्री ते राजकारण या प्रवासातल्या अनेक किस्स्यांची चर्चा रंगली. सत्तेत असताना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. पण यात आणखी एक किस्सा होता तो चेन्नईतल्या त्यांच्या पोएस गार्डन घरावर १९९७ साली आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याचा.
वाचा : ‘या’ दोन छायाचित्रांमुळे जयललिता झाल्या मुख्यमंत्री
जयललिता यांच्या चेन्नईमधल्या पोएस गार्डन घरावर आयकर विभागाने छापा घातला होता. त्यावेळी जयललितांकडे असणारी संपत्ती पाहून आयकर विभागही थक्क झाले होते. एका हिंदी वृत्तवाहिनेच्या माहितीनुसार १९९७ मध्ये आयकर विभागाने जयललितांच्या घरावर जेव्हा छापे टाकले तेव्हा त्यांना २८ किलो सोने, ८०० किलो चांदी आणि १० हजार ५०० साड्या सापडल्या होत्या. इतकेच नाही तर ९१ प्रकारची महागडी घड्याळे आणि ७५० वेगवेगळ्या चपलांचे जोडही सापडले होते.
वाचा : अम्मांच्या निधनानंतर ‘ड्राय डे’मुळे मद्याच्या दुकानांपुढे मद्यपींच्या रांगा!
जयललिता यांनी आपली ११७.१३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहिर केली होती. त्यामध्ये ४५.०४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तर ७२.०९ कोटींची जंगम मालमत्तेचा समावेश होता. जयललिता यांनी १९९५ मध्ये आपल्या दत्तक पुत्राचा विवाह केला होता. ‘राजस्थान पत्रिके’च्या बातमीनुसार या लग्नात तेव्हा जयललिता यांनी ७५ कोटी खर्च केले होते. तर दीड लाख व-हाडी मंडळी या लग्नाला आली होती. इतकेच नाही तर लग्नमंडपासपासून पाच किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्याही अंथरल्या होत्या. त्यामुळे अनेक कारणांमुळे गिनीझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली होती.