Ips manoj sharma post: आपल्यापैकी अनेकांचं एकच ध्येय असतं ते म्हणजे आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणं. कारण- आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणं हे मुलांचं कर्तव्य असतं. त्याशिवाय अनेक मुलंदेखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रक्ताचं पाणी केल्याशिवाय यश मिळत नाही. जिद्द अन् चिकाटी असेल, तर यश हे मिळतंच याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत.

त्यातलंच एक उदाहरण म्हणजे आयपीएस मनोज शर्मां. #12thFail हा चित्रपट त्यांच्याच जीवनावर आधारित आहे. दरम्यान, आयपीएस मनोज शर्मां यांनी त्यांच्या आईसोबतची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल.

ज्या आईनं पंख दिले, तिला विमानातून घेऊन जाणाऱ्या लेकाचं नेटकरी कौतुक करीत आहेत. या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, मनोज शर्मा यांनी त्यांच्या आईसोबतचा विमानातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये ‘माझी आई विमानात तेव्हाच बसते जेव्हा मी किंवा श्रद्धा तिचा हात पकडून बसतो.’ आईचं बोट धरून चालायला शिकलेल्या लेकरांची जेव्हा गरुडझेप घेण्याची वेळ येते तेव्हा त्या पालकांच्या डोळ्यांत दिसणारी अभिमानाची चमक काही वेगळीच असते. असाच अभिमान या फोटोमध्ये मनोज शर्मा यांच्या आईच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आईच्या मायेची सर जगात कोणत्याच गोष्टीला आणि व्यक्तीला येऊ शकत नाही. त्यामुळे हा आई आणि मुलाचा फोटो पाहून नेटकरीही त्यांचं कौतुक करीत आहेत.

पाहा पोस्ट

हेही वाचा >> जबाबदारीला वय नसतं! एकीकडे शिक्षणाची भूक, तर दुसरीकडे पोटाची भूक; चिमुकल्याचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

आयपीएस मनोज शर्मा यांचा संघर्ष आणि त्यांची लव्ह स्टोरी या दोन्ही गोष्टींचं कथाचित्रण 12th fail या चित्रपटातून आपण पाहिलं असेल. त्यानंतर अनेकांचे हे दोघे रोल मॉडेल ठरले. हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या ’12th fail’ या पुस्तकावर आधारलेला आहे. आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्ष, जिद्द, प्रामाणिकपणा, चिकाटी, स्वाभिमान आणि अपार कष्टांची ही कथा आहे. मनोज शर्मा यांच्या या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “मीसुद्धा माझ्या आईचं स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण करेन”, असं एकानं म्हटलं आहे. आणखी एकानं, “वाह सर” अशी प्रतिक्रिया देत त्यांचं कौतुक केलं आहे. तर तिसऱ्या युजरनं “प्रत्येक मिडल क्लास तरुणाचं स्वप्न”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.