दैव जर एखादी गोष्ट हिरावून घेत असेल तर त्याचवेळी अनेक असामान्य गोष्टींची देणगी देव आपल्याला देत असतो. या ११ वर्षांच्या मुलाकडे पाहिलं तर तुम्हाला याची प्रचिती येईल. शारीरिक व्यंगामुळे कमलजितचं बालपण कोमेजलं. इतर मुलांसारखं हसणं, बागडणं त्याच्या वाट्याला आलं नाही, पण जिद्दीच्या जोरावर त्यानं आपल्या व्यंगावर मात केली. त्याच्या जिद्दीची कहाणी प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.
कमलजीत सिंग लुधियानामधल्या सरकारी शाळेत शिकतो. लहानपणीच त्याला दुर्धर आजार झाला. या आजारामुळे त्याच्या हातांची हालचाल होणं बंद झालं. त्यामुळे हात असूनही कमलजितला त्याचा उपयोग शून्य होता. कमलजितच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्या उपचारांसाठी वडिलांकडे पुरेसे पैसे नाहीत. पण या गोष्टीमुळे त्यानं इतर मुलांपेक्षा मागे राहू नये असे वडिलांना वाटत होतं. इतर मुलांसारखा तो हातानं लिहू शकत नाही पण आपल्या पायच्या मदतीनं मात्र तो लिहतो. इतकंच नाही तर इतर मुलांच्या तुलनेत त्याची वही नेहमीच स्वच्छ आणि सुंदर असते असं त्याचे शिक्षक अभिमानानं सांगतात.
Ludhiana: 5th class student Kamaljeet Singh writes with his feet as he is unable to write with his hands because of a congenital problem, says, 'when one faces trouble one should never lose faith or give up but always keep trying.' pic.twitter.com/altOi9yYWO
— ANI (@ANI) April 5, 2018
कमलजित पाचवीत शिकत आहे. गेल्यावर्षी तो वर्गातून पहिला आला होता. ‘जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपण स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. माणसानं सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे.’ असं कमलजित हसतमुखानं सांगतो. इतर विद्यार्थ्यांसारखा बाकावर बसून तो पेपर लिहू शकत नाही त्यामुळे जमिनीवर बसूनच तो पेपर लिहितो. कमलजित शाळेतील सगळ्याच उपक्रमात आवडीनं भाग घेतो, त्याला पाहिलं की जगण्याची उमेद मिळते अशी प्रतिक्रिया त्याच्या शिक्षकांनी दिली आहे. आपल्याला जे व्यंग आहे त्याचं दु:ख कमलजितला अजिबात नाही याउलट हसतमुखानं तो परिस्थितीला समोरं जातो.