कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान एक मोठी दुर्घटना होता होता टळली. येथील हुस्कुर मदुरम्मा मंदिराच्या जत्रेसाठी तयार केलेला १०० फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ शनिवारी अचानक कोसळला. यावेळी रथाभोवती मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रथ कोसळल्याचे पाहताच लोक घाबरून पळू लागले. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही. या थरारक घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बंगळुरूमध्ये हसकुर मदुरम्मा देवी मंदिराच्या वतीने दरवर्षी जत्रेचे आयोजन केले जाते. या जत्रेत रथोत्सव पार पडतो. दरम्यान, यंदाही या रथोत्सवानिमित्त १०० फुटांपेक्षा जास्त उंचीचा एक रथ तयार करण्यात आला होता: जो चार बैलगाड्या आणि ट्रॅक्टरच्या साह्याने ओढला जात होता. सजविलेल्या या रथाभोवती शेकडो भाविक जमले होते. याचदरम्यान रथ एका बाजूने झुकल्याने जोरात जमिनीवर कोसळला आणि हा अपघात झाला.
रथ कोसळताच लोक घाबरून इतके तिकडे धावत सुटले. यावेळी सर्वत्र धुळीचे साम्राज्य पाहायला मिळाले. पण, या घटनेनंतर कोणी जखमी झाल्याची माहिती नाही.